वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
मोटारवाहन सुटे भाग उद्योग क्षेत्राने जागतिक पातळीवर आपला विस्तार करावा: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन
मोटार वाहन क्षेत्राची पुरवठा साखळी भक्कम करण्यासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या उपक्रम पीयूष गोयल यांनी केले अधोरेखित, या उद्योग क्षेत्राने नवीन औद्योगिक संकुलाशी जोडून घेण्यासाठी दिले आमंत्रण
भारत आणि अमेरिकेतील अत्यावश्यक खनिज भागीदारीअंतर्गत पुरवठा साखळीला अधिक बळकटी येणार, यामुळे वाहनांच्या सुट्या भागाच्या उद्योग क्षेत्राच्या 500 अब्ज डॉलरच्या जागतिक उद्दिष्टाला पाठबळ मिळणार: पीयूष गोयल
Posted On:
02 SEP 2026 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2026
मोटारवाहन सुटे भाग उत्पादक संघटनेची (ACMA) 66 वी वार्षिक परिषद आज नवी दिल्ली इथे आयोजित करण्यात आली. या परिषदेला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी संबोधित केले. भारत जागतिक बाजारपेठेशी अधिक दृढतेने एकात्मिक होऊ पाहतो आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोटार वाहनांच्या सुट्या भागांच्या उद्योग क्षेत्राने आपल्या स्थानिक व्यवसायांचे रूपांतर जागतिक व्यवसायांमध्ये करावे, विकसित देशांमध्ये आपल्या उत्पादनाचा विस्तार करावा, पुरवठा साखळीच्या भक्कमपणाचा विस्तार करावा आणि मूल्य साखळीत अधिकाधिक वरच्या स्तरावर जाण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार ते पाच वर्षांत नऊ व्यापार करारांना अंतिम रूप देण्यात आले आहे आहे. यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये भारताच्या अस्तित्वाचा विस्तार होऊ लागला असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. भारताने जगभरातील 38 विकसित देशांशी असे करार केले आहेत. या देशांचे एकत्रित देशांतर्गत सकल उत्पादन 60 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतके असल्याचे त्यांनी सांगितले. 2014 पूर्वी झालेल्या मुक्त व्यापार करारांतर्गत आजच्या मूल्यमानानुसार 10 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतके देशांतर्गत सकल उत्पादन असलेल्या देशांचा समावेश होता. मात्र विद्यमान केंद्र सरकारच्या काळात गेल्या साडेचार वर्षांत झालेल्या नऊ करारांमुळे 60 ट्रिलियन अमेरिकी डॉलर देशांतर्गत सकल उत्पादन असलेल्या देशांमध्ये दुहेरी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे ते म्हणाले.
लवचिकतेच्या पलिकडे : नव्या संधी आणि अधिक भक्कम पुरवठा साखळीच्या निर्मितीसाठी अनिश्चिततेचे व्यवस्थापन ही या परिषदेची संकल्पना होती. गोयल यांनी या संकल्पनेचा दाखला उपस्थितांना दिला. अनिश्चितता, आव्हाने आणि मोठ्या उलथापालथीच्या या काळात ही संकल्पना समर्पक वाटत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जागतिक पटलावर सध्या अशांतता असल्याचा संदर्भ त्यांनी मांडला. अशा काळातही भारत स्थैर्याने वाटचाल करत आहे आणि जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान टिकवून ठेवले आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. टीकाकारांनी काहीही म्हटले तरी 7.8 टक्के विकासदर हे आजचे वास्तव असल्याची बाबही त्यांनी नमूद केली.
यावेळी गोयल यांनी विविध क्षेत्रांतील प्रगतीबद्दलही उपस्थितांना सांगितले. मोटारवाहन सुटे भाग उत्पादकाचे क्षेत्रही दुहेरी अंकाने, आणि त्याचवेळी मोटार वाहन उद्योग क्षेत्र देखील उच्च पातळीवर दुहेरी अंकात वेगाने प्रगती करत असल्याचे ते म्हणाले. चालू वर्षात 50 लाख प्रवासी वाहनांची विक्री होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. चारचाकी मोटार वाहने विकत घेतल्यानंतर तशीच विनावापर राहिलेली नाहीत ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. काही इलेक्ट्रिक वाहनांसाठी तर सध्या सहा महिन्यांचा कालावधी हा प्रतिक्षा कालावधी असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलाद क्षेत्रही वेगाने प्रगती करत असल्याचे ते म्हणाले. देशांतर्गत मागणी खूप जास्त असल्याने भारत निर्यातीपेक्षा जास्त पोलादाची आयात करत आहे ही बाब त्यांनी नमूद केली. या मागणीत मोटार वाहनांच्या सुट्या भागाच्या उद्योग क्षेत्रातून असलेल्या वाढत्या मागणीचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.
