गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्रात पुणे येथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान


राष्ट्र चेतना जागृत  करणारे थोर नेते लोकमान्य टिळक यांनी दाखवलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर आता भारत वाटचाल करत आहे, आता कोणीही त्याला थांबवू शकत नाही: अमित शाह

आजच्या तरुणांनी लोकमान्य टिळक यांचे जीवन, त्यांची भाषणे आणि लेखन याचा अभ्यास करावा आणि त्यापासून प्रेरणा घ्यावी

लोकमान्य टिळक यांच्या दृष्टीकोनातून गीतेचे वाचन करा, म्हणजे आयुष्यात कधीही चूक होणार नाही

अजित डोभाल यांना प्रदान करण्यात आलेला ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ हा देशासाठी जगणाऱ्या आणि काम करणाऱ्या नागरिकांसाठी प्रेरणेचा मोठा स्रोत ठरेल

प्रविष्टि तिथि: 01 AUG 2026 5:29PM by PIB Mumbai


केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात पुणे येथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026’ प्रदान केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 106 वी पुण्यतिथी आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा आणि अर्थ देण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा मंत्र दिला होता, असे ते म्हणाले. आपली शासन व्यवस्था, भाषा, संस्कृती आणि धर्म भक्कमपणे स्थापित होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वराज्याचे स्वप्न साकार होईल, असे ते म्हणाले. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य आणि स्वातंत्र्य चळवळींशी जनसामान्यांना जोडले, असे शाह म्हणाले. लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादाचे नवे स्वरूप, सांस्कृतिक राष्ट्रवाद समाविष्ट केला, असे त्यांनी नमूद केले.

टिळकांनी भविष्यातल्या देशाच्या वाटचालीची दिशा निश्चित केली होती, असे शहा म्हणाले. टिळकांनी हे ठामपणे सांगितले होते की, भारताला जेव्हा  स्वातंत्र्य मिळेल, तेव्हा देश याच मार्गाने पुढे जाईल. आज आपला देश सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर वाटचाल करत आहे, असेही शहा यांनी नमूद केले.
लोकमान्य टिळक हे एक शिक्षक आणि प्रखर पत्रकार होते. एक थोर विचारवंत म्हणून त्यांनी जगासमोर भारताचे चित्र उभे केले, आणि लाखो लोकांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित केली, असे अमित शहा यांनी सांगितले.
संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी तुलना करता येईल असा दुसरा कोणताही नेता नव्हता—ते एक दृष्टे, असाधारण शिक्षक, निर्भीड पत्रकार, सखोल विचारवंत आणि खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते, अशा शब्दात शहा यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव केला.
टिळकांनी भगवद्गीतेचे व्यावहारिक सार देशासमोर मांडल्याचेही शहा यांनी सांगितले.
टिळकांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलपासून सुरुवात करून, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि पुढे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करत एक संपूर्ण शैक्षणिक व्यवस्था उभी केली. ज्ञानाने बुद्धी प्रज्वलित करणे हाच शिक्षणाचा खरा उद्देश आहे, यावर टिळकांचा विश्वास होता, असे शहा म्हणाले.
इंग्रज जर कोणत्या वृत्तपत्रांना घाबरत असतील, तर ती 'केसरी' आणि 'द मराठा' हीच होती, असेही त्यांनी पुढे सांगितले.

देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही, जोपर्यंत लोकांमध्ये राष्ट्रीय जाणिवा जागृत होत नाहीत तोपर्यंत त्या स्वातंत्र्याला काही अर्थ उरणार नाही, हे सर्वात आधी टिळकांनीच सिद्ध केले, असे शहा म्हणाले.
संघटन आणि लोकशक्तीशिवाय देशाची ताकद उभी राहू शकत नाही, यावर भर देऊन टिळकांनी, विविध सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातील जनतेलाच नव्हे, तर देशभरातील नागरिकांना एकत्र आणले, असे त्यांनी सांगितले.
स्वावलंबन, शिस्त आणि राष्ट्र व संविधानाप्रती कर्तव्याची भावना हादेखील स्वराज्याचाच एक अविभाज्य भाग आहे. टिळकांचे जीवन, त्यांचे विचार आणि त्यांचे लेखन आजही युवा व किशोरवयीन पिढीसाठी प्रेरणेचा स्त्रोत असल्याचे शहा यांनी नमूद केले.
आज अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार म्हणजे केवळ एखादे पदक नसून, लोकांना प्रेरित करण्याचे आणि उत्तुंग योगदान देणाऱ्या महान व्यक्तींच्या कार्याची पावती देण्याचे ते एक माध्यम आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समाजात कोणत्याही क्षेत्रात असाधारण योगदान देते, तेव्हा ती केवळ एक व्यक्ती राहत नाही, तर ती खूप उंचावर पोहोचून प्रेरणेचा एक अखंड स्त्रोत बनते. अशा अथांग कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्यच असल्याचे अमित शहा यावेळी म्हणाले.

