पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किर्गीझ प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात द्विपक्षीय बैठक
Posted On:
31 AUG 2026 5:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑगस्ट 2026 रोजी बिश्केक येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेच्या निमित्ताने किर्गिझ प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष महामहिम सादिर झापारोव्ह यांची भेट घेतली.
किर्गीझ प्रजासत्ताकच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष झापारोव्ह यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि त्याच दिवशी सुरू झालेल्या शांघाय शिखर परिषदेला यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे नमूद केले. 26व्या परिषदेचे यजमानपद भूषवल्याबद्दलही पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष झापारोव्ह यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला आणि भारत आणि किर्गिझ प्रजासत्ताक यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबतची आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली. दोन्ही अर्थव्यवस्थांमधील परस्परपूरक बाबी लक्षात घेऊन, आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यावर त्यांनी सहमती दर्शवली. तसेच, विद्यार्थी आदान-प्रदान आणि सांस्कृतिक सहकार्य यांसारख्या माध्यमांतून परस्पर देशांतील लोकांमधील वाढत्या संबंधांवरही त्यांनी चर्चा केली.
किर्गिझ प्रजासत्ताकाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एससीओ (SCO) च्या बैठकीत भारताच्या सक्रिय सहभागाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, यातून उभय देशांमधील घनिष्ठ आणि दीर्घकालीन संबंधांचे वैशिष्ट्य असलेला परस्पर आदर, विश्वास आणि पाठिंबा प्रतिबिंबित होतो. एससीओ शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल तसेच स्नेहपूर्ण स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष सादिर झापारोव्ह यांचे आभार मानले.
* * *
सुषमा काणे/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305073)
अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada