अवजड उद्योग मंत्रालय
पंतप्रधान मोदी यांचा 'विकसित भारत' दृष्टीकोन: भारताने जागतिक ऑटोमोबाईल उद्योगासाठी भविष्यानुरूप सज्ज कामगार शक्ती तयार केली पाहिजे : एच.डी.कुमारस्वामी
Posted On:
31 AUG 2026 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2026
भारत 'विकसित भारत @2047' च्या दिशेने वाटचाल करत असताना देशातील तरुण पिढीसाठी कौशल्य विकास, कौशल्य वृद्धी आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या आवश्यकतेवर केन्द्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी भर दिला आहे. भारताची कुशल कामगार शक्ती केवळ अंतर्गत गरजा भागवण्यासाठीच नाही, तर जगभरातील उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी देखील सज्ज असणे आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. ते सोमवारी नवी दिल्लीत ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (ASDC) वार्षिक परिषद 2026 मध्ये बोलत होते. भारताचे ऑटोमोबाईल क्षेत्र परिवर्तनाच्या एका नवीन युगात प्रवेश करत आहे; ज्याला इलेक्ट्रिक मोबिलिटी, ऑटोमेशन, कनेक्टेड तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन आणि इंडस्ट्री 4.0 द्वारे गती मिळत आहे, असे ते म्हणाले.
भारताची महत्त्वाकांक्षा केवळ आपल्या अंतर्गत मनुष्यबळाच्या गरजा पूर्ण करण्यापुरती मर्यादित असू नये. आपण भारताला जागतिक स्तरावर ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील कुशल गुणवत्तेचा एक प्रमुख स्रोत बनवण्याचे ध्येय ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील जलद परिवर्तनासाठी नवीन तंत्रज्ञानाशी आणि बदलत्या कामाच्या ठिकाणच्या गरजांशी जुळवून घेण्यास सक्षम असलेल्या कामगार शक्तीची आवश्यकता असेल यावर त्यांनी भर दिला. केवळ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यापलीकडे जाऊन तरुणांना अशा कौशल्यांनी समृद्ध करण्यावर भर दिला पाहिजे, ज्याचे रूपांतर अर्थपूर्ण रोजगाराच्या संधींमध्ये होईल, असे त्यांनी सांगितले.
आपल्या तरुण पिढीला कौशल्यपूर्ण आणि अधिक उच्च-कौशल्यपूर्ण बनवून रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे हे केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
कुशल मनुष्यबळ तयार करण्याची जबाबदारी केवळ शिक्षण व कौशल्य संस्थांवर राहू शकत नाही. भविष्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये परिभाषित करण्यात आणि प्रशिक्षण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणच्या गरजेनुसार आहे याची खात्री करण्यात ऑटोमोबाईल उत्पादक, सुटे भाग उत्पादक, डीलरशिप्स आणि उद्योगातील इतर भागधारकांची प्रमुख भूमिका असेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

भारताची कामगार शक्ती ऑटोमोबाईल क्षेत्राच्या बदलत्या गरजांशी सुसंगत राहील हे सुनिश्चित करण्यात ASDC सारख्या संस्थांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, असे कुमारस्वामी म्हणाले.
ASDC ने भविष्यातील गरजांचा अंदाज घेण्यासाठी आणि भारतीय तरुणांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयुक्त ठरणारी कौशल्ये प्रदान करण्यासाठी उद्योगांसोबत निकटतेने काम करणे सुरू ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान, कुमारस्वामी यांनी ASDC च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन केले. रुमानियामध्ये नोकरी मिळालेले 43 उमेदवारही यावेळी त्यांच्या उपस्थितीत रवाना झाले. यातून कुशल भारतीय तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध होत असलेल्या वाढत्या संधीं अधोरेखित झाल्या.

* * *
सोनाली काकडे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305202)
अभ्यागत कक्ष : 5