आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

16 वा 'भारतीय अवयवदान दिन'साजरा होत असल्याचे औचित्य साधून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचे अवयवदान चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 03 AUG 2026 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेद्वारे (NOTTO) आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाने आज नवी दिल्ली येथे 16 वा भारतीय अवयव दान दिन (IODD) साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायन व खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव, आरोग्य सेवा महासंचालक डॉ. लवनिश जी. कृष्णा, NOTTO चे संचालक डॉ. अनिल कुमार, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी, दात्यांची कुटुंबे, अवयव प्रत्यारोपण प्राप्तकर्ते, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि इतर हितसंबंधी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी 16 व्या भारतीय अवयवदान दिनाचे वर्णन सेवा आणि मानवतेच्या भावनेचा उत्सव असे केले. त्या म्हणाल्या की अवयवदान ही करुणेची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे कारण त्यामुळे अवयव निकामी होण्याच्या अंतिम टप्प्यात असलेल्यांना जीवनाची दुसरी संधी मिळते. त्यांनी दिवंगत अवयवदात्यांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र कृतज्ञता व्यक्त केली, ज्यांच्या निःस्वार्थ निर्णयांनी देशाला प्रेरणा दिली आहे आणि भारतातील अवयवदान चळवळीला बळकटी दिली आहे. त्यांनी अनेक राज्य सरकारांच्या प्रशंसनीय प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्यांना देशभरातील अवयवदान व प्रत्यारोपण सेवा अधिक सुधारण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले.

भारताच्या उल्लेखनीय प्रगतीचा उल्लेख करत केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की 2023 मध्ये राष्ट्रीय डिजिटल प्रतिज्ञा पोर्टल सुरू झाल्यापासून देशात आधार-सत्यापित अवयवदानाची प्रतिज्ञा करणाऱ्यांची संख्या पाच लाखांच्या वर गेली आहे. लोकांचा हा वाढता सहभाग म्हणजे सरकारच्या सातत्यपूर्ण जनजागृतीचे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रेरणादायी आवाहनाचे फलित आहे; यांमुळे नागरिकांना अवयवदानासाठी पुढे येण्यास प्रोत्साहन मिळाले आहे, तसेच अवयवांची वेळेवर आणि सुरक्षित वाहतूक करून ती गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासही चालना मिळाली आहे.

त्यांनी नमूद केले की अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. प्रत्यारोपणांची संख्या 2013 मधील 4,990 वरून 2025 मध्ये 20,000 पेक्षा जास्त झाली असून एका वर्षात नोंदवलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या एकूण संख्येत भारत आता अमेरिका आणि चीननंतर जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी पुढे अधोरेखित केले की मृत दात्यांकडून होणाऱ्या प्रत्यारोपणांची संख्या 2013 मधील 837 वरून 2025 मध्ये 3,500 पेक्षा जास्त झाली आहे, मात्र अवयवांची मागणी आणि त्यांची उपलब्धता यांच्यात अजूनही मोठी तफावत असल्याचे त्यांनी मान्य केले. ही तफावत दूर करणे हे राष्ट्रीय प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

केंद्रीय मंत्र्यांनी असे निरीक्षण नोंदवले की, अवयवदानाबाबतचे गैरसमज हे एक मोठे आव्हान आहे. त्यांनी यावर जोर दिला की कोणताही प्रमुख धर्म अवयवदानावर बंदी घालत नाही; उलट करुणा, सेवा आणि जीव वाचवण्याच्या मूल्यांना सर्व धर्म महत्त्व देतात, ज्यामुळे अवयवदान हे एक उदात्त मानवतावादी कार्य ठरते.

याप्रसंगी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की 'नॅशनल ब्रेन स्टेम डेथ सर्टिफिकेशन गाईडलाईन्स' आणि 'नॅशनल गाईडलाईन्स ऑन स्वॅप ट्रान्सप्लांटेशन' यांमुळे देशभरात कार्यपद्धती प्रमाणित करण्यास आणि धोरणांची अंमलबजावणी अधिक मजबूत करण्यास मदत होईल. त्यांनी 'जुग जुग जियो अभियान' या वर्षभर चालणाऱ्या देशव्यापी जनजागृती मोहिमेच्या आरंभावरही प्रकाश टाकला. या मोहिमेचा उद्देश अवयवदानाचा संदेश प्रत्येक समुदायापर्यंत पोहोचवणे आणि अवयवदान हे जीवनाचे सर्वात मोठे दान आहे, यावर जोर देणे हा आहे, जेणेकरून दात्यांचा वारसा प्राप्तकर्त्यांच्या माध्यमातून जिवंत राहील.

