उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते अंदमान आणि निकोबार बेटांवर ‘हर घर तिरंगा अभियान’ सुरू
अंदमान आणि निकोबार बेटे ही त्यागाची पवित्र भूमी आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे शाश्वत प्रतीक आहेत: उपराष्ट्रपती
“भारत एक आहे आणि सदैव एकच राहील”: उपराष्ट्रपती
ग्रेट निकोबार विकास प्रकल्पामुळे भारताची सागरी क्षमता मजबूत होऊन विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होतील: उपराष्ट्रपती
प्रत्येक नागरिकाने अभिमानाने तिरंगा फडकवून शौर्य, एकता आणि देशभक्तीची मूल्ये जपावीत: उपराष्ट्रपतींनी केले आवाहन
Posted On:
09 AUG 2026 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2026
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त, श्री विजयपुरम् येथील फ्लॅग पॉइंटवर राष्ट्रध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा अभियान’चा प्रारंभ केला. 1942 च्या ‘छोडो भारत’ आंदोलनाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
उपराष्ट्रपतींनी डीबीआरएआयटी सभागृहात आयोजित शासकीय कार्यक्रम आणि ‘वंदे मातरम्’ वरील तिरंगा संगीत मैफिलीत उपस्थित असलेल्यांना संबोधित केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी आणि तिरंग्याच्या इतिहासाशी खोलवर जोडलेल्या या ऐतिहासिक बेटांपेक्षा या अभियानाचा प्रारंभ करण्यासाठी अधिक योग्य ठिकाण असूच शकत नाही, हे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले.
महान तमिळ कवी सुब्रह्मण्यम् भारती यांच्या अजरामर शब्दांचे स्मरण करून सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले की, भारती यांनी ‘मणि कोडी’ अर्थात राष्ट्रध्वजाचा केलेला गौरव भारतीय आत्म्याच्या चिरंतन शेवयाचे आणि भारत मातेच्या ध्वजाच्या गौरवाचे प्रतीक आहे. ‘हर घर तिरंगा अभियान’ प्रत्येक नागरिकाला एका राष्ट्रध्वजाखाली, एका मातृभूमीच्या आणि एका समान भवितव्याच्या भावनेने एकत्र आणून हीच भावना पुढे नेत आहे, असे त्यांनी सांगितले.
काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, अंदमान-निकोबार बेटे ही केवळ भारताचा भौगोलिक भाग नाहीत तर त्यागाची पवित्र भूमी आहेत. त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि सेल्युलर कारागृहात यातना भोगलेल्या इतर असंख्य देशभक्तांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. स्वातंत्र्य सैनिकांचे शौर्य, देशभक्ती आणि त्याग पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले.
उपराष्ट्रपतींनी आठवण करून दिली की, 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी दिलेल्या ‘करा किंवा मरा’ या निर्णायक आवाहनामुळे लाखो भारतीयांमध्ये जागृती निर्माण झाली आणि स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक गती मिळाली. त्यांनी तिरंग्याच्या इतिहासातील अंदमान निकोबार बेटांच्या अद्वितीय स्थानावरही प्रकाश टाकला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 30 डिसेंबर 1943 रोजी येथे भारताचा राष्ट्रध्वज फडकवला होता, याची त्यांनी आठवण केली. तो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक ऐतिहासिक क्षण होता, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही मोहीम आता देशव्यापी लोकचळवळ बनली आहे, असे उपराष्ट्रपती ‘हर घर तिरंगा मोहिमे’चे महत्त्व अधोरेखित करताना म्हणाले. त्यांनी प्रत्येक नागरिकाला तिरंगा अभिमानाने फडकवण्याचे तसेच त्यातून व्यक्त होणारी देशभक्ती, एकता आणि सामूहिक जबाबदारीची मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. “भारत एक आहे आणि सदैव एकच राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
उपराष्ट्रपतींनी ‘विविधतेतील एकता’ आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ यांचे जिवंत उदाहरण म्हणून या बेटांचा उल्लेख केला, तसेच त्यांचा समृद्ध आदिवासी वारसा आणि संपर्क व्यवस्था, आरोग्यसेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमधील अलीकडील प्रगतीची दखल घेतली. ग्रेट निकोबार बेट विकास प्रकल्पामुळे विकास आणि पर्यावरण संवर्धन यांच्यात संतुलन साधत भारताची सागरी क्षमता, संपर्क व्यवस्था आणि आर्थिक संधी अधिक मजबूत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताच्या शांतता आणि औदार्याच्या परंपरेसोबतच राष्ट्रीय सामर्थ्याच्या गरजेवर जोर देत राधाकृष्णन म्हणाले, “भारत नेहमीच उदार राहिला आहे, परंतु आपल्या औदार्याला कधीही कमजोरी समजू नये. आपण आपले राष्ट्रीय हित आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी नेहमी सज्ज राहिले पाहिजे.” त्यांनी नागरिकांना तिरंग्याकडून धैर्य, एकता आणि आशेची प्रेरणा घेण्याचे तसेच अधिक मजबूत आणि विकसित भारत घडवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
उपराष्ट्रपतींनी एका सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील हजेरी लावली आणि ‘हर घर तिरंगा’ प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात या अभियानाची भावना तसेच राष्ट्रीय एकता आणि देशभक्तीचा संदेश प्रदर्शित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल ॲडमिरल डी. के. जोशी (निवृत्त), मुख्य सचिव चंचल यादव, श्री विजयपुरम् नगर परिषदेच्या अध्यक्ष एम. वसंता आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पी. उमर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
* * *
शिल्पा नीलकंठ/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2296794)
अभ्यागत कक्ष : 71