पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधीत


ज्यांच्यामध्ये आव्हानांवर नवीन उपायायोजनांचा शोध घेण्याचे धाडस असते, त्यांच्यासाठी आव्हाने ही संधी बनतात : पंतप्रधान

आयुष्यात आपली उत्सुकता जिवंत ठेवा, शिकण्याची वृत्ती कायम ठेवा : पंतप्रधान

अविचाराने स्वीकारल्या जाणाऱ्या गोष्टींबद्दल प्रश्न उपस्थित करा, पण फक्त प्रश्न विचारून थांबू नका, त्यावर उत्तर शोधण्याचे धाडस ठेवा : पंतप्रधान

आज भारत प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने काम करत आहे, आर्थिक आत्मनिर्भरता असो, तंत्रज्ञान आत्मनिर्भरता असो वा औद्योगिक आत्मनिर्भरता असो यातून विकसित भारताच्या भक्कम पायाची जडणघडण होत आहे : पंतप्रधान

आज देशभरात आपल्या युवा वर्गासाठी नवीन क्षेत्रे उदयाला येत आहेत : पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 08 AUG 2026 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दिल्ली संकुलाच्या 57 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. या समारंभाचे भावनिक महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. या संकुलातील प्रफुल्ल आणि स्वप्नांनी भारलेल्या वातावरणाचे स्मरणही त्यांनी करून देले. जगभरात आलेल्या कोविड साथरोगाच्या काळात आपण दूरस्थ पद्धतीने अशाच समारंभाला उपस्थित राहिल्याच्या आठवणींना त्यांनी यानिमित्ताने उजाळा दिला. आता पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल आपल्याला खूपच समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज या संकुलात या विद्यार्थ्यांसोबत आपला अनुभव सामायिक करायला मिळणे हा आपल्यासाठी खूप विशेष क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.

यानिमित्ताने पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे त्यांच्या या दमदार शैक्षणिक यशाबद्दल अभिनंदन केले. या पदव्या केवळ शैक्षणिक यशापुरत्या मर्यादित नाहीत तर, या पदव्या म्हणजे देशाच्या उभारणीत योगदान देण्याच्या कर्तव्याचा एक भाग आहेत ही बाब त्यांनी नमूद केली. विविध पदक विजेत्या विद्यार्थ्यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. संस्थेमध्ये सुरू करण्यात आलेल्या नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक उपक्रमांचेही त्यांनी स्वागत केले. आज हे सर्व विद्यार्थी  देशासाठी खूप काही करण्याची स्वप्ने उराशी बाळगून या संकुलातून बाहेर पडत आहेत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनी वेगाने साध्य केलेल्या प्रगतीचीही त्यांनी प्रशंसा केली. संकुलातील प्रवेशाच्या पहिल्या दिवशीच्या परिचय सत्रापासून पदवी मिळवेपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये घडून आलेल्या परिवर्तनाचा त्यांनी दखलपूर्वक उल्लेख केला. पहिला पगार, नवीन स्टार्टअप्स उभारणे यापासून ते पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करणे, अशा विविध आकांक्षांनी या विद्यार्थ्यांच्या मनात घर केले असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. आपल्या या आजवरच्या उल्लेखनीय शैक्षणिक वाटचालीने या विद्यार्थ्यांना खूप समाधान दिले असेल, आणि आता यानंतर आयुष्याचा पूर्ण नवा अध्याय सुरू करण्याचा उत्साह देखील त्यांच्या मनात असेल असे पंतप्रधान म्हणाले.

विद्यार्थ्यांनी आत्ताच्या या क्षणांचा मनापासून आनंद लुटावा असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी पंतप्रधानांनी कुमाऊँ, आरा, कारा, विंध्य, नीलगिरी, कैलास आणि हिमाद्री या वसतीगृहांमधील  परस्पर स्पर्धांचा, तसेच जिया सराईचे पोहे आणि सातपुडा मेसमधील पराठ्यांसारख्या स्थानिक खाद्यपदार्थांच्या आठवणी विद्यार्थ्यांच्या मनात तरळत असतील असेही पंतप्रधान म्हणाले. भविष्यात ज्यावेळी या विद्यार्थ्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या असतील, त्यावेळी या ठिकाणच्या आठवणी त्यांना नक्कीच ऊर्जा देतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

संस्थेकडून मिळालेल्या भक्कम पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोबतचे विद्यार्थी, प्राध्यापक, मार्गदर्शक तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांप्रति  कृतज्ञता बाळगण्याचे आवाहन केले. हे सर्वजण आयुष्यभराची अमूल्य संपत्ती असून, शिक्षणाच्या काळात विद्यार्थ्यांसाठी तेच एका अर्थाने कुटुंबीयांची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. “तुमच्या भविष्यातील प्रत्येक यशामागे या सर्व व्यक्तींचे योगदान तुम्हाला निश्चितच प्रकर्षाने आठवेल आणि त्यांच्याप्रती तुम्ही सदैव कृतज्ञ राहाल,” असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

वेगाने बदलत असलेल्या जागतिक राजकीय आणि सामरिक परिस्थितीचा संदर्भ देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञानातील झपाट्याने होत असलेली प्रगती ही जगभरातील या व्यापक परिवर्तनामागील मुख्य प्रेरणा असल्याचे सांगितले. वेगवान बदलांच्या या युगात अभूतपूर्व आव्हानांसोबतच मोठ्या प्रमाणावर नव्या संधीही उपलब्ध होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “या सर्व वेगवान बदलांच्या काळात माझे शब्द लक्षात ठेवा, जो सातत्याने शिकत राहील, तोच विजयी होईल,” असे पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.

आयआयटीच्या पदवीचे खरे महत्त्व स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ही पदवी केवळ उच्च सीजीपीए किंवा आकर्षक पगाराच्या नोकरीपुरती मर्यादित नाही. कठीण समस्या सोडविण्याची प्रगत क्षमता असल्याचे जागतिक स्तरावर अधोरेखित करणारे महत्त्वपूर्ण प्रमाण आहे. “तुमच्याकडे अत्यंत गुंतागुंतीच्या समस्या नेमक्या कशा सोडवायच्या, याचे कौशल्य आहे, हे तुमची पदवी संपूर्ण जगाला सांगते,” असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

शैक्षणिक जीवनातील चिकाटी आणि आयुष्यभरातील संघर्षशीलतेचा संबंध स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना जीवनातील मोठ्या आव्हानांना छोट्या आणि सहज हाताळता येतील अशा टप्प्यांमध्ये विभागून त्यांचा सामना करण्याचा सल्ला दिला. प्रयोगशाळेतील गुंतागुंतीची सिम्युलेशन सोडवताना ज्या पद्धतीने समस्या टप्प्याटप्प्याने हाताळली जाते, त्याचप्रमाणे जीवनातील आव्हानांकडे पाहण्याचे त्यांनी आवाहन केले. “आयुष्यात अडचणी अपरिहार्यपणे येणार असतील, तर त्याचवेळी अगदी नव्या संधीही निर्माण होतील; त्यासाठी तुम्ही केवळ पूर्णपणे सजग राहणे आवश्यक आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण आणि अनिश्चिततेने भरलेल्या वास्तव जीवनातील परिस्थिती यातील फरक स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना सावध केले की, विद्यापीठातील परीक्षांप्रमाणे आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आव्हाने ही ठरावीक अभ्यासक्रमाच्या चौकटीत नसतात; ती पूर्णपणे ‘अभ्यासक्रमाबाहेरची’ असतात.

खरे यश हे केवळ आधीच निश्चित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात नसून, समाजाने गृहीत धरून स्वीकारलेल्या आणि ज्यांच्याकडे प्रश्न म्हणून पाहणेच बंद केले आहे, अशा समस्यांची ओळख पटवून त्या सोडवण्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “जगाने ज्यांना प्रश्न मानणेच सोडून दिले होते, असे महत्त्वाचे प्रश्न धाडसाने ओळखणे हेच अनेक माजी विद्यार्थ्यांच्या यशामागचे मूलभूत कारण होते,” असे पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.

मागील पिढ्यांनी पेललेल्या ऐतिहासिक जबाबदाऱ्यांचा संदर्भ देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यप्राप्ती हेच एकमेव ध्येय समोर ठेवून संपूर्ण युगात असंख्य त्याग आणि तपश्चर्या करणाऱ्या पिढ्यांचे स्मरण केले. आजच्या पिढीनेही पुढील तीन दशकांतील देशाच्या विकासाच्या उद्दिष्टांशी आपल्या करिअरची दिशा थेट जोडून स्वतःचा वारसा निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. “तुमच्या प्रत्येक निर्णयामागे देशाला त्यातून काय लाभ होणार आहे आणि देशाची कोणती गरज पूर्ण होणार आहे, हाच विचार असला पाहिजे,” असे पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले.

आर्थिक, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये सर्वंकष आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या व्यापक प्रयत्नांची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा सक्षमीकरण हा  विकसित भारताच्या उभारणीचा मूलभूत आधार असल्याचे अधोरेखित केले. पूर्वी मर्यादित स्वरूपात उपलब्ध असलेली आणि प्रवेशासाठी निर्बंध असलेली अनेक क्षेत्रे तरुण संशोधकांसाठी खुली करण्याच्या सरकारच्या धोरणात्मक निर्णयांचा त्यांनी पुनरुच्चार केला. “देशातील तरुण जितके अधिक सक्षम होतील, तितकाच संपूर्ण देश अधिक सक्षम होईल,” असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणांनंतर अवकाश क्षेत्रात झालेल्या वेगवान विस्ताराचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी स्वतःची रॉकेट्स विकसित करून ती अवकाशात प्रक्षेपित करणाऱ्या तरुण अभियंत्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. यापूर्वी अशी क्षमता मोजक्याच देशांकडे होती, असे त्यांनी नमूद केले. “आज त्याच अवकाश क्षेत्राचे रूपांतर आपल्या हजारो तरुणांसाठी नव्या संधींच्या विशाल आकाशात झाले आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

सेमीकंडक्टर उत्पादनातील देशांतर्गत होत असलेल्या वेगवान प्रगतीकडे लक्ष वेधत, पंतप्रधानांनी यापूर्वी व्यक्त केल्या गेलेल्या सर्व शंका-कुशंका फेटाळून लावल्या. सुरुवातीचे उत्पादन प्रकल्प आधीच कार्यान्वित झाले आहेत व त्यामुळे देशाचा आत्मविश्वास उंचावला आहे, असे मोदी यांनी नमूद केले. कुठेतरी एखादा तरुण पूर्ण आत्मविश्वासाने आणि अभिमानाने म्हणत असेल, माझ्या पिढ्यांमध्ये भारतात चिप तयार करणारा मी पहिलाच आहे, असे मोदी म्हणाले.

ड्रोन क्षेत्रातील परिवर्तनकारी बदलांचा उल्लेख करताना, शेती आणि वैद्यकीय पुरवठ्यापासून ते राष्ट्रीय संरक्षण क्षेत्रापर्यंत  विविध क्षेत्रांमध्ये तरुण नवसंशोधक कशी क्रांती घडवून आणत आहेत, याचे सविस्तर वर्णन पंतप्रधानांनी केले. आज या क्षेत्रातील उत्साही तरुण सक्रियपणे अद्भूत नव्या शक्यता निर्माण करत आहेत, असे प्रतिपादन मोदी यांनी केले. भारताच्या स्टार्टअप क्रांतीला सध्याच्या पिढीने दिलेल्या योगदानाचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी युनिकॉर्न कंपन्या, डिजिटल पेमेंट्स आणि फिनटेक क्षेत्रातील विस्तारामुळे निर्माण झालेल्या मोठ्या आर्थिक गतीचा उल्लेख केला. यामुळे लाखो युवकांना अभूतपूर्व उद्योजकीय व्यासपीठे उपलब्ध झाली आहेत, असे त्यांनी सांगितले. या सर्व क्रांतींमुळे देशातील लाखो युवकांना प्रथमच नवे काहीतरी करण्याची अभूतपूर्व संधी मिळाली आहे, मोदी म्हणाले.

भविष्यात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वर्चस्व निर्माण करणाऱ्या नव्या क्षेत्रांची रूपरेषा मांडताना, पंतप्रधानांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर्स, महत्त्वपूर्ण खनिजे, खोल समुद्रातील अन्वेषण, क्वांटम संगणन आणि ऊर्जा सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या उदयोन्मुख क्षेत्रांवर प्रकाश टाकला. अशा अनेक अत्याधुनिक क्षेत्रांना तुमच्या अफाट प्रतिभेची, धाडसी नवोन्मेषाची आणि भक्कम नेतृत्वाची आतुरतेने प्रतीक्षा आहे,  मोदी म्हणाले. प्रगत संशोधनाच्या दिशेने देशात सुरू असलेल्या मोठ्या बदलांवर भर देत, पंतप्रधानांनी पंतप्रधान संशोधन फेलोशिप  आणि  अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या स्थापनेसह सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या अभूतपूर्व निधीच्या तरतुदीचा उल्लेख करत भक्कम  पाठबळाची माहिती दिली. आज देशाला नवीन संशोधनाची नितांत गरज आहे आणि आमचा प्रशासकीय भरही तितक्याच दृढतेने संशोधनावर आहे, असे उद्गार मोदी यांनी काढले.

शैक्षणिक संसाधनांचे लोकशाहीकरण करणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना, पंतप्रधानांनी वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेवर विशेष भर दिला. या योजनेमुळे नामांकित जागतिक संशोधन मासिके कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय अगदी लहान शहरांमध्येही उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अजून लांबचा पल्ला गाठायचा असल्याचे नमूद करत, या संशोधन नवजागरणाला गती देण्याच्या  तरुणांच्या कटिबद्धतेवर त्यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला. संशोधनाशी संबंधित हे महत्त्वपूर्ण कार्य केवळ तुमच्या सर्वांच्या अढळ निष्ठेमुळेच साध्य होऊ शकते, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

समाज माध्यमाच्या युगातील नकारात्मक प्रभावांपासून पदवीधरांनी सावध राहावे, असे आवाहन करताना पंतप्रधानांनी आपल्या वेतनाची, नोकरीतील नियुक्तीची किंवा स्टार्टअपमधील प्रगतीची इतरांशी तुलना करू नये, असे सांगितले. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करताना मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.  लक्षात ठेवा, जीवन ही कोणतीही क्रमवारी नाही. तुमची खरी स्पर्धा इतर कोणाशीही नसून स्वतःशीच आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांना या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करणाऱ्या संपूर्ण संस्थात्मक यंत्रणेचे अभिनंदन केले.  तुमचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल असो आणि तुम्ही सातत्याने, धैर्याने नवी उंची गाठा असे मोदी म्हणाले.

 

 

 

 

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/वैभवी जोशी/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2296540) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam