ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि जर्मनीकडून शाश्वत विकासासाठी सहकार्य अधिक मजबूत


ऊर्जा सुरक्षा, कार्बन उत्सर्जनात घट आणि कार्बन बाजारपेठेतील सहकार्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यांची जर्मनीचे फेडरल मंत्री कार्स्टन श्नायडर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक

Posted On: 02 SEP 2026 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2026

 

केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री  मनोहर लाल यांनी आज नवी दिल्ली येथे जर्मनीचे पर्यावरण, निसर्ग संवर्धन, हवामान संरक्षण आणि अणु सुरक्षा विषयक फेडरल मंत्री कार्स्टन श्नायडर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. ऊर्जा क्षेत्रातील भारत आणि जर्मनीमधील सुरुवातीपासूनच्या सहकार्याचा आढावा घेण्यासाठी आणि ते अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या चर्चेत ऊर्जा सुरक्षा, कार्बन उत्सर्जनात घट, कार्बन बाजारपेठ (कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीची विपणन व्यवस्था) आणि पुरवठा साखळीचे विविधीकरण यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश होता. दोन्ही बाजूंनी, सध्या सुरू असलेल्या उपक्रमांवर विचारांची देवाणघेवाण केली आणि भारत-जर्मनी संबंधांना मिळालेल्या गतीचा फायदा घेत या क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. भारत आणि जर्मनीमधील राजनैतिक संबंधांना नुकतीच 75 वर्षे, तर धोरणात्मक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.

ऊर्जा सुरक्षा, कमी कार्बन उत्सर्जन आणि कार्बन बाजारपेठ हे परस्परांशी जोडलेले असून, या तिन्ही क्षेत्रांतील भारत-जर्मनी सहकार्य एकमेकांना पूरक ठरू शकते, यावर दोन्ही मंत्र्यांचे एकमत झाले. सुरक्षित, परवडणारे आणि शाश्वत ऊर्जा भविष्य घडवण्यासाठी सहकार्य सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, येत्या काही महिन्यांत या विषयांवर नियमित संवाद सुरू ठेवण्याचेही त्यांनी मान्य केले.

आजच्या बैठकीमुळे भारत-जर्मनी ऊर्जा सहकार्याला आणखी चालना मिळाली आहे. हे सहकार्य दीर्घकाळापासून सुरू असलेल्या भागीदारीवर तसेच शाश्वत विकास आणि ऊर्जा सुरक्षेबाबतच्या दोन्ही देशांच्या सामायिक कटिबद्धतेवर आधारित आहे.

 

* * *

शैलेश पाटील/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306152) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English