युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना युवा शक्तीच्या क्षमतेवर आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षांवर प्रकाश टाकला; 2036 च्या ऑलिम्पिकसाठी देशव्यापी क्रीडा प्रतिभा शोध मोहीम जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याच्या प्रवासात क्रीडा क्षेत्र आणि युवा शक्तीची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित केली.
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2026 4:22PM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी देशातील संपूर्ण क्रीडाक्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचा उल्लेख करताना सांगितले, “TOPS योजनेला मोठे यश मिळाले आहे. खेलो इंडिया गेम्स, युनिव्हर्सिटी गेम्स, विंटर गेम्स, बीच गेम्स, क्रीडा पायाभूत सुविधा, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा वैद्यकशास्त्र आणि क्रीडा पोषण अशा सर्वच क्षेत्रांत भारत उत्कृष्टतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. तरुणांना स्वतः खेळाडू बनता आले नाही, तरीही क्रीडा क्षेत्राभोवती निर्माण होत असलेल्या साहाय्यक व्यवस्थेत त्यांच्यासाठी संधींचे एक विशाल नवे दालन खुले होत आहे.”
रोजगाराच्या मुद्यावर बोलताना पंतप्रधानांनी ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. ही योजना आगामी काळात देशातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले, “आज 15 ऑगस्ट रोजी माझ्या देशातील युवकांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना सुरू करून तिची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ आज 15 ऑगस्टपासून लागू होत आहे. या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रात नोकरी मिळवणाऱ्या प्रत्येक तरुणाला—मुलगा असो वा मुलगी—सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील. तसेच, नव्या रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन दिले जाईल. ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ सुमारे 3.5 कोटी तरुणांसाठी नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करेल.”
पंतप्रधानांनी जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, “जागतिक क्रीडा क्षेत्रातील भारताची कामगिरी सातत्याने सुधारत आहे आणि 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी आपण एक मजबूत दावेदार म्हणून पुढे जात आहोत. तसेच, 2030 मध्ये भारत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचेही यजमानपद भूषवणार आहे.”
पंतप्रधानांनी नमूद केले की, ऑलिम्पिकमध्ये सुमारे 40 क्रीडा प्रकार आणि 325 ते 350 स्पर्धांचा समावेश असतो. भारताने या विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, “या 325 पैकी जवळपास दोन तृतीयांश स्पर्धांमध्ये भारत सहभागीही होत नाही. या स्पर्धांमध्ये आपली उपस्थिती नाही; आपण पात्र ठरत नाही. 2036 चे ऑलिम्पिक भारतात आयोजित करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यामुळे भारताने या क्रीडा प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच, आम्ही देशव्यापी क्रीडा प्रतिभा शोध मोहीम सुरू करू इच्छितो.”
पंतप्रधान मोदी यांनी या महत्त्वाकांक्षेला दीर्घकालीन क्रीडा प्रतिभा शोध मोहिमेशी जोडले. ते म्हणाले, “2036 मध्ये आपल्याला दर्जेदार खेळाडू घडवायचे असतील, तर आज 5, 10 किंवा 15 वर्षे वयाच्या मुला-मुलींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या मुलींकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे. देशभरातील गावांमध्ये, शहरांमध्ये आणि शाळांमध्ये क्रीडा प्रतिभा शोध मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेद्वारे 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांमधील क्रीडा गुण आणि प्रतिभा ओळखण्यात येईल.”
या मोहिमेद्वारे निवड झालेल्या मुला-मुलींच्या क्रीडा क्षमतेचे मूल्यमापन करण्यात येईल आणि त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. देशाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम असे दर्जेदार खेळाडू म्हणून त्यांचा विकास व्हावा, यासाठी त्यांच्या प्रतिभेला योग्य दिशा आणि आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल.
पंतप्रधानांनी तरुणांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाच्या गंभीर समस्येकडेही लक्ष वेधले आणि या आव्हानाचा सामना करण्यासाठी देशाने एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “अमली पदार्थांचे व्यसन ही देशासमोरील आणि विशेषतः तरुणांसमोरील एक मोठी समस्या बनत आहे. ‘नशामुक्त भारत’ ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असली पाहिजे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाची युवा पिढी सशक्त असणे आवश्यक आहे आणि आपल्या युवकांच्या सामर्थ्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे.”
भारताच्या विकासातील युवा शक्तीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, “जर भारताच्या विकासाचा खरा आधार कोणता असेल, तर तो म्हणजे माझ्या देशातील युवक आणि देशाची युवा शक्ती. ‘विकसित भारता’च्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”
ते पुढे म्हणाले, “म्हणूनच, आपल्या युवकांच्या आकांक्षा आणि त्यांच्या सक्रिय सहभागाला ‘विकसित भारता’च्या ध्येयाशी जोडून हे उद्दिष्ट पुढे नेले पाहिजे. युवकांना सर्वोच्च प्राधान्य देत आपण पुढे वाटचाल केली पाहिजे.”
देशातील उद्योजकतेच्या क्षेत्राचा विस्तार अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, "‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमांतर्गत आता देशभरात 2.5 लाखांहून अधिक स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे.” सरकारच्या 1 लाख कोटी रुपयांच्या इनोव्हेशन फंडाचाही उल्लेख करत त्यांनी युवा उद्योजकांना प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, “तुमची स्वप्ने घेऊन पुढे या; स्रोतांची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, याची आम्ही खात्री करू.”
कोचिंग क्लासेसच्या वाढत्या आर्थिक खर्चामुळे कुटुंबांवर, विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांवर पडणाऱ्या आर्थिक ताणाची दखल घेत पंतप्रधानांनी विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या नव्या उपक्रमाची घोषणा केली. ते म्हणाले, “कोचिंग क्लासेसचा खर्च हा आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा आर्थिक भार बनला आहे.” ते पुढे म्हणाले, “म्हणूनच, विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना मोफत ऑनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”
या उपक्रमाची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाईल, हे स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले, “आपल्याकडे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहेत, उत्तम प्रतिभावान मनुष्यबळ आहे आणि अनुभवी शिक्षकही आहेत. या सर्व स्रोतांना एकत्र आणून देशातील युवकांना मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही एक व्यापक व्यवस्था उभारणार आहोत.”
***
शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2300054)
आगंतुक पटल : 7