संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय संरक्षण दले पूर्णपणे सज्ज आहेत- कारगिल विजय दिवस 2026 च्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

प्रविष्टि तिथि: 25 JUL 2026 9:10PM by PIB Mumbai

 

शत्रूचे मनसुबे अजूनही बदललेले नसताना आणि ते छुप्या युद्धाचा तसेच घुसखोरीसारख्या कुरापतींचा वापर करत असतानाही, भारतीय संरक्षण दले कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत," असे प्रतिपादन  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. 27 व्या कारगिल विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला 25 जुलै 2026 रोजी द्रास येथील एका स्मृती कार्यक्रमात ते  बोलत होते. 1999 च्या कारगिल युद्धात भारताला विजय मिळवून देणाऱ्या शूरवीरांना त्यांनी आदरांजली अर्पण केली. अतिशय बिकट आणि कठीण परिस्थितीत दाखवलेले धैर्य, निश्चय आणि देशभक्ती सैन्यदलासह संपूर्ण देशाला सातत्याने प्रेरणा देत आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जोपर्यंत देशाच्या शूर सैनिकांची देशभक्ती आणि निश्चय अढळ आहे, तोपर्यंत भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही, असे राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त करताना सांगितले. सैनिकांच्या धैर्यामुळेच देशातील प्रत्येक नागरिक निर्भयपणे आपली स्वप्ने पूर्ण करू शकत आहे, असे त्यांनी सांगितले.

'बडा खाना'  च्या निमित्ताने सैनिकांशी संवाद साधताना संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की "कारगिल विजयाचे स्मरण करताना आपल्याला अभिमान वाटत असला, तरी आपल्यापुढील आव्हाने कमी झालेली नाहीत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे." पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सैनिकांच्या  कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच सैन्यदलांना जागतिक दर्जाची शस्त्रे आणि प्रशिक्षण मिळावे यासाठी संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकतेवर सातत्याने भर दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विश्वनाथन स्टेडियम येथे आयोजित 'शौर्य भोज' कार्यक्रमात ड्रोन्स, रोबोटिक म्युल्स आणि आर्मी मार्शल आर्ट्स रुटीनच्या कवायतींचे सादरीकरण करण्यात आले, तसेच या प्रदेशाचा समृद्ध वारसा दर्शवणारा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.

शौर्य संध्या

शौर्य भोज'पूर्वी  राजनाथ सिंह  कारगिल युद्ध स्मारकाच्या परिसरात 'शौर्य संध्या' कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात  देशभक्तीपर सुरावटींनी 'ऑपरेशन विजय'च्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठीचे वातावरण निर्माण केले. कारगिल युद्धातील वीरांच्या कुटुंबांचे धैर्य, कणखरपणा आणि त्यागाचा सन्मान म्हणून या वीरांच्या 10 वारसांचा  सत्कार करण्यात आला.

संरक्षण मंत्र्यांना 'वीरों की मिट्टी' असलेला एक कलश देण्यात आला. धर्मगुरूंनी केलेल्या सर्वधर्म प्रार्थनांनंतर  'बीटिंग रिट्रीट'  आणि राष्ट्रगीत झाले. त्यानंतर, संरक्षण मंत्र्यांनी युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून स्मारकावर दीपप्रज्वलन केले.

युद्ध संस्मरण

स्मरणोत्सवाच्या कार्यक्रमांची सुरुवात लामोचेन व्ह्यू पॉइंट येथे आयोजित 'युद्ध संस्मरण' या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाला कारगिल युद्धातील माजी सैनिक, हुतात्मा सैनिकांचे नातेवाईक  आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात 'युद्ध संस्मरण' या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले आणि 'ऑपरेशन विजय'च्या 40 वीरांच्या अद्वितिय शौर्याची आणि पराक्रमाची गाथा सांगणारा एक लघुपट दाखवण्यात आला. यानंतर हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला, त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सैनिकांच्या आठवणींना उजाळा दिला.

गौरवमयी संस्कृती

विश्वनाथन स्टेडियमवरील दुपारच्या सत्रातील कार्यक्रमाची सुरुवात लडाख स्काउट्स रेजिमेंटल सेंटर बँडच्या देशभक्तीपर सादरीकरणाने झाली. यानंतर कोअर ऑफ मिलिटरी पोलीस सेंटर अँड स्कूलच्या 'श्वेत अश्व' पथकाने चित्तथरारक मोटरसायकल कसरतींचे सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी अचूक रायडिंग, शिस्त आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचे दर्शन घडवले.

विद्यार्थ्यांनी जोष आणि उत्साहाने भरलेले 'राष्ट्रीय एकात्मता नृत्य' सादर केले, तसेच उंच आणि कठीण भूप्रदेशातील कारवायांसाठी भारतीय सैन्याकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर कसा केला जात आहे, याचीही झलक दाखवली. या कार्यक्रमानंतर 'विजय भोज'चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात स्मरण, कृतज्ञता आणि एकतेच्या भावनेने मान्यवर, माजी सैनिक, कार्यरत सैनिक आणि वीरांची कुटुंबे एकत्र आली.

26 जुलै 2026 रोजी 'श्रद्धांजली समारोहा'दरम्यान संरक्षण मंत्री देशाच्या वतीने 'ऑपरेशन विजय'च्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करतील आणि या सोहळ्याची सांगता होईल. कारगिल युद्धादरम्यान आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, भारतीय लष्कराचे 537, भारतीय हवाई दलाचे 05, सीमा सुरक्षा दलाचा  01 जवान आणि 02 नागरिक यांचा समावेश असलेल्या 545 शूरवीरांना  या स्मरणोत्सवाद्वारे श्रद्धांजली वाहिली जात आहे. या वीरांच्या सर्वोच्च बलिदानाने भारताचा विजय सुनिश्चित केला आणि देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण केले.

***

माधुरी पांगे/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2289502) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu