अर्थ मंत्रालय
महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात अमली पदार्थांचे अवैध उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर डीआरआयची कारवाई ; दोघांना केली अटक
झडतीदरम्यान सुमारे एक किलो तयार 'अल्प्राझोलम', मध्यवर्ती स्वरूपातील 15 किलोहून अधिक 'अल्प्राझोलम' आणि सुमारे 3.75 किलो 'डायझेपाम' जप्त; याव्यतिरिक्त, सुमारे 400 लिटर इतका विविध कच्चा माल आणि अभिक्रिया मिश्रण साठाही जप्त
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2026 4:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2026
अंमली पदार्थांचे बेकायदेशीर उत्पादन आणि तस्करी रोखण्यासाठी सातत्यपूर्ण कारवाई सुरु ठेवत महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (DRI) महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात 'सायकोट्रॉपिक' पदार्थांचे अवैध उत्पादन करणाऱ्या एका गुप्त कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत तयार आणि मध्यवर्ती स्वरूपातील दोन प्रकारचे 'सायकोट्रॉपिक' पदार्थ व त्यांच्या निर्मितीसाठी वापरला जाणारा सुमारे 400 लिटर कच्चा माल जप्त करण्यात आला, तसेच दोघांना अटक करण्यात आली.

1.08.26 रोजी, गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एका अवैध उत्पादन केंद्राचा पर्दाफाश केला. या केंद्रात 'नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायदा 1985 ‘ अंतर्गत 'सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस' म्हणून वर्गीकृत असलेले 'अल्प्राझोलम' आणि 'डायझेपाम' हे पदार्थ अवैध तस्करीसाठी छुप्या पद्धतीने तयार केले जात होते. या कारवाईदरम्यान संबंधित उत्पादकालाही ताब्यात घेण्यात आले.

परिसराच्या झडतीमध्ये अंदाजे 1 किलो तयार अल्प्राझोलम, 15 किलोहून अधिक मध्यवर्ती स्वरूपातील अल्प्राझोलम आणि अंदाजे 3.75 किलो डायझेपाम जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी या अवैध उत्पादनात वापरण्यात येणारा अंदाजे 400 लिटर विविध कच्चा माल आणि अभिक्रिया मिश्रणे देखील जप्त केली. हा अवैध माल एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीं अंतर्गत जप्त करण्यात आला.
त्वरित कारवाई करत, डीआरआय अधिकाऱ्यांनी पुण्यातून संभाव्य खरेदीदाराला अटक केली आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या पुढील तस्करीसाठी प्रस्तावित अवैध व्यवहाराचे संकेत देणारे पुरावे गोळा केले.
अल्प्राझोलम आणि डायझेपाम ही बेंझोडायझेपाइन वर्गातील डॉक्टरांच्या चिठ्ठीने मिळणारी मनोविकारांवरील औषधे आहेत आणि साधारणपणे चिंता विकार, पॅनिक अटॅक, निद्रानाश, झटके आणि इतर काही मज्जासंस्थेच्या विकारांवर उपचारासाठी वैद्यकीय देखरेखीखाली वापरली जातात. त्यांच्या शामक आणि व्यसन लावणाऱ्या गुणधर्मांमुळे, हे पदार्थ एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत नियंत्रित केले जातात. त्यांचे अवैध उत्पादन, गैरवापर आणि तस्करी ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे, कारण या पदार्थांच्या गैरवापरामुळे व्यसन, संज्ञानात्मक कार्यांमध्ये बिघाड आणि गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, आरोपी यापूर्वीही अमली पदार्थांच्या अवैध उत्पादनात आणि तस्करीमध्ये सामील होते. दोन्ही आरोपींना एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.
राधिका अघोर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295179)
आगंतुक पटल : 9