रेल्वे मंत्रालय
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नेपाळमधील आकस्मिक पुरातील मृतांना वाहिली श्रद्धांजली
Posted On:
31 AUG 2026 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2026
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, डुमरियागंजचे खासदार जगदंबिका पाल; बहराइचचे खासदार डॉ. आनंद कुमार गोंड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नेपाळगंज रोड-नानपारा-बहराइच रेल्वे मार्गाचे गेज रूपांतरण आणि विद्युतीकरणाचे उद्घाटन झाले. 56.15 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गाचे सुमारे 730 कोटी रुपये खर्च करून ब्रॉड गेजमध्ये रूपांतरण आणि विद्युतीकरण करण्यात आले आहे. चार विद्यमान रेल्वे सेवांचा विस्तार करून त्या देखील नेपाळगंज रोडपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये अलिकडेच आलेल्या पुराच्या मृतांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्वांनी यावेळी दोन मिनिटे मौन पाळले.

भारत आणि नेपाळ यांचे सांस्कृतिक संबंध दृढ आहेत, असे शेजारील नेपाळमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले. नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांप्रति त्यांनी शोक व्यक्त केला. भारत सरकार आपत्तीग्रस्तांना मदत पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रभावित भागातून वाचवलेल्या आणि भारतात पोहोचणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेनेही व्यवस्था केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास मदत करण्यासाठी रेल्वेने विशेष डबे आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था केली आहे, असेही त्यांनी सांगितले. नेपाळमधील परिस्थितीमुळे बाधित झालेल्या प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची आणि मायदेशी परतण्याची सोय करण्यासाठी रेल्वे मंडळ, रेल्वे विभाग, जिल्हा आणि राज्य प्रशासन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या समन्वयाने काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही नेपाळमध्ये अलिकडेच आलेल्या नैसर्गिक आपत्तीबद्दल शोक व्यक्त केला. या दुर्घटनेचा परिणाम केवळ नेपाळ या मित्र राष्ट्रावरच नाही, तर भारतासह अनेक देशांतील लोकांवरही झाला आहे, असे सांगून या आपत्तीत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रति त्यांनी शोक व्यक्त केला.
नेपाळगंज रोड-नानपारा-बहराइच विभाग, आता देशाच्या विस्तृत ब्रॉड गेज रेल्वे जाळ्याशी जोडला गेला असून देशभरात ब्रॉडगेज रूपांतर कार्यक्रम पूर्णत्वाच्या जवळ आला असल्याचे वैष्णव यांनी उदघाटन कार्यक्रमात सांगितले.
या सेवांमुळे नेपाळगंज रोड आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना गोंडा, गोरखपूर, वाराणसी आणि इतर प्रमुख शहरांशी थेट रेल्वे जोडणी मिळणार आहे.
* * *
सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305204)
अभ्यागत कक्ष : 9