सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
भुवनेश्वर सीटीटीसीने उन्हाळी प्रशिक्षण कार्यक्रम 2026 च्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या 8,000 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले
उद्योग-स्तरावरील इंटर्नशिप प्रशिक्षणाद्वारे भावी अभियंत्यांचे सक्षमीकरण
Posted On:
28 AUG 2026 11:27AM by PIB Mumbai
उद्योग क्षेत्राच्या गरजांवर आधारित प्रशिक्षणावर भारताचा वाढता भर प्रदर्शित करत, एमएसएमई मंत्रालयांतर्गत केंद्रीय टूल रूम आणि प्रशिक्षण केंद्र (सीटीटीसी), भुवनेश्वरने मे आणि जून 2026 दरम्यान चार आठवड्यांचा उन्हाळी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला. यात सुदान आणि येमेनमधील 26 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह देशभरातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या 8,083 विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षापासून ते अंतिम वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आणि यात देशभरातील विद्यार्थ्यांसह आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. भारतातील तरुणांची रोजगारक्षमता आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने, सुव्यवस्थित आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून सीटीटीसी भुवनेश्वरची भूमिका या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित झाली.
संधींची विस्तृत श्रेणी
- मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या विविध शाखांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग' (एआय -एमएल), 'क्लाउड कम्प्युटिंग', 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' (आयओटी) आणि 'ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग' यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानावरही विशेष भर देण्यात आला. वर्गातील शिक्षण आणि प्रत्यक्ष औद्योगिक कार्यपद्धती यामधील अंतर दूर करून, सखोल आणि प्रत्यक्ष कृतीवर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाखेसाठी चार आठवड्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता.
- प्रशिक्षण घेतलेल्या एकूण 8,083 विद्यार्थ्यांपैकी 'मेकॅनिकल' शाखेतील उमेदवारांची संख्या सर्वाधिक, 3,193 होती, त्यानंतर 'इलेक्ट्रॉनिक्स' 2,209, 'आयटी आणि सॉफ्टवेअर' 1,948, 'सिव्हिल' 388 आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांच्या 345 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ही आकडेवारी अभियांत्रिकीच्या पारंपरिक शाखांचे कायम असलेले महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाढलेला कल, या दोन्ही गोष्टी दर्शवते. या कार्यक्रमांतर्गत अभियांत्रिकी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या 39 क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले, यात कृत्रिम बुद्धिमत्ता (1,748 विद्यार्थी), पीएलसी प्रोग्रामिंग (1,000), ऑटोकॅड (991), पायथन प्रोग्रामिंग (413) आणि डेटा अॅनालिटिक्स (392) या क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग दिसून आला.
- या इंटर्नशिपमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), विविध अभिमत विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि पॉलिटेक्निक संस्था यासारख्या प्रमुख संस्थांमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग राहिला.

सीटीटीसी, भुवनेश्वर
- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या टूल डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रातील टूलिंग व प्रशिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि या क्षेत्रांतील तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सेंट्रल टूल रूम अँड ट्रेनिंग सेंटर, भुवनेश्वर ची स्थापना करण्यात आली आहे.
- हे केंद्र ऑटो पार्ट्स, उच्च अचूकतेचे (हाय-प्रिसिजन) भाग आणि सामान्य अभियांत्रिकी क्षेत्रांत विविध सेवा पुरवते. यामध्ये दर्जेदार प्रेस टूल्स, मोल्ड्स आणि डाईज, गेजेस, जिग्ज आणि फिक्स्चर्स इत्यादींचे डिझाइन, विकास आणि निर्मिती याचा समावेश आहे. तसेच, हे केंद्र टूल अँड डाय तंत्रज्ञान, उत्पादन डिझाइन, मेक्ट्रोनिक्स, अॅडव्हान्स मशीन देखभाल, सीएडी / सीएएम / सीएई, सीएनसी मशीनिंग आणि प्रोग्रामिंग इत्यादींमध्ये प्रशिक्षण/कार्यक्रम देखील प्रदान करते.
- या केंद्राने 14 जुलै 2023 रोजी सुरू झालेल्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) 437 प्रकारचे 54,000 अचूक सुटे भाग तयार करून पुरवले आहेत.
- या केंद्राने 02 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झालेल्या आदित्य-L1 मोहिमेसाठी (भारतीय सौर अभियान) इस्रोला नियामक, फ्लो कंट्रोल व्हॉल्व्ह, गायरोस्कोप, तापमान सेन्सर आणि दिशादर्शक भाग यासारख्या विविध प्रकारच्या अचूक सुट्या भागांची निर्मिती आणि पुरवठा देखील केला आहे.
- या केंद्राने 'लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट' (एलसीए) कार्यक्रमासाठीच्या घटकांसह 'ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स' (ओईएम) साठी अत्यंत अचूकतेची आवश्यकता असलेले सुटे भाग तयार करून एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, याद्वारे देशांतर्गत उत्पादन क्षमतांना बळकटी मिळाली.
***
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304201)
अभ्यागत कक्ष : 12