पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत बैठक

Posted On: 31 AUG 2026 10:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिश्केक इथे 26 व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. यंदाच्या वर्षातील दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. याआधी डिसेंबर 2025 मध्ये 23 व्या वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची दिल्ली इथे भेट झाली होती.

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांनी राजकीय, आर्थिक, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, दळणवळण आणि दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंधांसह विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. मॉस्को इथे 24 ऑगस्ट 2026 रोजी भारत आणि रशियाच्या व्यापार, आर्थिक आणि सांस्कृतिक बाबींवरील 27 व्या आंतर सरकारी आयोगाची  बैठक झाली होती. या बैठकीतील फलनिष्पत्तीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

दोन्ही नेत्यांनी बहुपक्षीय मंचांवर, विशेषतः 2026 मधील भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स मधील भारत आणि रशियाच्या सहभागासंबंधी विचार जाणून घेतले. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील परस्परांचे दृष्टिकोन मांडले. यात सागरी व्यापारावर तसेच भारतीय खलाशांच्या सुरक्षा आणि संरक्षणावर परिणाम करणार्‍या पश्चिम आशिया आणि काळा समुद्र क्षेत्रातील संघर्षाच्या मुद्याचाही अंतर्भाव होता. हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच मार्ग असल्याचे मत पुन्हा पंतप्रधानांनी या भेटीत व्यक्त केले.

दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी सातत्याने दृढ होत गेली असून भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही, तिच्या दृढतेची प्रचिती आली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. ही भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी सातत्यपूर्ण संवाद राखण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

येत्या 12 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी होणार असलेल्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी अध्यक्ष पुतिन यांचे भारतात स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याची भावनाही पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान व्यक्त केली.

 

* * *

सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305286) अभ्यागत कक्ष : 8