वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी उच्चस्तरीय द्विपक्षीय तसेच व्यावसायिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भारत-सिंगापूर आर्थिक भागीदारी मजबूत केली
Posted On:
20 AUG 2026 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2026
भारत आणि सिंगापूर या देशांदरम्यान प्रदीर्घ काळापासून असलेल्या आर्थिक भागीदारीला बळ देत तसेच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांतील सहकार्य आणखी पुढे नेत, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल दिनांक 20ऑगस्ट 2026 रोजी विविध उच्चस्तरीय द्विपक्षीय तसेच व्यावसायिक कार्यक्रमात सहभागी झाले.
इस्ताना येथे सिंगापुरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांची भेट घेऊन केंद्रीय मंत्री गोयल यांनी आजच्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर ते हॉटेल शांग्री-ला येथे आयोजित चौथ्या भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत (आयएसएमआर)तसेच भारत-सिंगापूर व्यावसायिक गोलमेज परिषदेत (आयएसबीआर) सहभागी झाले. या गोलमेज परिषदांनी द्विपक्षीय आर्थिक कार्यक्रम आणखी बळकट करण्याचे मार्ग शोधून काढण्यासाठी तसेच दोन्ही देशांतील परस्पर लाभदायक सहकार्याचे नवे मार्ग निश्चित करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला. या गोलमेज परिषदांनंतर सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
यानंतर, गोयल यांनी अनेक सरकार-ते-व्यापार(जीटूबी) बैठका घेतल्या. यामध्ये ग्लोबल फायनान्स आणि तंत्रज्ञान नेटवर्क (जीटीएफएन) आणि केपेल इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या जागतिक व्यापार आणि संस्थात्मक समुदायाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकांचा समावेश होता. यावेळी झालेल्या चर्चांमध्ये कृषी-निर्यात, जीसीसी-आधारित व्यावसायिक पार्क्स, अर्थतंत्रज्ञान आणि शाश्वत पायाभूत सुविधा यांसह अनेक क्षेत्रांमध्ये भारत-सिंगापूर सहकार्य वाढवण्यावर अधिक भर देण्यात आला.
केंद्रीय मंत्री गोयल यांनी सिंगापुरच्या परदेश व्यवहार आणि व्यापार तसेच उद्योग या विभागांच्या मंत्री गॅन सिओ हुआंग यांच्यासमवेत संयुक्तपणे सिटी स्क्वेअर मॉलमधील अपेडा-रास्त भाव उपक्रमाला भेट दिली. या कार्यक्रमाने वाढता कृषी व्यापार तसेच भारत आणि सिंगापूर यांच्यातील विस्तारत जाणारे बाजारपेठांचे दुवे अधोरेखित केले.
संध्याकाळी, गोयल यांनी आयएनएसईएडी आशिया परिसरात, फिक्कीतर्फे आयोजित, भारत-सिंगापूर व्यापारी मंचामध्ये भाग घेतला. तसेच त्यांनी “नव्या जागतिक विकास समीकरणात भारत:आशिया आणि जगातील व्यवसायांसाठी विकास आणि संधी” या विषयावरील अनौपचारिक संवादात देखील भाग घेतला आणि त्यानंतर व्यापारी समुदायातील सदस्यांसमवेत संवादात्मक प्रश्नोत्तरांचे सत्र पार पाडले.
या सर्व कार्यक्रमांनी भारत-सिंगापूर आर्थिक भागीदारीतील सशक्त गतीशीलतेची तसेच परस्पर लाभदायक विकासासाठी नव्या संधी निर्माण करतानाच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि व्यवसाय ते व्यवसाय दुवे अधिक दृढ करण्याप्रती भारताच्या बांधिलकीची पुन्हा एकदा खात्री पटवून दिली.
चौथ्या भारत-सिंगापूर गोलमेज परिषदेत भारतीय बाजूकडून केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन; केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तसेच केंद्रीय वाणिज्य विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद सहभागी झाले होते.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2301659)
अभ्यागत कक्ष : 52