वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
डीपीआयआयटीने स्टार्ट अप परिसंस्था मजबूत करण्यासाठी आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी फोनपे आणि शेल इंडियासोबत केले सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
20 AUG 2026 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2026
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या डीपीआयआयटी अर्थात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने, डीपीआयआयटी मान्यताप्राप्त स्टार्टअप्सना पाठबळ अधिक बळकट करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये नवोन्मेषाला चालना देण्यासाठी फोन पे आणि शेल इंडिया प्रा. लि. सोबत 19 ऑगस्ट 2026 रोजी सामंजस्य करार केले.
तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, मार्गदर्शन, बाजारपेठेतील संधी आणि उद्योग क्षेत्रातील संपर्क जाळ्यापर्यंत पोहोच विस्तारणे, तसेच देशात एक सक्षम, सर्वसमावेशक आणि आत्मनिर्भर स्टार्टअप परिसंस्था विकसित करणे हा या भागीदारींचा उद्देश आहे.
डीपीआयआयटीसोबतच्या सहयोगाअंतर्गत फोनपे डीपीआयआयटी मान्यताप्राप्त स्टार्टअप्सना अनेक प्रकारचे लाभ पुरवेल. यात आपल्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन क्रेडिट्स, इंडस अँपस्टोअरपर्यंत पोहोच, समर्पित ऑनबोर्डिंग आणि पाठबळ सेवा आणि ब्रँड दृश्यमानता अधिक वाढवण्यासाठी संधी, यांचा समावेश आहे. स्टार्टअप्सना आपल्या क्षमता अधिक बळकट करण्यासाठी आणि वाढीची गती वाढवण्यासाठी, फोनपे नियमितपणे मास्टरक्लासेस आणि वेबिनार्स आयोजित करेल. यात फिनटेक, विक्री, गो-टू-मार्केट नीती आणि व्यवसाय विस्तार, अशा विषयांचा समावेश असेल.
शेल इंडियासोबतचा सामंजस्य करार, ऊर्जा आणि हवामान तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टार्टअप्सना पाठबळ पुरवण्यावर लक्ष केंद्रित करेल. या भागीदारीतून शेल इंडिया, मार्गदर्शन, धोरणात्मक सल्ला, गुंतवणूकदार व इनक्यूबेटर्सशी संपर्क आणि शेल ई4 स्मार्ट एनर्जी ट्रॅकमध्ये सहभागी होण्याची संधी पुरवेल. हा पुढाकार स्टार्टअप्सना वाढीच्या संधी पुरवण्यास, नवोन्मेषी उपायांची व्याप्ती वाढवण्यास आणि देशाच्या स्वच्छ ऊर्जेकडे होणाऱ्या संक्रमणात योगदान देईल, अशी अपेक्षा आहे.
याव्यतिरिक्त,शेल इंडियासोबतच्या सहयोगातून ऊर्जा आणि हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप परिसंस्थेमधील उदयोन्मुख नवोन्मेष आणि सर्वोत्तम पद्धतींकडे लक्ष वेधणाऱ्या क्षेत्रीय यशोगाथा, श्वेतपत्रिका, धोरण सारांश, उद्योग स्थिती अहवाल आणि केस स्टडीज तयार करून ज्ञान आदानप्रदान आणि परिसंस्थेच्या विकासाला चालना मिळेल.
या भागीदारींमुळे स्टार्टअप्सना डिजिटल पायाभूत सुविधा, उद्योगविषयक ज्ञान, मार्गदर्शन, बाजारपेठेशी दुवे आणि गुंतवणुकीच्या संधी मिळवणे अधिक सुलभ होऊन त्यांना शाश्वत विस्तार, नवोन्मेषाला चालना आणि देशाच्या आर्थिक विकासात व तांत्रिक प्रगतीत योगदान देणे शक्य होईल, अशी अपेक्षा आहे.
माधुरी पांगे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301694)
आगंतुक पटल : 6