वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या मोरोक्को दौऱ्याचा यशस्वी समारोप


जितिन प्रसाद भुषवले भारत-मोरोक्को संयुक्त आयोगाच्या 7 व्या बैठकीचे सहअध्यक्षपद

जितिन प्रसाद यांच्या दौऱ्यामुळे भारत आणि मोरोक्को मधील आर्थिक भागीदारीला मिळाली बळकटी, 7 व्या संयुक्त आयोगामुळे व्यापार आणि गुंतवणूक सहकार्यालाही मिळाली नवी गती

आगामी पाच वर्षांत परस्परांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यावर भारत आणि मोरोक्कोची सहमती, संयुक्त कार्यगटाच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाच्या व्यापार कराराची शक्यता तपासली जाणार

Posted On: 26 AUG 2026 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑगस्‍ट 2026

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या मोरोक्को दौऱ्याचा यशस्वी समारोप झाला. 24 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी मोरोक्कोला भेट दिली. आपल्या या दौऱ्यात त्यांनी मोरोक्कोचे वरिष्ठ मंत्री आणि इतर महत्वाच्या व्यक्तींसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी मोरोक्कोच्या उद्योग आणि व्यापार मंत्र्यांचे परराष्ट्र व्यापाराचे प्रभारी राज्यमंत्री महामहीम ओमर हेजिरा यांच्यासोबत भारत - मोरोक्को संयुक्त आयोगाच्या 7 व्या सत्राच्या बैठकीचे सह अध्यक्षपदही भूषवले.

आपल्या या दौऱ्यात जितिन प्रसाद मोरोक्को - भारत व्यावसायिक मंचाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले. त्यांनी मोरोक्कोच्या वरिष्ठ मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या, तिथल्या भारतीय उद्योग व्यावसायिक समुदायाशी संवाद साधला. या दौऱ्यात जितिन प्रसाद यांनी मोरोक्कोच्या ओसीपी समुहाची (ऑफिस शेरीफियन दे फॉस्फेट्स) भारतीय भागीदारांसोबतची संयुक्त कंपनी असलेल्या इंडिया - मारोक फॉस्फोरच्या (IMACID - India-Maroc Phosphore) उत्पादन केंद्राला भेट दिली. या भेटीत त्यांनी, तसेच फॉस्फेट आणि खत क्षेत्रातील भारत आणि मोरोक्कोमधील दीर्घकालीन भागीदारीचा आढावा घेतला. यावेळी जितिन प्रसाद यांच्यासोबत भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) नेतृत्वाखालील उच्चस्तरीय व्यापारी प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते.

भारत-मोरोक्को संयुक्त आयोगाची 7 वी बैठक

भारत-मोरोक्को संयुक्त आयोगाच्या 7 व्या बैठकीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आर्थिक भागीदारीला नवी गती मिळाली आहे. या बैठकीअंतर्गत दोन्ही देशांमधील व्यापाराचा विस्तार करण्यासाठी, बाजारपेठेतील अधिक सुलभतेने पाऊल टाकता येण्यासाठी, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्याला चालना देण्यासाठी, तसेच भारतीय आणि मोरोक्कोच्या उद्योग व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने परस्पर  सहकार्याचा एक विस्तारीत आराखडाही प्रस्थापित केला गेला.

या बैठकीत दोन्ही देशांनी परस्परांमधील द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला. यासोबतच व्यापार, गुंतवणूक, उद्योग, खते, शेती, औषधनिर्माण, ऊर्जा, खाणकाम, डिजिटल परिवर्तन, वाहतूक आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी तसेच त्यात वैविध्य आणण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 2025 मध्ये दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार सुमारे 4 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला असल्याची बाब या बैठकीत मांडली गेली. यातून दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारी संबंध सातत्याने दृढ होत असल्याचीही प्रचिती आली.

वस्तू आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांमधील परस्पर व्यापारात वैविध्यकरण घडवून आणल्याने तसेच या क्षेत्रांशी संबंधीत बाजारपेठांच्या उपलब्धतेचा विस्तार केल्याने, द्विपक्षीय आर्थिक संबंधांअंतर्गत आजवर उपयोग करून न घेतलेल्या, प्रचंड क्षमतांचा उपयोग करून घेण्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकेल ही बाबही दोन्ही देशांनी या बैठकीत अधोरेखीत केली. याअनुषंगानेच आगामी पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या दिशेने काम करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.

