मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

सुधारित 'खेलो इंडिया' योजनेला आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एएनएसएफ) वाढीव सहाय्य द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 31 JUL 2026 4:15PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत  2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी 36,441 कोटी रुपयांच्या एकत्रित तरतुदीसह, विस्तारित 'खेलो इंडिया' योजना आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एएनएसएफ) वाढीव सहाय्य द्यायला मंजुरी देण्यात आली  असून, याद्वारे, युवा विकास आणि राष्ट्रनिर्मितीसाठी खेळाच्या सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यानंतरचा हा देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी क्रीडा विकास कार्यक्रम आहे. या माध्यमातून देशातील तरुणांच्या खेळाप्रति असलेल्या आकांक्षांना मोठे प्रोत्साहन देण्यात आले असून, आगामी दशकात याचा परिवर्तनकारक प्रभाव दिसून येईल.

मंजूर करण्यात आलेला खर्च यापूर्वीच्या 'खेलो इंडिया' योजनेच्या तुलनेत जवळजवळ  आठपट आहे, यामधून युवा विकास, राष्ट्र उभारणी आणि जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून भारताचा उदय करण्यासाठी क्रीडा क्षेत्राला आधारस्तंभ  करण्याप्रति केंद्रसरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित होते.

 शाळेची क्रीडांगणे आणि गावातील क्रीडा मैदानांपासून ते ऑलिम्पिकच्या व्यासपीठापर्यंत, प्रत्येक प्रतिभावान युवा भारतीयासाठी सुलभ मार्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने सुधारित योजनेची रचना केली आहे. भौगोलिक परिस्थिती, आर्थिक पार्श्वभूमी किंवा संधींचा अभाव यामुळे कोणतीही क्रीडा प्रतिभा दुर्लक्षित राहणार नाही, याची खात्री करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

‘खेलो भारत नीती 2025’ आणि ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' याच्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेली ही योजना खेळ, शिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती, तंत्रज्ञान आणि उच्च- कार्यक्षमता प्रशिक्षण यांचा मेळ घालते, तसेच 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे यजमानपद भूषवण्याच्या भारताच्या दीर्घकालीन क्रीडा महत्त्वाकांक्षांचा भक्कम पाया घालते.

प्रत्येक प्रतिभावान तरुणाला उत्कृष्टतेचा मार्ग:

प्रतिभा ओळख आणि शास्त्र-शुद्ध प्रशिक्षणापासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि ऑलिम्पिकच्या तयारीपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर युवा खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी, प्रथमच, खेळाडूंच्या सर्वांगीण विकासाचा एक व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे.

ही योजना एक एकात्मिक आणि देशव्यापी क्रीडा परिसंस्था निर्माण करते. यात राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे (एनसीओई), खेलो इंडिया उत्कृष्टता केंद्रे (केआयसीओईएस), एसएआय प्रशिक्षण केंद्रे (एसटीसी), खेलो इंडिया मान्यताप्राप्त अकादमी (केआयएए), खेलो इंडिया केंद्रे (केआयसी) आणि सशस्त्र दलांच्या युवा क्रीडा कंपन्या (वायएससी) यांचा समावेश आहे. या संस्था एकत्रितपणे देशभरात जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, क्रीडा-विज्ञानाविषयक सहाय्य आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील.

शालेय क्रीडा परिसंस्था मजबूत करण्यासाठी, सरकारने खेलो इंडिया फीडर स्कूल (केआयएफएस) आणि खेलो इंडिया उत्कृष्ट विद्यालये (केआययूव्ही) हे दोन नवीन उपक्रम सुरू केले आहेत. या माध्यमातून खेळांना मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडले जाईल आणि प्रतिभावान मुलांना लवकर ओळखून त्यांना पद्धतशीर प्रशिक्षण देऊन तयार करता येईल.

भारतातील क्रीडापटू भांडार सुमारे दहा पटींनी विस्तारणार:

या योजनेंतर्गत एक महत्त्वाची सुधारणा म्हणजे सध्याच्या खेलो इंडिया क्रीडापटू कार्यक्रमाच्या सोबत होतकरु खेलो इंडिया क्रीडापटू श्रेणीची निर्मिती. यामुळे संरचित खेळाडू विकास परिसंस्था सुमारे दहा पटींनी विस्तारेल आणि त्यायोगे हजारो अतिरिक्त तरुण क्रीडापटू व्यावसायिक प्रशिक्षण,वैज्ञानिक पाठबळ आणि दीर्घकालीन निरीक्षणाच्या कक्षेत येतील.

गुणवत्ता शोध आणि विकास समित्या, क्षेत्रीय समित्या, प्रतिभा शोध, दर्जेदार कामगिरी संचालक आणि दर्जेदार कामगिरी व्यवस्थापक यांचा सहभाग असलेला बळकट राष्ट्रव्यापी गुणवत्ता शोध आराखडा देशभरातील आश्वासक क्रीडापटूंचा शोध, मागोवा आणि विकास सुनिश्चित करतील.

ही  योजना मुलभूत पातळीवरील स्पर्धांपासून खेलो इंडिया पर्यंत आणि त्यापुढे, ऑलिम्पिक पोडीयम लक्ष्य योजनेपर्यंत (टीओपीएस) सुस्पष्ट प्रागतिक मार्ग देखील प्रस्थापित करून, सर्वोच्च स्तरावरील पदकांसाठी पात्र खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचा अनुभव तसेच स्पर्धेत उतरण्यासाठी व्यापक पाठबळ देऊ करते.