औद्योगिक क्षमता वाढवण्यासाठी आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने राबवलेल्या विविध योजनांवर गोयल यांनी प्रकाश टाकला. ऑटो कॉम्पोनंट (वाहनांचे सुटे भाग) उद्योगाला त्याचा विस्तार करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन आणि या क्षेत्रासाठी आवश्यक असलेले विशेष स्टील भारतातच तयार करण्यासाठी 'स्पेशॅलिटी स्टील' उत्पादनाला दिलेला पाठिंबा, थेट या उद्योगाशी संबंधित असल्याचे ते म्हणाले.
सरकार नवीन औद्योगिक पार्क विकसित करत असून, 20 स्मार्ट शहरे आणि औद्योगिक शहरांचे काम आधीच वेगाने सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले. त्यांनी उद्योगांना यात सहभागी होण्याचे, तसेच परदेशांना या पार्क्समध्ये स्वतःचे विशेष क्षेत्र स्थापन करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले. “आपण यापैकी एखादा पार्क भारत-अमेरिका भागीदारीसाठी समर्पित करू शकतो. केवळ वाहन सुट्या भागांसाठी समर्पित असे दोन, तीन किंवा अगदी पाच पार्क आपण तयार करू शकतो. तसेच तुमच्या गरजेनुसार उत्तम पायाभूत सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो.” असे ते म्हणाले.
गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) आणि इस्रायलमधील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर भारत लवकरच त्यांच्यासोबत मुक्त व्यापार करार (FTA) करेल, असे गोयल यांनी स्पष्ट केले. याशिवाय, मजबूत पुरवठा साखळीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या अतिमहत्त्वाच्या खनिजसंपत्तीत (क्रिटिकल मिनरल्स) मोठा वाटा मिळवण्यासाठी भारत जगभरातील इतर देशांशीही मुक्त व्यापार करार करेल, असे त्यांनी सांगितले.
अमेरिका आणि भारत क्रिटिकल मिनरल्सच्या क्षेत्रात एकमेकांचे भागीदार म्हणून एकत्र काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अमेरिकेने सुरू केलेल्या 'पॅक्स सिलिका' या उपक्रमाचा उल्लेख करत ते म्हणाले की, या उपक्रमाअंतर्गत समान विचारांचे, लोकशाहीवादी आणि प्रामाणिकपणे काम करणारे देश एकत्र येऊन कोणत्याही एकाच देशाला व्यापाराचा शस्त्र म्हणून वापर करण्यापासून रोखू शकतात.
आपले 500 अब्ज डॉलरचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना या सर्व घडामोडींमुळे ऑटो कॉम्पोनंट उद्योग जागतिक स्तरावर एक प्रमुख उद्योग म्हणून पुढे येईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
आपल्या भाषणाचा समारोप करण्यापूर्वी गोयल यांनी या उद्योगासाठीच्या काही प्रमुख प्राधान्यक्रमांची रूपरेषा मांडली. त्यांनी उद्योजकांना स्थानिक व्यवसायांचे रूपांतर जागतिक व्यवसायांमध्ये करण्याचे आवाहन केले. तसेच, ज्या उत्पादनांच्या पुरवठा साखळीत अजूनही अधिक मजबूती आवश्यक आहे, अशा उत्पादनांसाठी एक सक्रिय स्वदेशीकरण कार्यक्रम राबवण्याचा सल्ला दिला; जेणेकरून भविष्यातील अचानक उद्भवणाऱ्या संकटांपासून या उद्योगाचे रक्षण होऊ शकेल.
