अवजड उद्योग मंत्रालय
भारताने जागतिक ऊर्जा परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी लवचिक पुरवठा साखळ्या उभारणे आवश्यक आहे: एच.डी.कुमारस्वामी
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2026 4:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026
केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, ऊर्जा सुरक्षेच्या व्याख्येत मूलभूत बदल झाला आहे. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत, एखाद्या राष्ट्राची ताकद केवळ ऊर्जा संसाधनांच्या उपलब्धतेवरून ठरत नाही, तर भविष्याला ऊर्जा देणाऱ्या तंत्रज्ञानासाठी उत्पादन करण्याची, नवनवीन शोध लावण्याची आणि लवचिक पुरवठा साखळ्या उभारण्याची क्षमता यावरून ठरते.

नवी दिल्ली येथे आयोजित 7 व्या सीआयआय आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषद आणि प्रदर्शनादरम्यान ऊर्जा सुरक्षा आणि पुरवठा साखळ्या या विषयावरील विशेष सत्रात त्यांचे बीज भाषण झाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासाठी जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येण्यासाठीच्या भारताच्या धोरणाची रूपरेषा मांडली. तसेच, औद्योगिक क्षमता आणि ऊर्जा सुरक्षा या आता अविभाज्य गोष्टी आहेत, यावर त्यांनी भर दिला.
ते म्हणाले की, अलीकडील भू-राजकीय घडामोडी, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि महत्त्वपूर्ण खनिजांसाठी वाढती स्पर्धा यामुळे जागतिक औद्योगिक प्राधान्यक्रम बदलले आहेत; परिणामी, उत्पादनातील लवचिकता आणि तंत्रज्ञान क्षमता या राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
कुमारस्वामी म्हणाले की, देश आत्मनिर्भर भारत या संकल्पनेद्वारे या जागतिक बदलांना प्रतिसाद देत आहे. याद्वारे, विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय मूल्य साखळ्यांशी घट्ट जोडून घेऊनच जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम अशा देशांतर्गत उत्पादन क्षमता विकसित केल्या जात आहेत.

भारताने केवळ स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाचा जगातील सर्वात मोठा ग्राहक बनून राहू नये. जागतिक ऊर्जा परिवर्तनाला चालना देणारी उपकरणे, साहित्य आणि तंत्रज्ञान यांच्या उत्पादनातही भारताने जगातील आघाडीच्या देशांपैकी एक बनले पाहिजे, असेही ते म्हणाले.

पोलादाला स्वच्छ ऊर्जा परिवर्तनाचा कणा असे संबोधत कुमारस्वामी म्हणाले की, सौर ऊर्जा प्रकल्प आणि पवनचक्क्यांपासून ते पारेषण जाळे, बॅटरी निर्मिती सुविधा, बंदरे आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांपर्यंतच्या नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधांमधील प्रत्येक मोठी गुंतवणूक ही मूलतः पोलादावरच अवलंबून असते.

ग्रीन स्टील अर्थात हरित पोलादाच्या महत्त्वावर भर देताना कुमारस्वामी म्हणाले की, कमी-कार्बन उत्सर्जन करणाऱ्या पोलाद उत्पादनाकडे वळणे ही आता पर्यावरणीय गरज आणि आर्थिक अपरिहार्यता झाली आहे.
सुषमा काणे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295523)
आगंतुक पटल : 7