अधिक स्पर्धा, अधिक संधी:

क्रीडाविषयक उत्कृष्टता नियमित स्पर्धेवर अवलंबून असते हे लक्षात घेऊन ही सुधारित योजना भारतातील देशांतर्गत स्पर्धाविषयक परिसंस्था लक्षणीयरित्या मजबूत करते. ही योजना राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांसोबतच, तरुण खेळाडूंना निरंतर स्पर्धात्मक अनुभव देण्यासाठी शाळा, विद्यापीठे, प्रादेशिक आणि खेळ-विशिष्ट  लीग क्रीडास्पर्धांना पाठींबा देते.

या योजनेमध्ये महिला क्रीडापटू, पॅरा-अॅथलीट्स, स्वदेशी क्रीडाप्रकार यांच्यासाठी विस्तारित संधी उपलब्ध करून देण्यावर आणि खेळांना शांतता, समावेश आणि सामुदायिक विकासाचे साधन म्हणून चालना देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. ही योजना राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या आयोजनासाठी तसेच भारतात प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा आयोजित करण्यासाठी देखील मदत पुरवते.

अधिक तंदुरुस्त आणि अधिक निरोगी भारताची उभारणी:

तंदुरुस्तीला एक देशव्यापी चळवळ म्हणून चालना देण्यासाठी, विशेषतः तरुणांमध्ये अधिक जागृती करण्यासाठी ‘फिट इंडिया’ चळवळीचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला जाईल. विविध मोहिमा अधिक सक्रीय जीवनशैली, क्रीडाक्षेत्रात महिलांचा सहभाग, सीमावर्ती तसेच दुर्गम भागांमध्ये या चळवळीचा प्रसार तसेच उत्तेजक  पदार्थांच्या विरोधात खेळांवर आधारित उपक्रम यांना प्रोत्साहन देऊन समाज परिवर्तनाचे वाहक म्हणून खेळांना अधिक बळकटी देतील.

प्रशिक्षक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांमध्ये गुंतवणूक:

खेळाडू केवळ जागतिक दर्जाच्या पाठबळ प्रणालीच्या मदतीने उत्तम कामगिरी करू शकतात हे मान्य करत सरकार प्रशिक्षण पात्रतांचे प्रमाणीकरण, व्यावसायिक मानके सुधारणे तसेच देशभरातील प्रशिक्षण आणि मदतनीस कर्मचारीवर्ग यांची क्षमता अधिक बळकट करणे यांसाठी राष्ट्रीय प्रशिक्षक अधिस्वीकृती  मंडळाची (एनसीएबी) स्थापना करणार आहे.

या योजनेत खेळाडूंचे डेटाबेस, पायाभूत सुविधा, स्पर्धा, प्रशिक्षण संसाधने, गुणवत्तेचे मूल्यमापन, निधी आणि 'फिट इंडिया'मधील सहभाग यांची माहिती एकत्र करून एकीकृत डिजिटल क्रीडा व्यासपीठ तयार करण्याच्याही कल्पना आहे. हे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने डेटा-आधारित नियोजन, पारदर्शक प्रशासन आणि वैयक्तिकृत खेळाडूचा विकास करणे शक्य होईल.

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी अधिक दृढ भागीदारी:

क्रीडा पायाभूत सुविधा, गुणवत्ता विकास आणि खेळाडूंना मिळणारे सहाय्य या क्षेत्रांमधील गुंतवणूक, नवोन्मेष आणि कुशलतेचा उपयोग करून घेण्यासाठी सरकार खाजगी अकादमी, कॉर्पोरेट भागीदार आणि इतर संस्थांसोबतचे सहकार्य अधिक दृढ करेल; याद्वारे सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांच्या सहभागाने चालणारी राष्ट्रीय क्रीडा परिसंस्था निर्माण केली जाईल.

भारताच्या जागतिक क्रीडा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास पाठबळ:

सुधारित 'खेलो इंडिया' योजनेला पूरक म्हणून, सरकारने 2026-31 या कालावधीसाठी 'राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सहाय्य' (एएनएसएफ) या योजनेच्या बळकटीकरणासही मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान, आधुनिक उपकरणे, आंतरराष्ट्रीय अनुभव, प्रशिक्षण शिबिरे, परदेशी तज्ज्ञांची सेवा घेण्यासाठी तसेच प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभागासाठी निधी उपलब्ध करून देऊन भारतीय खेळाडूंना आणि संघांना पाठबळ पुरवण्यात येईल. तसेच, या योजनेद्वारे क्रीडा क्षेत्रात 'ग्लोबल साउथ'मधील देशांसोबत सहकार्याला चालना देण्यात येईल तसेच भारताच्या स्वदेशी खेळांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्यात येईल.

विकसित भारतासाठीचे राष्ट्रीय अभियान:

सुधारित 'खेलो इंडिया' योजना ही भारतातील क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासाठी केलेली आतापर्यंतच्या  सर्वात मोठ्या  गुंतवणूकीपैकी एक  आहे. हा केवळ एक क्रीडाविषयक कार्यक्रम नसून, ही संधी, आत्मविश्वास आणि उत्कृष्टतेसह तरुण भारतीयांना सक्षम बनविण्याचे राष्ट्रीय अभियान आहे.

तळागाळातील प्रतिभावंत खेळाडूंपासून जागतिक स्तरावरील क्रीडा-यशापर्यंत पोहोचण्याचा अखंडित मार्ग निर्माण करून, विजेते घडवणे, तंदुरुस्तीची संस्कृती रुजवणे, भारताची क्रीडा परिसंस्था बळकट करणे आणि 'विकसित भारत@2047' च्या ध्येयाकडे वाटचाल करताना देशाला जगातील आघाडीच्या क्रीडा-राष्ट्रांच्या पंक्तीत स्थान मिळवून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

***

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/संजना चिटणीस/मंजिरी गानू/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2292668) अभ्यागत कक्ष : 16