रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेने जुलै 2025 च्या तुलनेत जुलै 2026 मध्ये मालवाहतुकीत 9 टक्के वाढ नोंदवली, यावर्षी जुलै महिन्यात 141 दशलक्ष टनांपेक्षा अधिक माल वाहतूक


जुलै 2026 मध्ये लोह खनिज वाहतुकीत 22 टक्के, खतांमध्ये 12 टक्के, अन्नधान्य व कोळसा प्रत्येकी 11.5 टक्के, ऊर्जा प्रकल्पांच्या देशांतर्गत कोळसा पुरवठ्यात 20 टक्के वाढ

प्रविष्टि तिथि: 03 AUG 2026 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026 

भारतीय रेल्वेने जुलै 2026 मध्ये आपल्या उत्तम कामगिरीत सातत्य राखले असून माल वाहतूक व प्रवासी वाहतूक या दोन्ही विभागांमध्ये चांगली वाढ नोंदवली आहे. अधिक माल वाहतूक, वाढलेली प्रवासी संख्या, सुधारित महसूल उत्पन्न आणि प्रमुख वस्तूंची वाढलेली वाहतूक यातून भारतीय रेल्वेची आर्थिक विकास, मालवाहतुकीची सशक्तता आणि देशभरात विश्वासार्ह दळणवळण व्यवस्था पुरवणे यातील महत्त्वाची भूमिका अधोरेखित झाली.

मालवाहतुकीच्या गतिमान वाढीतील सातत्य

भारतीय रेल्वेने जुलै 2026 मध्ये 141.3 दशलक्ष टन माल वाहतूक केली. गेल्या वर्षी याच महिन्यात 123.7 दशलक्ष टन माल वाहतूक झाली होती, म्हणजेच मालवाहतुकीत 9 टक्के वाढ नोंदवली गेली. या उत्कृष्ट कामगिरीतून अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांच्या मागणीतील सातत्य आणि माल वाहतूक वाढीसाठी केलेले प्रयत्न व कार्यक्षमता प्रतिबिंबित होते.

प्रमुख वस्तूंच्या जास्तीच्या माल वाहतुकीची उद्योग, कृषी व ऊर्जा सुरक्षेला मदत

अनेक प्रमुख वस्तू गटांनी जुलै 2026 मध्ये चांगली वाढ नोंदवली. लोह खनिज वाहतुकीत 22 टक्क्यांनी वाढ झाली, कोळसा वाहतुकीत 11.5 टक्के, अन्नधान्यात 11.5 टक्के, खतांमध्ये 12 टक्के आणि उर्वरित इतर माल वाहतुकीत 12.1 टक्के वाढ झाली. यातून पायाभूत सुविधा, उत्पादन आणि कृषी क्षेत्रातील वाढती मागणी प्रतिबिंबित होते. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधील कोळशाच्या वाढत्या मागणीमुळे भारतीय रेल्वेने ऊर्जा प्रकल्पांना केल्या जाणाऱ्या देशांतर्गत कोळसा पुरवठ्यात गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत यावर्षी जुलै महिन्यात 20 टक्के वाढ नोंदवली.

मालवाहतुकीद्वारे मिळणाऱ्या महसुलात सातत्यपूर्ण वाढ

माल वाहतुकीत वाढ झाल्यामुळे जुलै 2025 च्या तुलनेत यावर्षी 8 टक्के जास्त म्हणजेच ₹1,137 कोटी महसूल उत्पन्न मिळाले आहे. क्षेत्रीय रेल्वेंमध्ये मध्य पूर्व रेल्वे (33 टक्के), पूर्व रेल्वे (33 टक्के), पश्चिम मध्य रेल्वे (23 टक्के) आणि दक्षिण पूर्व रेल्वे (10.33 टक्के) या विभागांनी मालवाहतूकीद्वारे मिळणाऱ्या  महसुलात लक्षणीय वाढ नोंदवली.

वाढत्या प्रवासी संख्येद्वारे सुधारित रेल्वे वाहतूक व सेवा प्रतिबिंबित

जुलै 2026 मध्ये भारतीय रेल्वेने 63.25 कोटी इतकी प्रवासी संख्या नोंदवली. गेल्या वर्षी याच महिन्यात प्रवासी संख्या 62.19 कोटी इतकी होती. उपनगरी आणि उपनगरी नसलेल्या अशा दोन्ही विभागांमध्ये सातत्याने प्रवासी संख्येत वाढ झाली. यातून देशभरातील प्रवासी रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

देशातील माल वाहतूक सशक्त करण्यास, प्रवासी सेवा सुधारण्यास आणि आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यास भारतीय रेल्वे वचनबद्ध आहे. कामकाजात सुधारणा, प्रवासी क्षमतेत वाढ आणि प्रवासी केंद्रित उपक्रम याद्वारे देशाचा आर्थिक विकास, ऊर्जा सुरक्षितता आणि दररोज लाखो प्रवाशांची सुरळीत वाहतूक यात भारतीय रेल्वे सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत आहे.


शैलेश पाटील/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2294109) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Kannada