उपराष्ट्रपती कार्यालय
फाळणीच्या काळात मानवतेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सामूहिक स्थलांतरांपैकी एक स्थलांतर देशाने अनुभवले, फाळणी वेदना स्मृती दिनाच्या कार्यक्रमात, उपराष्ट्रपतींचे उद्गार
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2026 6:08PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन यांनी आज फाळणी वेदना स्मृती दिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले. दिल्ली विद्यापीठाच्या अखत्यारीतील, स्वातंत्र्य आणि फाळणी अध्ययन केंद्र यांनी, भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (ICHR), यांच्या सहकार्याने हे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राची संकल्पना, ‘ भारताची फाळणी- स्थलांतर, विभक्त होणे आणि पुनर्वसन’ अशी होती, ज्यात भारताच्या 1947 साली झालेल्या फाळणीच्या घटनेवर भर देण्यात आला होता.
यावेळी बोलतांना, उपराष्टपतींनी, फाळणीच्या वेदना सहन करणाऱ्या, आणि त्या चर्चासत्राला उपस्थित असलेल्या सर्व लोकांविषयी आदरभावना व्यक्त केली. इतिहासातील या “सर्वाधिक दु:खद आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांपैकी एका घटनेवर” प्रतिक्रिया देण्यासाठी आपण इथे जमलो आहोत, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.
फाळणीच्या स्मृतींची आठवण करण्यामागचा हेतू, जुन्या जखमांवरची खपली काढून कटुता निर्माण करणे हा नाही, तर त्यातून धडा घेऊन, भविष्यात अधिक एकोपा आणि सौहार्द निर्माण करणे हा आहे, यावर त्यांनी भर दिला. जेव्हा भारत आपला स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज होतो आहे, अशा वेळी, आपण क्षणभर थांबून, फाळणीमुळे ज्यांचा बळी गेला, किंवा ज्यांना त्याच्या वेदना सहन कराव्या लागल्या, त्यांचे स्मरण करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वातंत्र्यामुळे भारताला वसाहतवादी राजवटीतून मुक्ती मिळाली; मात्र त्यासोबत अभूतपूर्व शोकांतिका आणि मानवी इतिहासातील सर्वांत मोठ्या सामूहिक स्थलांतरांपैकी एक, देशाच्या फाळणीमुळे घडले. विभाजन आणि द्वेषाचे किती विनाशकारी परिणाम होऊ शकतात, याचा आजही गंभीर इशारा देणारी या शोकांतिकेची व्याप्ती आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
दिल्ली विद्यापीठाने, स्वातंत्र्य आणि फाळणीचा अभ्यास करण्यासाठी 2023 साली स्थापन केलेल्या, या इतिहासाचे जतन आणि अध्ययन करण्यासाठी समर्पित अशा या केंद्राविषयी उपराष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. अल्पावधीतच, या केंद्राने, फाळणीच्या वेदनांचा अनुभव घेतलेल्या 100 पेक्षा अधिक लोकांच्या मौखिक मुलाखती रेकॉर्ड केल्या, तसेच व्याख्याने, जुन्या नोंदी आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमातून युवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याही प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
“आपल्या मुलांना फाळणीचे वास्तव माहीत असणे आवश्यक आहे,” असे राधाकृष्णन म्हणाले. एवढ्या मोठ्या व्याप्तीची शोकांतिका पाठ्यपुस्तकातील काही ओळींपुरती मर्यादित करता येणार नाही, यावर त्यांनी भर दिला. भूतकाळाचे स्मरण जे ठेवत नाहीत, त्यांच्या बाबतीत त्याच शोकांतिका पुन्हा घडण्याचा धोका असतो, या चिरंतन शिकवणीचीही त्यांनी यावेळी आठवण करून दिली.
