राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बस्तर मंडलमधल्या शिष्टमंडळाची राष्ट्रपतींची भेट

प्रविष्टि तिथि: 30 JUL 2026 7:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,30 जुलै 2026

बस्तर पंडुम 2026 चे विजेते, बस्तरचे परगणा मांझी आणि चलाकी यांचा समावेश असलेल्या बस्तर मंडलमधल्या  शिष्टमंडळाने आज (30 जुलै 2026) राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, बस्तर पंडुम हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून बस्तरच्या गौरवशाली परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचा उत्सव आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बस्तरची खरी ओळख प्रस्थापित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. बस्तर पंडुमसारख्या कार्यक्रमांमुळे युवकांचा आपल्या परंपरा, रूढी आणि सांस्कृतिक वारशाशी पुन्हा संबंध प्रस्थापित होण्यास महत्त्वपूर्ण मदत झाली आहे. अशा कार्यक्रमांमुळे पर्यटनाला चालना मिळते आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतात, असे त्यांनी सांगितले.

सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि बस्तरमधील नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा प्रदेश विकासाच्या नव्या मार्गावर वाटचाल करत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. हिंसाचाराच्या वातावरणातून बाहेर पडून येथील नागरिक शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या नव्या संधी स्वीकारत आहेत. हा बदल बस्तरच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आदिवासी युवक शिक्षण, विज्ञान, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत आपली प्रतिभा सिद्ध करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. आदिवासी समाजात क्रीडा आणि कलाक्षेत्रातील नैसर्गिक कौशल्य आहे. छत्तीसगडमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बस्तर ऑलिम्पिकचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

आदिवासी समाज आपली सांस्कृतिक ओळख जपत आणि तिचा प्रसार करत विकासाच्या प्रवासात सक्रिय भागीदार होईल  तसेच राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. सहकार्य आणि सलोखा  यांची संस्कृती अधिक बळकट करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. महिला, बालके, वंचित घटक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.


सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2292015) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Malayalam