संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल खेळ 2026 मध्ये 8 सुवर्ण पदकांसह एकूण 16 पदके जिंकणाऱ्या भारतीय लष्कराच्या तुकडीशी संरक्षण मंत्र्यांनी साधला संवाद


हे खेळाडू ‘सैनिक’ व ‘विजेता’ यांचे एक परिपूर्ण मिश्रण आणि प्रेरणेचा स्रोत - राजनाथ सिंह

प्रविष्टि तिथि: 14 AUG 2026 3:31PM by PIB Mumbai

 

स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये 8 सुवर्ण, 7 रौप्य आणि 1 कांस्य अशी 16 पदके जिंकणाऱ्या भारतीय लष्कराच्या तुकडीच्या सदस्यांशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 14 ऑगस्ट 2026 रोजी  संवाद साधला. या स्पर्धेत भारताने जिंकलेल्या 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा एकूण 39 पदकांपैकी भारतीय संरक्षण दलाच्या जवानांनी 18 पदके (लष्कराने 16 आणि  नौदलाने 2) जिंकली आहेत.

शारीरिक आणि मानसिक दबावावर मात करत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशाला अभिमानास्पद यश मिळवून दिल्याबद्दल भारतीय संरक्षण दलाच्या दृढ इच्छाशक्ती आणि ठाम विश्वासाचे संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात कौतुक केले. या कामगिरीला "असामान्य" असे संबोधून त्यांनी अधोरेखित केले की, हे खेळाडू जनतेसाठी,विशेषतः युवा वर्गासाठी प्रेरणेचा स्रोत आहेत, कारण ते "सैनिक आणि विजेता यांचे परिपूर्ण मिश्रण" आहेत.

मुष्टियुद्धात 6 सुवर्ण पदकांपैकी 4 सुवर्ण पदके महिला मुष्टिपटूंनी पटकाविल्याबद्दल, राजनाथ सिंह यांनी नमूद केले की ही कामगिरी भारताच्या वाढत्या नारी शक्तीची साक्ष आहे. या यशामुळे आणखी मुलींना हा खेळ खेळण्यासाठी आणि संरक्षण दलात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.

देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय विजेते पुढे येत आहेत, या वस्तुस्थितीची दखल घेत संरक्षण मंत्र्‍यांनी, आज क्रीडा क्षेत्राचे लोकशाहीकरण झाले आहे आणि ते आता काही निवडक लोकांचाच विशेषाधिकार राहिलेले नाही यावर भर दिला. त्यांनी आशियाई खेळ आणि ऑलिम्पिक सारख्या आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

चीफ ऑफ द आर्मी स्टाफ जनरल धीरज सेठ आणि भारतीय लष्कराच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन इथे या कार्यक्रमाला हजेरी लावली. 2026 ग्लासगो राष्ट्रकुल खेळांमधील भारतीय लष्कराच्या तुकडीने अनेक प्रकारचे यश प्रथमच मिळविले आणि विक्रमही केले. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे –

  • नायब सुभेदार सर्वेश कुशारे यांनी उंच उडीमध्ये भारताचे पहिले राष्ट्रकुल खेळांमधील रौप्य पदक जिंकले. ही भारतीय ॲथलेटिक्समधील एक ऐतिहासिक कामगिरी आहे.
  • नायब सुभेदार गुलवीर सिंह एकाच वर्षातील राष्ट्रकुल खेळांमध्ये दोन ॲथलेटिक्स पदके जिंकणारे पहिले भारतीय ॲथलीट ठरले; त्यांनी 10,000 मीटर शर्यतीत रौप्य आणि 5,000 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावले.
  • हवालदार हर्ष यांनी 60 किलो वजनी गटात स्पर्धा करताना ज्युडोमध्ये भारताचे राष्ट्रकुल खेळातील पहिले सुवर्ण पदक जिंकले. यामुळे देशात या खेळाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
  • सुभेदार सोमन राणा आणि लान्स नायक शुभम जुयाल यांनी राष्ट्रकुल खेळातील (दिव्यांगांसाठी) गोळाफेकीत भारतासाठी पहिली सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकून इतिहास रचला.
  • भारोत्तोलनात हवालदार अजय बाबू यांनी 79 किलो वजनी गटात विक्रमी कामगिरी केली, त्यांनी स्नॅचमध्ये 149 किलोचा खेळातील विक्रम आणि एकूण 330 किलो वजन उचलून प्रभावी कामगिरी नोंदवली.
  • मुष्टियुद्धात भारतीय लष्कराने 100 वर्षे जुना इंग्लंडचा विक्रम मोडीत काढून एक अभूतपूर्व ऐतिहासिक योगदान दिले. भारताने एकूण सात सुवर्ण पदके जिंकली; ही खेळांच्या एकाच आवृत्तीत मुष्टियुद्धात कोणत्याही देशाने जिंकलेली सर्वाधिक सुवर्ण पदके आहेत. या 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांपैकी, भारतीय लष्कराच्या मुष्टिपटूंनी 6 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके पटकावली.

हे यश खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी तसेच मिशन ऑलिम्पिक विंग आणि त्यांच्या उच्च कामगिरी केंद्रांचे अनेक वर्षांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, त्याग, व्यावसायिक मार्गदर्शन, क्रीडा विज्ञान सहाय्य आणि उत्कृष्टतेसाठीची अविचल वचनबद्धता दर्शवतात. ग्लासगो इथे देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भारतीय संरक्षण दलाच्या जवानांची यादी पुढीलप्रमाणे –

सुवर्ण पदक विजेते

1.  हवालदार साक्षी - मुष्टियुद्ध (51 किलो)

2.  नायब सुभेदार प्रीती - मुष्टियुद्ध (54 किलो)

3.  नायब सुभेदार जास्मिन - मुष्टियुद्ध (67 किलो)

4.  हवालदार अरुंधती चौधरी – मुष्टियुद्ध (70 किलो)

5.  हवालदार सचिन सिवाच - मुष्टियुद्ध (60 किलो)

6.  हवालदार अंकुश - मुष्टियुद्ध (80 किलो)

7.  हवालदार हर्ष सिंह - ज्युडो (60 किलो)

8.  सुभेदार सोमन राणा - (दिव्यांगांसाठी) गोळाफेक (एफ-57)

रौप्य पदक विजेते

1.  लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा - भालाफेक

2.  नायब सुभेदार सर्वेश - उंच उडी

3.  हवालदार जादुमणी सिंह - मुष्टियुद्ध (55 किलो)

4.  सुभेदार नरिंदर - मुष्टियुद्ध (90 किलो)

5.  हवालदार अजय बाबू - भारोत्तोलन (79 किलो)

6.  नायब सुभेदार गुलवीर - 10,000 मीटर

9.  लान्स नायक शुभम जुयाल - (दिव्यांगांसाठी) गोळाफेक (एफ-57)

7.  सीपीओ (टीईएल) लवप्रीत सिंह - भारोत्तोलन (+110 किलो)

8.  सीपीओ (पीटी) चनंबम ऋषिकांत सिंह - भारोत्तोलन (60 किलो)

 कांस्य पदक विजेता

1.  नायब सुभेदार गुलवीर - 5,000 मीटर

***

शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2299618) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Telugu