गृह मंत्रालय
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्र सरकारचे बारकाईने लक्ष
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नेपाळमधील आपत्तीसंदर्भात बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
नेपाळमधील पुरामुळे झालेली हानी अत्यंत दुःखद, या आपत्तीत ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्याविषयी माझ्या संवेदना - केंद्रीय गृहमंत्री
या संकटाच्या काळात भारत सरकार नेपाळच्या पाठीशी
प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या सीमावर्ती भागांमध्ये, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांसह एनडीआरएफला उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले
Posted On:
26 AUG 2026 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2026
नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्र सरकारचे बारकाईने लक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नेपाळमधील आपत्तीसंदर्भात बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे की, नेपाळमधील पुरामुळे झालेली हानी अत्यंत दुःखद आहे. या आपत्तीत ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करतो. भारत सरकार या संकटाच्या काळात नेपाळच्या पाठीशी उभे आहे. नेपाळमधील आपत्तीसंदर्भात आपण बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. संभाव्य परिणाम होण्याची शक्यता असलेल्या सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.
केंद्रीय जल आयोगाच्या सल्ल्यानुसार आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, नेपाळ-चीन सीमेजवळ अचानक आलेल्या पुरामुळे किंवा ‘ग्लोफ’मुळे म्हणजेच हिम सरोवर किंवा हिमनदी अचानक फुटल्यामुळे, भारतीय सीमेपासून सुमारे 160 किमी अंतरावर असलेल्या नेपाळमधील फुरके खोला येथे त्रिशुली नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याचे वृत्त आहे. या पुराचा परिणाम पुढे भारतातील गंडक नदीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारांनी भारत-नेपाळ सीमेजवळ राहणाऱ्या स्थानिक भारतीय नागरिकांच्या समुदायांसाठी आवश्यकतेनुसार स्थलांतर तसेच इतर मदत उपलब्ध करून देणे अशी मदत पुरविण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही राज्यांना सतर्कतेचा आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह गृह मंत्रालयाचे अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या बाजूला असलेल्या जलाशयांमधील पाण्याची पातळी कमी होत आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. घाबरण्याजोगी कोणतीही परिस्थिती निर्माण झालेली नाही.
नेपाळच्या हद्दीत काही भारतीय पर्यटक बेपत्ता झाल्याच्या बातम्या आहेत. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदत आणि माहितीसाठी काठमांडू इथल्या भारतीय दूतावासाने आपात्कालीन संपर्क क्रमांक जारी केले आहेत. मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांनी दूतावासाच्या पुढील हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा - +977 985 131 6807 आणि +977 970 910 7500
* * *
सुवर्णा बेडेकर/निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303602)
अभ्यागत कक्ष : 9