त्या पुढे म्हणाल्या की, सरकारने एक गतिमान संस्थात्मक यंत्रणा स्थापन केली असून यामध्ये एनओटीटीओ, पाच क्षेत्रीय अवयव व ऊती प्रत्यारोपण संस्था (आरओटीटीओ), 26 राज्य अवयव व ऊती प्रत्यारोपण संस्था (एसओटीटीओ) आणि सुमारे 1,200 नोंदणीकृत रुग्णालयांचा समावेश आहे. या सर्वांमधील समन्वय मजबूत करण्यासाठी सरकारने इ-प्रत्यारोपण हा एकीकृत डिजिटल मंच सुरू केला आहे. हा मंच नागरिकांमधील विश्वास वाढवून अखंड, पारदर्शक आणि कार्यक्षम अवयवदान व प्रत्यारोपण परिसंस्था निर्माण करेल.

वाढती जनजागृती, डिजिटल रुपांतरण व धोरणांमध्ये सुधारणा याद्वारे भारताची अवयवदान व प्रत्यारोपण परिसंस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने आखलेल्या अनेक प्रमुख उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमात करण्यात आली.

यातील एक प्रमुख उपक्रम असलेल्या जुग जुग जियो अभियानाचा प्रारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. अवयवदान हे जीवनदानांचे काम आहे याबाबत जनजागृती करणारी ही देशव्यापी मोहीम असून; अवयव व ऊती प्रत्यारोपित झालेल्या व्यक्तींच्या माध्यमातून अवयवदात्यांचा वारसा पुढे सुरू राहू शकतो हा संदेश यातून लोकांपर्यंत पोहोचवला जाईल.  देशातील गावागावांमध्ये लोकांच्या व समाजाच्या सहभागातून अवयवदानाबाबत जनजागृती करणे, हा या मोहीमेचा उद्देश आहे.

केंद्रिय मंत्र्यांनी इ प्रत्यारोपण या एकीकृत, सुरक्षित, पारदर्शी व तंत्रज्ञान आधारित राष्ट्रीय डिजिटल मंचाचे उद्घाटन केले. या मंचाद्वारे डिजिटल माध्यमातून रुग्णालये, डॉक्टर्स, अवयवदाते, अवयवदानाची गरज असलेले आणि इतर संबंधितांना एकाच अखंड परिसंस्थेत सामावून घेतले जाईल. या मंचावर नोंदणी, प्रतीक्षा यादी व्यवस्थापन, अवयव वितरण, देखरेख व सार्वजनिक माहिती सेवा एकाच वेळी उपलब्ध असतील. यामुळे अधिक कार्यक्षम, पारदर्शी व तंत्रज्ञान आधारित अवयवदान व प्रत्यारोपण मोहीमेत लक्षणीय बदल घडून येईल.

याशिवाय डिजिटल सेवा बळकट करण्यासाठी नवीन एनओटीटीओ मोबाइल ऍप सुरू करण्यात आले. या ऍपद्वारे नागरिक, प्रत्यारोपण व्यावसायिक, रुग्णालये आणि प्रशासक यांना अवयवदान व प्रत्यारोपणाशी संबंधित सेवा व माहिती सुलभरित्या उपलब्ध होईल.

एका उल्लेखनीय धोरणात्मक उपक्रमाअंतर्गत, राष्ट्रीय मेंदूस्टेम मृत्यू प्रमाणीकरण मार्गदर्शक तत्त्वे आणि अदलाबदल प्रत्यारोपणाबाबतच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. या मार्गदर्शक सूचनांमुळे प्रत्यारोपण व्यावसायिकांसाठी व्यावहारिक आराखडा तयार होईल आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना वेगवान, नैतिक व कार्यक्षम अवयव दान व प्रत्यारोपण मोहीमेची अंमलबजावणी करता येईल. या मार्गदर्शक सूचनांमुळे राष्ट्रीय प्रत्यारोपण परिसंस्था मजबूत होऊन सुरक्षित, समन्यायी व उच्च दर्जाच्या प्रत्यारोपण सेवा देशभरात उपलब्ध होणे अपेक्षित आहे.   

या समारंभात राज्ये, केंद्रशासित प्रदेश, क्षेत्रीय अवयव व ऊती प्रत्यारोपण संस्था (आरओटीटीओ), रुग्णालये, प्रत्यारोपण व्यावसायिक आणि अन्य संबंधितांनी देशातील अवयवदान व प्रत्यारोपण सेवेच्या मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय अवयवदान पुरस्कार प्रदान करण्यात आले. चंदीगडच्या पीजीआयएमइआर संस्थेला सर्वोत्कृष्ट क्षेत्रीय अवयव व ऊती प्रत्यारोपण संस्था (आरओटीटीओ) – उत्तर विभाग हा पुरस्कार देण्यात आला. तमिळनाडू सर्वाधिक मृत अवयवदात्यांची नोंदणी करणारे राज्य ठरले; तर आसामला ईशान्य भागातील सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला. दिल्लीला सर्वोत्कृष्ट केंद्रशासित प्रदेशाचा सन्मान मिळाला. अवयव प्रत्यारोपण व अवयव पुनर्प्राप्ती यातील सर्वोत्कृष्टतेसाठी रुग्णालयांना, राष्ट्रीय अवयवदान मोहीमेच्या वाढीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी प्रत्यारोपण व्यावसायिक व इतर संबंधितांना सन्मानित करण्यात आले.


शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2294020) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil