नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एअर इंडिया विमान एआय 2379 (फुकेत-दिल्ली) बाबत 04.08.2026 रोजी घडलेल्या प्रकाराचा तपास

प्रविष्टि तिथि: 11 AUG 2026 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2026

फुकेत ते दिल्ली अशी नियोजित विमानसेवा (AI 2379) चालवणाऱ्या एअर इंडियाच्या एअरबस A320 (नोंदणी क्रमांक VT-EXO) या विमानाची हवेतली उंची 'क्रूझ' अर्थात स्थिर उड्डाण अवस्थेत असताना अचानक सुमारे 300 फुटांनी बदलली. त्यानंतर विमान स्थिर झाले आणि दिल्ली येथे सुरक्षितपणे उतरले. दिनांक 04.08.2026 रोजी हा प्रकार घडला. 

या घटनेत 20 प्रवासी आणि विमानातल्या चार कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याचे वृत्त आहे. 

डीजीसीए अर्थात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे आणि घटनेचे स्वरूप लक्षात घेऊन एएआयबी अर्थात विमान अपघात तपास ब्यूरोने लागू असलेल्या तरतुदी आणि आयसीएओ कार्यपद्धतीनुसार तपास हाती घेतला आहे. आयसीएओ अर्थात आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना आणि संबंधित देशांना यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

अशा स्वरूपाच्या घटनांमध्ये विमानाचे आरेखन करणारा देश आणि निर्मिती करणारा देश यांचा सहभाग हा आयसीएओ प्रोटोकॉलनुसार  निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय चौकशीच्या चौकटीचा एक प्रस्थापित भाग आहे.

त्यानुसार संबंधित देशाची तपास यंत्रणा म्हणून फ्रान्सची बीईए ही संस्था एअरबसच्या तांत्रिक प्रतिनिधींसह आवश्यक तांत्रिक साहाय्य लागू असलेल्या आयसीएओ चौकटीसह विमान अपघात तपास ब्यूरोला पुरवत आहे. यामध्ये संबंधित तांत्रिक माहिती तसेच विमानाच्या रचनेशी संबंधित दस्तऐवज उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.

विमान अपघात तपास ब्यूरो सध्या संबंधित सर्व तांत्रिक, संचालनविषयक, वैद्यकीय आणि मानवी घटकांशी संबंधित पुराव्यांचे पद्धतशीर संकलन, जतन आणि परीक्षण करत आहे. यामध्ये विमान आणि त्याच्या प्रणाली, नोंदवलेला उड्डाण डेटा, संबंधित कार्यान्वयन व देखभालविषयक नोंदी, वैद्यकीय माहिती आणि संबंधित व्यक्तींच्या मुलाखतींचे परीक्षण यांचा समावेश आहे. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सर्व वास्तविक  पुराव्यांचे सखोल परीक्षण केले जाईल.

या तपासाचा एकमेव उद्देश सदर घटनेशी संबंधित परिस्थिती व कारणीभूत घटक निश्चित करणे आणि ती घटना पुन्हा घडू नये यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना निश्चित करणे, हा आहे. हा तपास स्वतंत्र, पुराव्यांवर आधारित आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे.  त्यामुळे तपास सुरू असताना माहितीच्या केवळ एखाद्या विलग घटकाआधारे घटनेच्या कारणाबाबत कोणताही निष्कर्ष काढू नये.

तपासादरम्यान संकलित करण्यात आलेल्या काही नोंदी, निवेदने, वैद्यकीय माहिती आणि इतर सामग्री ही लागू असलेल्या  तपास कार्यपद्धतीनुसार संरक्षित आणि गोपनीय आहे. वस्तुस्थितीचा निष्पक्ष, वस्तुनिष्ठ आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक निष्कर्ष काढण्यासाठी तपास प्रक्रियेची सचोटी आणि गोपनीयता राखणे, अत्यंत आवश्यक  आहे.  त्यामुळे एएआयबी प्रसारमाध्यमे, जनता यांच्यासह  सर्व संबंधितांना,  तपास प्रक्रियेचा आदर करण्याचे, तसेच  अपूर्ण, पडताळणी न केलेल्या किंवा निवडक स्वरूपात उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे कोणतेही निष्कर्ष न काढण्याचे, आवाहन करते. 

एएआयबी सर्व वास्तविक तथ्ये आणि संबंधित पुराव्यांचा समावेश असलेला सखोल तपास करेल आणि लागू असलेल्या तरतुदी व आयसीएओच्या कार्यपद्धतींनुसार विहित मुदतीत आपले प्राथमिक निष्कर्ष जाहीर करेल. तपासाच्या  योग्य टप्प्यावर पुढील माहिती सार्वजनिक केली जाईल.

विमान वाहतूक सुरक्षा हे सर्वोच्च उद्दिष्ट ठेवून, स्वतंत्र, पारदर्शक आणि व्यावसायिक चौकशी करण्यासाठी एएआयबी वचनबध्द आहे.

निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2297984) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Gujarati , Telugu