राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात एका वसतिगृहात सर्पदंश झालेल्या सहा मुलींपैकी तिघींचा मृत्यू झाल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून घेतली दखल


खाटांच्या  कमतरतेमुळे या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या होत्या

आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून दोन आठवड्यांच्या आत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले

या अहवालात जखमींच्या प्रकृतीबाबतची माहिती समाविष्ट असणे अपेक्षित आहे

प्रविष्टि तिथि: 14 AUG 2026 12:28PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने  प्रसारमाध्यमातील एका वृत्ताची स्वतःहून दखल घेतली आहे; या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रमशाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता. खाटांची कमतरता असल्याने त्या वसतिगृहाच्या खोलीत जमिनीवर झोपल्या होत्या असे वृत्तात म्हटले आहे. साप चावल्यामुळे यातील तिघींचा मृत्यू झाला, तर अन्य तिघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आयोगाने निरीक्षण नोंदवले आहे की, या बातमीत तथ्य आढळल्यास हा मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा ठरू शकतो. त्यामुळे, आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून या प्रकरणावर दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच या अहवालात जखमी विद्यार्थिनींच्या प्रकृतीच्या स्थितीचाही समावेश असणे अपेक्षित आहे.

11 ऑगस्ट  2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, वसतिगृहाच्या एकाच खोलीत 79 विद्यार्थिनींना ठेवण्यात आले होते. गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या वसतिगृहात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या संख्येने सर्पदंश झाल्याच्या घटना घडतात.

***

नितीन फुल्लुके / सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2299389) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी