दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरार्दित्य माधवराव सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात 12 वी 'ब्रिक्स' दूरसंचार मंत्री बैठक ; शाश्वत माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान (आयसीटी) पायाभूत सुविधा आणि डिजिटल सर्वसमावेशकतेवर दिला भर
जागतिक मंचांवर 'ब्रिक्स'ची भूमिका उत्तरोत्तर अधिक महत्त्वाची ठरत आहे: ज्योतिरार्दित्य सिंधिया
Posted On:
21 AUG 2026 8:12PM by PIB Mumbai
भारताच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रात पुणे येथे, 12 वी ब्रिक्स दूरसंचार मंत्री बैठक पार पडली. भारताचे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरार्दित्य माधवराव सिंधिया यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीला ब्रिक्स सदस्य देशांचे दूरसंचार मंत्री आणि प्रतिनिधीमंडळांचे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरार्दित्य माधवराव सिंधिया यांनी भारताच्या अध्यक्षतेखालील आयसीटी ट्रॅकची संकल्पना “इनोव्हेट, को-ऑपरेट अँड ट्रान्सफॉर्म (ICT) फॉर अ रेझिलियंट फ्युचर" अर्थात “लवचिक भविष्यासाठी नवोन्मेष, सहकार्य आणि परिवर्तन” मांडली. या संकल्पनेचे चार प्रमुख स्तंभ आहेत — शाश्वत आणि मजबूत डिजिटल व आयसीटी परिसंस्था, सायबर सुरक्षा आणि विश्वासार्ह आयसीटी, डिजिटल कौशल्य विकास व क्षमता बांधणी, तसेच नवोन्मेष, स्टार्टअप्स आणि उद्योजकता.

या बैठकीपूर्वी 17 ते 19 ऑगस्ट 2026 दरम्यान आयसीटींमधील सहकार्यासाठी ब्रिक्स कार्य गटाची 7वी बैठक, ब्रिक्स भावी नेटवर्क संस्थेच्या परिषदेची बैठक, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील लक्ष केंद्रित करणाऱ्या गटाची बैठक आणि डिजिटल ब्रिक्स कार्यगटाची बैठक झाली. तसेच, 20 आणि 21 ऑगस्ट 2026 रोजी डिजिटल ब्रिक्स मंच आणि एक्सपोचे आयोजन करण्यात आले.

ब्रिक्स देशांच्या मंत्रिस्तरीय शिष्टमंडळांच्या प्रमुखांनीही या बैठकीत भाषणे केली. भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या वर्षात सर्व सदस्य देशांनी दिलेल्या सहभागाबद्दल त्यांचे आभार मानले आणि आगामी वर्षात अध्यक्षपद स्वीकारणाऱ्या देशाला दिलेल्या पाठिंब्याबद्दलही प्रशंसा केली.

केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना 12व्या ब्रिक्स संचार मंत्र्यांच्या बैठकीचे प्रमुख निष्कर्ष आणि त्याचा जागतिक स्तरावरील प्रभाव यांची माहिती दिली. ते म्हणाले, “गेल्या दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात झालेला परिवर्तनाचा प्रवास अभूतपूर्व आहे.”
त्यानंतर मंत्र्यांनी डिजिटल ब्रिक्स मंच एक्स्पोला भेट दिली. यावेळी त्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्यांनी सादर केलेल्या परस्परसंवादी प्रदर्शनांचा आणि अत्याधुनिक दूरसंचार उपाययोजनांचा आढावा घेतला. पाच दिवसांच्या या कार्यक्रमाची सांगता भेट देणाऱ्या प्रतिनिधींसाठी आयोजित करण्यात आलेल्या सहलीने झाली. या सहलीदरम्यान पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्यात आले.
***
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2302205)
अभ्यागत कक्ष : 62