दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा 9 वा स्थापना दिवस (आयपीपीबी दिवस 2026) साजरा


व्यापाऱ्यांसाठी 'डाकपे साऊंड बॉक्स' आणि ग्राहकांसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा शुभारंभ

Posted On: 01 SEP 2026 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2026

 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) आज आपला 9 वा स्थापना दिवस साजरा करत असून, देशभरात सुलभ, समावेशक आणि तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक सेवांचा विस्तार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे.

प्रत्येक नागरिकापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने, 'इंडिया पोस्ट'च्या विस्तृत जाळ्याचा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून तळागाळापर्यंत सेवा देणारे एक वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक सेवांचे मॉडेल विकसित केले आहे. गेल्या नऊ वर्षांत ही बँक नागरिकांना बँकिंग, डिजिटल पेमेंट्स, सरकारी लाभ आणि इतर आवश्यक आर्थिक सेवांशी जोडणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयाला आली आहे.

9 व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याचा एक भाग म्हणून, आयपीपीबीने व्यापाऱ्यांसाठी 'डाकपे साऊंड बॉक्स' सुरू करण्याची घोषणा केली. व्यापाऱ्यांसाठी दैनंदिन डिजिटल पेमेंट स्वीकारण्याची प्रक्रिया सुलभ आणि अधिक सक्षम करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. बँकेने आपला 'डिजिटल विमा तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म' सुरु करण्याची घोषणा केली असून, हा प्लॅटफॉर्म (व्यासपीठ) ग्राहकांना जीवन, आरोग्य आणि सामान्य विमा क्षेत्रातील विविध पर्यायांशी जोडून त्यांना विमा सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आयपीपीबीने ग्राहकांना गुंतवणुकीचा एक सोपा, सुलभ आणि अखंड डिजिटल अनुभव देण्याच्या उद्देशाने 'डिजिटल म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म' देखील सुरू केला आहे.

एकत्रितपणे, हे नवीन प्लॅटफॉर्म, आयपीपीबीचा दैनंदिन बँकिंग आणि पेमेंट सेवा देण्यापासून, ते संरक्षण, गुंतवणूक आणि आर्थिक सुरक्षेपर्यंत आपल्या सेवांचा विस्तार करण्याचा दृष्टीकोन दर्शवतात.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आपल्या विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना तंत्रज्ञान, आंतरपरिचालन आणि व्यापक भारतीय टपाल नेटवर्क याचा वापर करून अधिक जोडलेली आणि समावेशक आर्थिक व्यवस्था तयार करण्यावर आपले लक्ष केंद्रित आहे. आतापर्यंत, आयपीपीबीने डिजिटल पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली असून, यामुळे देशाच्या लेस-कॅश (कमी-रोख) आणि डिजिटली सक्षम अर्थव्यवस्थेच्या दिशेने होत असलेल्या संक्रमणाला पाठबळ मिळत आहे.

 

* * *

माधुरी पांगे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305752) अभ्यागत कक्ष : 14