दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ब्रिक्स आयसीटी कार्यगटाची 7 वी बैठक पुण्यात सुरू; डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल प्रशासनावर धोरणात्मक भर
डिजिटल ब्रिक्स टास्क फोर्स कडून डिजिटल ॲप्लिकेशन्स आणि प्रशासनाशी संबंधित तज्ज्ञ गटांसाठीचे व्हिजन सादर
प्रविष्टि तिथि:
18 AUG 2026 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2026
ब्रिक्स आयसीटी क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या कार्यगटाची 7 वी बैठक आणि त्याअंतर्गत होणाऱ्या प्रत्यक्ष चर्चासत्रांच्या दुसऱ्या दिवशी, पुण्यात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा वरील फोकस ग्रुप आणि डिजिटल ब्रिक्स टास्क फोर्स यांची बैठक झाली.

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा बाबतच्या फोकस ग्रुप च्या कार्यकक्षा 2025 मध्ये स्वीकारण्यात आल्या होत्या. या बैठकीत अध्यक्षांकडून अद्ययावत माहिती देण्यात आली, तसेच भारत आणि इतर सदस्य देशांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबतच्या आपापल्या राष्ट्रीय व्हिजनचे सादरीकरण केले. डिजिटल सेवांचे परवडणारे, सर्वसमावेशक, विश्वसनीय, सुरक्षित, शाश्वत आणि नागरिक-केंद्रित वितरण करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा हे एक अत्यंत महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. या सुविधांची अंमलबजावणी करताना खुलेपणा, आंतर-कार्यक्षमता, डिजिटल सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय मालकी या तत्त्वांचे पालन केले जाते; तसेच देशांतर्गत कायदे व नियम, सायबर सुरक्षा, लवचिकता, गोपनीयता आणि विश्वास या बाबींचाही आदर राखला जातो.

भारताने डीपीआय वरील फोकस ग्रुपमधील चर्चेला गती दिली. भारताने ब्रिक्स देशांसमोर आपली डीपीआय प्रणाली सादर केली, तसेच ब्रिक्स डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा अर्थात डीपीआय भांडार आणि डीपीआय उपाययोजनांवरील ब्रिक्स प्रायोगिक प्रकल्प यांबाबतची संकल्पना- नोंद सादर केली.
कार्यगटाला वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध वेबिनार्सचे अहवाल सादर करण्यात आले. यामध्ये सुरक्षित, सर्वसमावेशक आणि शाश्वत डिजिटल दूरसंचार पायाभूत सुविधांसाठी क्षमता-बांधणी, ब्रिक्स समुद्राखालील केबल नेटवर्क सहकार्य व विकास आणि ब्रिक्स डिजिटल परिसंस्था सहकार्य या विषयांचा समावेश होता.


डिजिटल ब्रिक्स टास्क फोर्सने आपल्या कामकाजाचा आढावा घेतला आणि डिजिटल ब्रिक्स फोरम 2026 बाबतची माहिती दिली. तसेच, डिजिटल ॲप्लिकेशन्स तज्ञ गट' आणि डिजिटल प्रशासन तज्ञ गट यांच्यासाठीच्या प्रस्तावित कार्यकक्षेच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली.

कार्यगटाचे कामकाज उद्या (19 ऑगस्ट रोजी) संपन्न होईल. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी डिजिटल ब्रिक्स फोरम आणि एक्स्पो तसेच 21 ऑगस्ट रोजी 12 वी ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांची बैठक' होणार आहे.
सुवर्णा बेडेकर / राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301010)
आगंतुक पटल : 22