व्यापारी प्रतिनिधीमंडळांमध्ये नियमित संवाद, संभाव्य संधींच्या शक्यतांचा शोध घेणाऱ्या मोहिमा, तसेच परस्पर संपर्काचा विस्ताराच्या अनुषंगाने आखलेले उपक्रम यामुळे उद्योग व्यावसायाच्या नव्या संधींचा शोध घेता येईल, बाजारपेठांची अधिक सुलभतेने उपलब्ध करून देता येतील, तसेच मोरोक्को आणि भारतीय कंपन्यांमधील शाश्वत भागीदारी आणि संयुक्त उपक्रमांना प्रोत्साहन देता येईल यावरही दोन्ही देशांनी समहमती व्यक्त केली. यातून या बैठकीत निश्चित केलेली ध्येय साध्य करता येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

एक संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध करून देत द्विपक्षीय अजेंडा पुढे नेण्यासाठी भारत-मोरोक्को संयुक्त कार्यगट स्थापन करण्यास सहमती दर्शवली. या कार्यगटामार्फत द्विपक्षीय व्यापार विकासाच्या संधी तसेच भारत आणि मोरोक्को दरम्यान प्राधान्य व्यापार कराराची व्यवहार्यता तपासली जाणार आहे. 

कृषी क्षेत्रात शाश्वत शेती, अन्न सुरक्षा, एसपीएस उपाययोजना (स्वच्छताविषयक आणि वनस्पती स्वच्छतेविषयक मानके), अन्न सुरक्षा, कृषी संशोधन, डिजिटल शेती, जैवतंत्रज्ञान आणि कृषी मूल्य साखळी यांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.

संयुक्त आयोगाच्या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी 2026-2030 या काळात सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमावरही स्वाक्षरी केली.

मोरोक्को-भारत व्यवसाय मंच: गुंतवणूक आणि भागीदारीसाठी प्राधान्य क्षेत्रे

जितिन प्रसाद यांनी वाहन उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा, स्टार्ट-अप्स तसेच वित्त, खते आणि रसायने, आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण यासह वाढीव व्यवसाय आणि गुंतवणूक सहकार्यासाठीच्या प्रमुख क्षेत्रांवर भर दिला. 

प्रसाद यांनी ईव्ही घटक आणि अचूक उप-असेंब्लीसह ऑटोमोटिव्ह मूल्य साखळी; सौरऊर्जा, ऊर्जा साठवण आणि ग्रिड व्यवस्थापनासह नवीकरणीय ऊर्जा; स्टार्ट-अप्स, फिनटेक आणि वित्त; कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच आरोग्यसेवा; आणि औषधनिर्माण क्षेत्र, रुग्णालये, निदान, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि डिजिटल आरोग्य या क्षेत्रात अधिक सखोल सहकार्याच्या संधींवर प्रकाश टाकला.

भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेने देऊ केलेल्या संधींचाही त्यांनी उल्लेख केला. मोरोक्कन व्यावसायिकांनी भारतात गुंतवणूक करावी, संयुक्त उपक्रम उभारावेत तसेच भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका: व्यापार, गुंतवणूक आणि डिजिटल सहकार्याला चालना

जितिन प्रसाद यांनी मोरोक्कोचे परराष्ट्र व्यापार राज्य सचिव ओमर हेजिरा तसेच उद्योग आणि व्यापार मंत्री रियाद मेझौर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या.

प्रसाद यांनी गुंतवणूक मंत्री करीम झिदान तसेच डिजिटल संक्रमण आणि प्रशासकीय सुधारणा मंत्री डॉ.अमल एल फल्लाह सेघरौचनी यांचीही भेट घेतली.

या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, उद्योग आणि डिजिटल परिवर्तन या क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यावर आणि विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात परस्पर लाभदायक आर्थिक सहभागासाठी नवीन क्षेत्रे ओळखण्यावर भर देण्यात आला.

भारतीय व्यावसायिक समुदायासोबत संवाद आणि जनतेतील परस्पर संबंध

जितिन प्रसाद यांनी मोरोक्कोमधील भारतीय व्यावसायिक समुदाय आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला. भारत-मोरोक्को संबंध दृढ करण्यात भारतीय समुदायाची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

भारतीय व्यवसायांना मोरोक्कोसोबतचे आपले सहकार्य आणखी वाढवावे आणि विविध क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भारतीय आणि मोरोक्कन उद्योगांमध्ये अधिक सहकार्याच्या संभाव्यतेवर भर दिला.

  

 

* * *

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303579) अभ्यागत कक्ष : 10