फाळणीच्या व्यापक ऐतिहासिक परिणामांविषयी बोलतांना, उपराष्ट्रपती म्हणाले, की त्यावेळी अत्यंत घाईघाईत ज्याप्रकारे देशाच्या सीमा आखल्या गेल्या, त्यामुळे, आजही आपण सीमांच्या वादाचे गंभीर परिणाम भोगतो आहोत. या फाळणीचा, भारताचे संरक्षण धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि शेजारी देशांशी असलेले संबंध, अशा सगळ्यावर दीर्घकाळ टिकणारा परिणाम झाला, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.फाळणीतून मिळालेले धडे आणि संकटाच्या काळात नेतृत्वाचे महत्त्व याबाबत सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, व्यापक राष्ट्रीय हितासाठी कठोर निर्णय घेताना राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती आणि करारीपणा अत्यंत महत्त्वाचे असतात.
फाळणीच्या काळातील घटनांची आठवण करून देत, उपराष्ट्रपतींनी सज्जता आणि जबाबदारीने निर्णय घेण्याच्या महत्त्वावर भर दिला. लोकांच्या सुरक्षिततेवर परिणाम करणारे निर्णय घेताना पुरेशी पूर्वसूचना देणे आवश्यक असते, असे त्यांनी नमूद केले. सर्वांची सुरक्षितता याला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवे यावर त्यांनी विशेष भर दिला.
त्यांनी पुढे नमूद केले की, फाळणी ही केवळ राजकीय सीमा नव्याने आखणे नव्हते , तर हजारो वर्षांपासून परस्परांशी जोडलेल्या एका सांस्कृतिक क्षेत्राचीही ती विभागणी होती. त्यांनी सिंधू नदी, कर्तारपूर साहिब, ननकाना साहिब, प्राचीन शक्तिपीठे आणि हडप्पा, मोहेंजोदारो व तक्षशिला यांसारख्या पुरातत्वीय वारशासह अनेक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्थळांशी संपर्क तुटल्याचा उल्लेख केला.
उपराष्ट्रपतींनी नागरिकांना संकुचित अस्मितांपेक्षा राष्ट्राला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आणि कोणतीही जात, धर्म किंवा प्रदेश देशापेक्षा अधिक महत्वाचे असू शकत नाही यावर भर दिला . ते म्हणाले की, प्रत्येक भारतीयाला भारतीय असल्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि देशाला एका सूत्रात बांधणाऱ्या सामायिक सांस्कृतिक वारशाची व राष्ट्रीय अस्मितेप्रति जागरूक रहायला हवे.
याप्रसंगी, उपराष्ट्रपतींनी फाळणीच्या काळातील घटनांमधून वाचलेल्या 15 जणांना त्यांच्या साहस , जिद्दीबद्दल तसेच फाळणीच्या आठवणी आणि अनुभव जतन करण्यातील योगदानाबद्दल सन्मानित केले.
उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना 'अमली पदार्थांपासून दूर राहण्याची' शपथही दिली आणि तरुण पिढीला अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आणि आपल्या भविष्यासाठी आरोग्यदायी, जबाबदार व विधायक निर्णय घेण्याचे आवाहन केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, 'फाळणी वेदना स्मृती दिन देशाला ही जाणीव करून देतो की स्वातंत्र्य मौल्यवान आहे, एकता अत्यावश्यक आहे आणि शांतता कधीही गृहीत धरता येणार नाही.
या प्रसंगी, उपराष्ट्रपतींनी ICHR आणि दिल्ली विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका प्रदर्शनालाही भेट दिली. फाळणीमुळे मानवाला जी प्रचंड किंमत मोजावी लागली, त्याची प्रबळ आठवण या प्रदर्शनातील गोष्टी करून देतात, असे त्यांनी नमूद केले.
या परिसंवादाला दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंग, ICHR चे अध्यक्ष प्रा. राघवेंद्र तन्वर, विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. बलराम पाणी, कुलसचिव डॉ. विकास गुप्ता यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, विद्यार्थी आणि फाळणीतून वाचलेले लोक उपस्थित होते.
***
शैलेश पाटील/राधिका अघोर/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2299716)
आगंतुक पटल : 12