उद्योगाने व्हॅल्यू चेनमध्ये अधिक वरच्या स्तरावर जावे आणि उत्तम दर्जाची रचना, निर्मिती व पुरवठा असलेल्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांसह अधिक मूल्यवर्धित उपाय देण्यास सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला संबोधित करताना भारतासाठीचे अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील भारत-अमेरिका सहकार्य अधिक दृढ होत असल्याचे अधोरेखित केले आणि उभय देशांमधील संबंध सध्या "ऐतिहासिक उच्चांकावर" असल्याचे सांगितले. दोन्ही देश भविष्यातील गतिशीलता (मोबिलिटी) एकत्र डिझाइन करत आहेत, असे नमूद करत त्यांनी पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी भारतातील ऑटो कॉम्पोनंट उद्योगाचे एक विश्वासार्ह आणि सातत्याने प्रगत होणारा भागीदार म्हणून कौतुक केले. दोन्ही सरकारे रास्त, परस्परपूरक आणि फायदेशीर व्यापार संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांनी, उभय सरकारांमध्ये झालेल्या व्यापारी समन्वयाचा उल्लेख केला. तसेच, या महिन्याच्या शेवटी अमेरिका G-20 बैठकीचे आयोजन करत असल्याने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोर यांनी औषधनिर्माण, लष्करी सामग्रीची विक्री आणि सराव, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर्स आणि अवकाश या क्षेत्रांमधील सहकार्य अधोरेखित केले आणि पॅक्स सिलिका उपक्रमाचे वर्णन नवोन्मेषाला प्रोत्साहन देणाऱ्या नियामक चौकटीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असे केले आणि यात सामील होण्यासाठी आमंत्रित केलेल्या पहिल्या देशांपैकी भारत एक होता, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी भारताच्या ऑटोमोटिव्ह परिसंस्थेमधील अमेरिकी कंपन्यांच्या आणि अमेरिकेतील भारतीय कंपन्यांच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले, ज्यात भारत फोर्ज, सुंदरम क्लेटन आणि महिंद्रा यांचा समावेश आहे. त्यांनी सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या भारतीय उत्पादकांना ग्रीनफिल्ड असेंब्ली, संशोधन आणि विकास केंद्रे आणि वितरण नेटवर्कच्या माध्यमातून अमेरिकेत गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी आमंत्रित केले. तसेच, भारतात असलेल्या अमेरिकी दूतावासाने अमेरिकेत 24 अब्ज डॉलर्सची नवीन गुंतवणूक आणून जागतिक दूतावासांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, असे त्यांनी नमूद केले.
दक्षिण आशियासाठीचे व्यापार आयुक्त आणि पश्चिम भारतासाठी ब्रिटिश उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आपल्या भाषणात भारत-ब्रिटन संबंध अधिक दृढ होत असल्याचा उल्लेख केला आणि सांगितले की, वाहन उद्योग व भविष्यातील वाहतूक हे ब्रिटनच्या प्रगत उत्पादन क्षमतांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी 'भारत-यूके व्हिजन 2035', यूकेचे आधुनिक औद्योगिक धोरण आणि 15 जुलै 2026 रोजी अंमलात आलेला 'भारत-यूके CETA' (सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार) अधोरेखित केला. त्यांनी नमूद केले की, व्यापार आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी सीमाशुल्क व सीमा-विषयक प्रक्रिया सुलभ करण्यात आल्या असून, यूकेच्या 99% आणि भारताच्या 90% शुल्क श्रेणीतील शुल्क शून्य किंवा अत्यंत नगण्य पातळीवर आणण्यात आले आहे.
ते म्हणाले की, CETA मुळे पुरवठा साखळ्या अधिक भक्कम होतील आणि संयुक्त उपक्रम व भागीदारींना चालना मिळेल; तसेच वाहनाचे सुटे भाग तयार करणाऱ्या उत्पादकांना एकमेकांच्या बाजारपेठांमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. त्यांनी इलेक्ट्रिक मोटर्स, बॅटरी, हायड्रोजन-आधारित उपाय, हलक्या वजनाचे कंपोझिट्स आणि सॉफ्टवेअर-आधारित वाहन प्रणालींसह प्रगत अभियांत्रिकी, नवोन्मेष आणि शून्य-उत्सर्जन वाहन तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील ब्रिटनचे सामर्थ्य अधोरेखित केले.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/वैभवी जोशी/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306143)
अभ्यागत कक्ष : 12