कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या जनुकीय संशोधनातील यशाने तुरीच्या अधिक उत्तम वाण विकसित करण्याचा मार्ग प्रशस्त

प्रविष्टि तिथि: 04 AUG 2026 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2026 

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) तुरीच्या (Cajanus cajan L. Millsp.) आशा या वाणाचा भारतातील पहिला पूर्णपणे विश्लेषित टेलोमोअर टू टेलोमोअर अर्थात गुणसूत्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा पूर्ण जनुकीय आराखड्याची जनुक रचना विकसित केली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे यश वैज्ञानिक पातळीवरील एक मोठा यशदायी टप्पा ठरला आहे. तूर हे पीक भारतात अरहर या नावानेही ओळखले जाते. तूर हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या कडधान्य पिकांपैकी एक पीक असून, आहारातील प्रथिनांचा तो एक प्रमुख स्रोत आहे. देशाची अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यात हे पीक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे.

नवीन विकसित केलेल्या या टेलोमोअर टू टेलोमोअर जीनोम सीक्वेन्समध्ये (संपूर्ण जनुकीय साखळी) 752.65 दशलक्ष बेस पेअर्स डीएनए 92 काँटिग्समध्ये (सलग जनुकीय साखळीचे तुकडे) एकत्रित करण्यात आले आहेत, ज्यामुळे तुरीच्या सर्व 11 गुणसूत्रांच्या संपूर्ण प्रतिनिधित्वाची रचना उलगडली आहे. NIPB_CcT2T_4 या वैज्ञानिक सांकेतिक नावाचा हा जीनोम संच 20 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आला. हा संच GCF_000230855.1 या जागतिक संदर्भ क्रमांकाअंतर्गत जागतिक माहितीसाठा संचात (NCBI - National Center for Biotechnology Information - राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान माहिती केंद्र) अंतर्भूत करण्यात आला आहे.

या जीनोम संचामध्ये सर्व 11 सेंट्रोमीअर्स (गुणसूत्रांचा मध्यभाग) आणि 22 टेलोमीअर्ससह (गुणसूत्रांची टोके) सर्व 11 गुणसूत्रांचा अंतर्भाव आहे. यातून गुणसूत्रांच्या पातळीवरील परिपूर्णता दिसून येते. एका सर्वसमावेशक जीनोम विश्लेषणामध्ये 36,557 जनुकांची (जीन्स) ओळख पटली असून त्याद्वारे 48,008 एमआरएनए (कोडिंग सीक्वेन्स - प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या जनुकीय सूचना) तयार झाले आहेत. ट्रान्सक्रिप्टोम (आरएनए सीक्वेन्स - जनुकीय घडामोडी आणि क्रियांचा अभ्यास) मॅपिंग अंतर्गत रीड अलाइनमेंट (जनुकीय तुकड्यांची नेमकी मांडणी) 99.9% पेक्षा जास्त अचूक असल्याची नोंद झाली आहे. यामुळे या जीनोमची उच्च अचूकता आणि परिपूर्णता सिद्ध झाली आहे.

पूर्णपणे विश्लेषित केलेला टेलोमोअर टू टेलोमोअर संदर्भ जीनोम हा देशातील कडधान्य संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. प्रगत जनुक आणि पॅनजीनोम विश्लेषण (विविध वाणांच्या जनुकांचा एकत्रित अभ्यास), महत्त्वाच्या कृषी आणि पोषणविषयक गुणधर्मांशी संबंधित जनुकांचा शोध घेणे तसेच मॉलिक्युलर ब्रीडिंग (आण्विक पातळीवरील पीक पैदास) आणि जीनोम एडिटिंग (जनुकीय फेरबदल) तंत्रज्ञानाच्या वापराच्या दृष्टीने हे एक मौल्यवान राष्ट्रीय जनुकीय संसाधन म्हणून उपयुक्त ठरणार आहे. या यशामुळे हवामान बदलांशी जुळवून घेणाऱ्या, जास्त उत्पन्न देणाऱ्या आणि पोषणाने समृद्ध असलेल्या तुरीच्या वाणांचे उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळे देशाच्या कडधान्य सुधारणा कार्यक्रमाला बळकटी मिळेल. या यशामुळे संशोधन आणि नवोन्मेषालाही मोठे पाठबळ लाभेल. याचा शास्त्रज्ञ, पीक पैदासकार आणि शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल. यासोबतच हे यश उत्पादन क्षमतेतील वृद्धी, शेतकऱ्यांच्या उपजीविकेतील सुधारणा तसेच देशाच्या अन्न आणि पोषण सुरक्षेतही मोठे योगदान देणारे ठरणार आहे.

सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2294558) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Kannada , Malayalam