आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पारंपरिक औषधशास्त्राच्या भविष्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) उपयोग करण्याकरिता आयुष मंत्रालय आणि इंडिया एआय (IndiaAI) यांच्यात सहकार्य


आयुषमधील एआय-आधारित नवोन्मेषाला गती देण्यासाठी, संशोधन, डिजिटल आरोग्य आणि क्षमता विकास बळकट करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

पात्र आरोग्य संशोधन सामग्री सामायिक करण्यासाठी आयुष मंत्रालय एआयकोश (AIKosh) प्लॅटफॉर्मवर सहभागी होणार

प्रविष्टि तिथि: 31 JUL 2026 10:31AM by PIB Mumbai

आयुष परिसंस्था मजबूत करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा फायदा घेण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, आयुष मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी आयुष क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-आधारित नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

आयुष मंत्रालयाच्या सहसचिव आणि मुख्य दक्षता अधिकारी डॉ. कविता जैन आणि इंडिया एआय मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव सुदीप श्रीवास्तव यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. आयुष मंत्रालय आणि इंडिया एआयचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आयुष परिसंस्थेत संशोधन आणि नवोन्मेष बळकट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये असलेली क्षमता अधोरेखित करताना डॉ. कविता जैन म्हणाल्या की, आयुष क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश केल्यामुळे पुराव्यावर आधारित संशोधन, ज्ञान व्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन वाटा खुल्या होतील. त्यांनी पुढे सांगितले की, 'इंडिया-एआय' (IndiaAI) बरोबरच्या या सहयोगामुळे संशोधन, औषधी वनस्पती, औषध प्रशासन आणि क्षमता बांधणी यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रगत एआय क्षमतांचा लाभ घेणे शक्य होईल, त्यामुळे आयुष परिसंस्था अधिक तंत्रज्ञान-आधारित आणि भविष्यासाठी सज्ज होईल.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव सुदीप श्रीवास्तव यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि भारताच्या पारंपरिक ज्ञान प्रणालींचे एकत्रीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, इंडिया एआय आणि आयुष मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करार हा एआयकोश (AIKosh) ला पारंपरिक आरोग्यसेवे विषयक डेटासेट द्वारे समृद्ध करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, तसेच, हा करार एआय-आधारित नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे पारंपरिक वैद्यकशास्त्रातील संशोधक आणि व्यावसायिकांना सक्षम करेल.

आयुष ग्रिडचे ओएसडी नमन गोयल यांनी नमूद केले की, ‘उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या घटकांतर्गत, आयुष क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी आयुष ग्रिडद्वारे एआय-आधारित प्लॅटफॉर्म्स विकसित केले जात आहेत. आयुष परिसंस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार करण्यासाठी प्रस्तावित सामंजस्य करार हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे ते म्हणाले.

पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक 'एआय' क्षमतांची ताकद एकत्र आणून, तंत्रज्ञानावर आधारित 'आयुष' परिसंस्था उभारण्याच्या दिशेने हे सहकार्य एक महत्वाचे पाऊल आहे. ही भागीदारी संशोधन, क्षमता बांधणी, औषधी वनस्पती आणि औषध प्रशासन यासारख्या 'आयुष' क्षेत्रांमधील प्रमुख विभागांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब आणि वापराला गती देण्यावर लक्ष केंद्रित करेल.

या सहकार्याचा एक भाग म्हणून, आयुष मंत्रालय एआयकोश (AIKosh) प्लॅटफॉर्मवर सहभागी होईल, यामुळे डेटासेट, मेटाडेटा, एआय मॉडेल्स, टूलकिट्स आणि संबंधित उपयोग यासह, पात्र आरोग्य संशोधन सामग्रीची देवाणघेवाण करणे शक्य होईल. या एकत्रीकरणामुळे आयुष क्षेत्रासाठी एआय सोल्यूशन्सच्या अधिक सहकार्याला, नावीन्यपूर्णतेला आणि जबाबदार विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

या सामंजस्य करारामुळे, निश्चित केलेल्या सेवा-स्तर करारांच्या अधीन राहून, इंडिया एआय उपक्रमाद्वारे जीपीयू-आधारित आणि उच्च-कार्यक्षमता संगणकीय पायाभूत सुविधा अनुदानित दरात उपलब्ध व्हायला सहाय्य होईल. प्रगत संगणकीय पायाभूत सुविधांची उपलब्धता महत्त्वपूर्ण पायाभूत गरजा पूर्ण करायला, तसेच आरोग्यसेवा आणि पारंपरिक वैद्यकशास्त्रातील प्रगत एआय संशोधन आणि उपयोगांचा विस्तार करायला समर्थन देईल, अशी अपेक्षा आहे.

हा उपक्रम भारताचा पारंपरिक वैद्यकशास्त्राचा समृद्ध वारसा आणि अत्याधुनिक डिजिटल आणि एआय तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे. यामुळे अधिक नाविन्यपूर्ण, पुरावा-आधारित आणि भविष्यासाठी सज्ज आयुष परिसंस्थेचा मार्ग मोकळा झाला आहे.

***

अंबादास यादव/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2292423) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Telugu