राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

भारत दौऱ्यावर आलेल्या केनियाच्या संसदीय प्रतिनिधीमंडळाने घेतली उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची भेट

प्रविष्टि तिथि: 13 AUG 2026 6:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2026

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती  सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केनियाच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष डॉ. मूसा एम. वेटांग' उला,  EGH, MP यांच्याशी एक सौहार्दपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बैठक घेतली. डॉ.  वेटांग'उला हे भारताच्या द्विपक्षीय दौऱ्यावर आलेल्या केनियाच्या संसदीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करत आहेत.

बैठकीदरम्यान, उपराष्ट्रपतींनी भारत आणि केनिया यांच्यातील घनिष्ठ संसदीय संबंधांवर भर दिला आणि कागदविरहित संसदेच्या दिशेने डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरासह तांत्रिक उपाय आणि डिजिटल तंत्रज्ञानातील आपला अनुभव सामायिक करण्यासाठी भारताची तयारी असल्याचे सांगितले. केनियाच्या संसदीय मैत्री गटात  भारतीय वंशाच्या खासदाराच्या उपस्थितीची त्यांनी नोंद घेतली आणि केनियाच्या नॅशनल ऍसेंब्लीच्या आवारात महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याच्या प्रस्तावाचे कौतुकाने स्मरण केले.

उपराष्ट्रपतींनी आठवण करून दिली की, सन्माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये केनियाला भेट दिली होती, त्यानंतर 2023 मध्ये सन्माननीय अध्यक्ष रुटो यांनी भारताला भेट दिली होती.

केनियासोबतच्या भारताच्या विकासाच्या भागीदारीचा संदर्भ देताना उपराष्ट्रपतींनी नमूद केले की, अनुदान-सहाय्याच्या  स्वरूपात अनेक प्रकल्प राबवले गेले आहेत. यात  नैरोबी विद्यापीठाच्या महात्मा गांधी पदव्युत्तर ग्रंथालयाचे नूतनीकरण आणि मटोंगवे येथील केनियन नौदल तळावरील सीटी स्कॅन पायाभूत सुविधांचा समावेश आहे. इबोला विषाणूच्या उद्रेकादरम्यान भारताने 4.5 टन वैद्यकीय पुरवठ्याची पहिली तुकडी पाठवली होती, यांचा समावेश आहे. 

केनियातील क्षमता बांधणीसाठी  भारताच्या सातत्यपूर्ण  पाठिंब्यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला. भारत सरकार विविध सरकारी मंत्रालयांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांसह सुमारे 400 शिष्यवृत्ती प्रदान करते, असे त्यांनी सांगितले.

 केनियाचे 20 राजनैतिक अधिकारी भारतात क्षमता विकास प्रशिक्षण घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.  दीर्घकालीन अभ्यासक्रमांसाठीच्या आयसीसीआर शिष्यवृत्तींची संख्या वार्षिक 80 वरून 100 पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

उपराष्ट्रपतींनी नवी दिल्लीतील एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेदरम्यान स्वाक्षरी झालेल्या केनियामधील डिजी-लॉकर प्रायोगिक प्रकल्पाच्या करारावरही प्रकाश टाकला. त्यांनी आणखी नमूद केले की भारतीय आणि केनियन संघ केनियासाठी 'गतिशक्ती' प्रकल्पावर काम करत आहेत.

उपराष्ट्रपतींनी 2028-29 च्या कार्यकाळासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अस्थायी जागेसाठी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल केनियाचे आभार मानले. त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी केनियाच्या पाठिंब्याची मागणी केली.

दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांवर जोर देत उपराष्ट्रपतींनी नमूद केले की भारत आणि स्वाहिली किनारपट्टीमध्ये एकमेकांच्या फायद्यासाठी सुस्थापित केलेले व्यापारी मार्ग आहेत. केनिया, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडीमध्ये सहभागी होईल, अशी भारताला आशा वाटत असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.

उपराष्ट्रपतींनी भारत आणि केनिया यांच्यातील परस्पर नागरिकांमध्ये  शतकानुशतके चालत आलेल्या  संबंधांवरही प्रकाश टाकला आणि भारतीय वंशाच्या लोकांना केनियाची 44 वी जमात म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल आनंद झाल्याचे सांगितले.

बैठकीचा समारोप करताना उपराष्ट्रपतींनी भारताला भेट दिल्याबद्दल केनियाच्या संसदीय प्रतिनिधीमंडळाचे आभार मानले आणि त्यांच्या सुखद व फलदायी वास्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे संसदीय संबंध अधिक दृढ होतील, तसेच भारत व केनिया यांच्यातील सर्वसमावेशक भागीदारी मजबूत होण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोनाली काकडे/शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2299223) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Malayalam