असे केल्याने समाज आपले कर्तव्य पार पाडतोच, शिवाय अशा आदर्श व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घेण्यासाठी इतरांनाही प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा सन्मान झाल्यामुळे देशसेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोठी प्रेरणा मिळेल, असे शाह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्यात सलग बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी गुजरात पोलिसांनी केवळ त्या बॉम्बस्फोटांचाच नव्हे, तर त्यामागील व्यक्तींचाही तसेच देशभरात झालेल्या सर्व बॉम्बस्फोटांचाही तपास करावा, असे मोदी यांनी सांगितले होते. असे शाह म्हणाले. या तपासासाठी गुजरात पोलिसांसोबत काम करण्यासाठी अजित डोवाल यांना पाचारण करण्याचे निर्देशही मोदी यांनी दिले होते, असे शाह यांनी सांगितले. त्यानंतर समन्वित तपासाच्या माध्यमातून गुजरात पोलिसांनी केवळ अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणच नव्हे, तर देशभरातील आणखी तेरा बॉम्बस्फोट प्रकरणांचाही उलगडा करण्यात यश मिळवले, असे त्यांनी नमूद केले.

नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल आणि देशाच्या अंतर्गत तसेच बाह्य सुरक्षेचे मूल्यमापन केले जाईल, तेव्हा अजित डोवाल यांच्या योगदानासाठी त्यात निश्चितच सुवर्णाक्षरांनी लिहिलेला एक अध्याय असेल, असे शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे परराष्ट्र धोरण अधिक भक्कम झाले असून, जगात भारताने सन्मानाने आणि स्वाभिमानाने आपले स्थान दृढ केले आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या या यशामध्ये अजित डोवाल यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचेही शाह यांनी नमूद केले.

1972 पासून गुप्तचर विभागाचे संचालक होईपर्यंत अजित डोवाल यांनी गुप्तचर विभागाचे अधिकारी म्हणून समर्पितपणे काम केले आणि देशासमोरील प्रत्येक महत्त्वाच्या सुरक्षा आव्हानाचा सामना करण्यात सक्रिय भूमिका बजावली, असे शाह यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ईशान्य भारत, सिक्कीम, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि पाकिस्तानमध्ये कार्यरत असताना अजित डोवाल यांनी दिलेले योगदान असामान्य असून त्याचे वर्णन किंवा मूल्यमापन करणे अशक्य आहे. त्यांनी सांगितले की, अजित डोवाल यांनी पाकिस्तानमध्येही सहा वर्षे, त्यातील अत्यंत महत्त्वाच्या कालावधीत सेवा बजावत देशाच्या सुरक्षेसाठी अमूल्य योगदान दिले.

अमित शाह म्हणाले की, 2019 नंतर मोदी सरकारने मल्टी एजन्सी सेंटर (एमएसी) अधिक सक्षम करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. आज हे केंद्र देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा कणा बनले आहे. एमएसीची भक्कम पायाभरणी अजित डोवाल यांनीच केली असल्याचे त्यांनी नमूद केले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. देशातील सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्य करण्याचा मानही त्यांच्याकडे असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

अमित शाह म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, आधुनिक सुधारणा आणि तंत्रज्ञानासह लष्करी सामर्थ्याचे प्रभावी एकत्रीकरण करण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. अजित डोवाल यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा पंतप्रधानांच्या अनेक निर्णयांमध्ये महत्त्वाचा वाटा राहिला आहे. गेल्या 12 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांची संरक्षण क्षमता आणि आक्रमक तयारी यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला असून या यशामध्ये अजित डोवाल यांचे मोलाचे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

***

सुषमा काणे/शैलेश पाटील/राजश्री आगाशे/वैभवी जोशी/राज दळेकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2293077) आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu