वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खेळणी उद्योग क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केली विशेष कृती दलाची घोषणा, 2032 पर्यंत जागतिक खेळणी बाजारपेठेत भारताला 5 टक्के वाटा मिळवून देण्याचे उद्दिष्ट


उत्पादन, नवोन्मेष आणि निर्यातीला बळ देण्यासाठी पीयूष गोयल यांच्या हस्ते टॉय सेक्टर प्लेबुकचे उद्घाटन प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 27 JUL 2026 9:51PM by PIB Mumbai
भारताचा जागतिक खेळणी बाजारपेठेतील वाटा 2032 सालापर्यंत 5 टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरता आणि खेळणी क्षेत्राला आवश्यक ते सर्व पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली. नवी दिल्लीतील वाणिज्य भवन इथे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने या क्षेत्रातील भागधारकांची बैठक आयोजित केली होती. टीम अप फॉर टॉईज : ड्रायव्हिंग स्केल, इनोव्हेशन अँड एक्स्पोर्ट्स अर्थात खेळण्यांसाठी एकत्र येत, या क्षेत्राची व्याप्ती, नवोन्मेष आणि निर्यात वाढवणे ही या बैठकीची संकल्पना होती. या बैठकीत गोयल  यांनी ही घोषणा केली.
हा विशेष कृतीदल सहा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करणार आहे. याअंतर्गत जागतिक मूल्य साखळीसोबत जोडून घेणे, उत्पादन क्षमतेला बळकटी देणे, मूल्य साखळीतील अडथळे दूर करणे, कुशल मनुष्यबळ घडवणे आणि रोजगार निर्मिती करणे, डिझाइन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे तसेच व्यवसाय सुलभतेत विस्तार घडवून आणणे अशा उद्दिष्टांचा अंतर्भाव आहे.
या कार्यक्रमाच्या निमीत्ताने धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे, उत्पादक, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, कारागीर आणि डिझायनर एकत्र आले होते. या सगळ्यांनी भारतातील खेळणी क्षेत्राच्या भविष्यातील विकासाच्या वाटचालीवर विचारमंथन केले.  या कार्यक्रमादरम्यान टॉय सेक्टर प्लेबुकचे उद्घाटनही करण्यात आले.
यावेळी पीयूष गोयल यांनी उपस्थितातंना संबोधित केले. भारताच्या खेळणी उद्योगाने केलेली उल्लेखनीय प्रगती ही विकसित भारताच्या दिशेने देशाच्या सुरू असलेल्या व्यापक वाटचालीची प्रचिती देणारी आहे असे ते म्हणाले. उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी प्रगत तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची गुणवत्ता, स्थानिक उत्पादनावर भर देणारी, भक्कम ब्रँडिंग असलेली आणि जागतिक मूल्य साखळीसोबत अधिक एकात्मिक असलेली खेळण्याची देशांतर्गत उत्पादनाची परिपूर्ण परिसंस्था उभारण्यासाठी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी उद्योग क्षेत्रातील भागधारकांना केले.
त्यानंतर पीयूष गोयल यांच्या हस्ते टॉय सेक्टर प्लेबुकचे उद्घाटन करण्यात आले.  हे प्लेबुक म्हणजे उत्पादक, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र, गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिलेला एक सर्वंकष आराखडा आहे. या प्लेबुकच्या माध्यमातून उत्पादन परिसंस्था, मूल्य साखळी, मानके आणि अनुपालनासंबंधीच्या गरजा, कौशल्य विकास, उत्पादनातील नवोन्मेष, बौद्धिक मालमत्ता, निर्यात तसेच उदयोन्मुख बाजारपेठेतील संधींबाबत कृतीशील मार्गदर्शन उपलब्ध करून दिले गेले आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या स्पर्धात्मकतेला बळकटी देण्याच्या आपले अस्तित्व विस्तारण्याची इच्छा असलेल्या भागधारकांसाठी एक व्यवहार्य संसाधन उपलब्ध करून देणे हा या प्लेबूक मागचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांमुळे घडून आलेल्या सकारात्मक परिणामांचीही माहिती दिली. उद्योग क्षेत्राने नवोन्मेष, डिझाइनमधील उत्कृष्टता, शाश्वतता, व्याप्ती आणि निर्यातीवर भर द्यायला हवा असे आवाहन त्यांनी केले, यामुळे जागतिक पातळीवर भारतीय खेळण्यांच्या ब्रँडची दखल घेतली जाईल आणि देश खेळण्यांचे डिझाइन, उत्पादन आणि निर्यातीचे एक प्रमुख केंद्र म्हणून स्थान निर्माण करू शकेल असे ते म्हणाले.
स्केलचे (SCALE) अध्यक्ष डॉ. पवन गोयंका यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. वेगाने विस्तारत असलेल्या जागतिक खेळणी उद्योग क्षेत्रातील संधी त्यांनी अधोरेखित केल्या. जागतिक पुरवठा साखळीत आज वैविध्यीकरण घडून येत आहे, अशा काळात भारत हा उत्पादन आणि निर्यातीचे एक विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयाला येण्याच्यादृष्टीने भक्कम स्थितीत आहे ही बाब त्यांनी नमूद केली. देशांतर्गत बाजारपेठेत प्रगतीची मजबूत क्षमता असल्याचेही त्यांनी सांगितले. व्याप्तीचा विस्तार, नवोन्मेष, डिझाइनची क्षमता आणि निर्यात स्पर्धात्मकतेत वाढ घडवून आणत, 2032 पर्यंत जागतिक खेळणी बाजारातील भारताचा वाटा 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची आकांक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
***
Neha Kulkarni / TusharPawar / DineshYadav
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2290294) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Punjabi