इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल इंडिया भाषिणी विभागाकडून गोव्यात 'भाषिणी राज्यम्'चा शुभारंभ; कोकणी आणि भारतीय भाषांमध्ये एआय-आधारित सुशासनाला देणार गती


मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन ए. खंवटे आणि वरिष्ठ नेते बहुभाषिक एआय (AI) विषयीच्या राज्यस्तरीय सहभाग कार्यशाळेत सहभागी

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2026 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,21 जुलै 2026

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), भारत सरकार अंतर्गत कार्यरत डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने (DIBD) माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण विभाग, गोवा सरकार यांच्या सहकार्याने बहुभाषिक एआय (AI) ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भाषा-केंद्रित डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी पणजी येथे 'भाषिणी राज्यम्: स्टेट एंगेजमेंट वर्कशॉप'चे आयोजन केले. या कार्यक्रमात धोरणकर्ते, वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, विचारवंत, स्टार्ट-अप्स आणि भाषा तज्ज्ञ एकत्र आले होते. डिजिटल सुशासनाला अधिक सर्वसमावेशक, सुलभ आणि बहुभाषिक बनवण्याची सामायिक वचनबद्धता दर्शवत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण, पर्यटन, मुद्रण आणि लेखनसामग्री मंत्री रोहन ए. खंवटे  या कार्यक्रमात सहभागी झाले.

कोकणी भाषेवर विशेष भर देत, एआय-आधारित भाषा तंत्रज्ञान हे नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत सरकारी सेवा, माहिती आणि डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन डिजिटल सुशासनाला कसे अधिक सर्वसमावेशक बनवू शकते, यावर या कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला. या चर्चेदरम्यान अशा 'व्हॉईस-फर्स्ट'  परिसंस्थेच्या निर्मितीमध्ये बहुभाषिक एआयच्या भूमिकेवर भर देण्यात आला, जिथे सार्वजनिक सेवा पुरवठ्यात भाषा हा यापुढे अडथळा राहणार नाही.

उद्घाटन सत्रात  संतोष सुखदेवे, आयएएस, सचिव, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण विभाग, गोवा सरकार;  प्रसाद लोलायेकर, आयएएस, सचिव, उच्च शिक्षण, गोवा सरकार; डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार, डिचोली आणि अध्यक्ष, इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लि.;  रोहन ए. खंवटे, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण, पर्यटन, मुद्रण आणि लेखनसामग्री मंत्री, गोवा सरकार; आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, यांनी मार्गदर्शन केले.

मुख्य भाषणात आपले विचार व्यक्त करताना, डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अमिताभ नाग यांनी बहुभाषिक एआय  द्वारे संचालित भाषा-केंद्रित डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी भाषिणीच्या दृष्टिकोनाची रूपरेषा मांडली. त्यांनी शासन, पर्यटन, आरोग्य, शिक्षण, बँकिंग आणि नागरिक सेवांमध्ये याच्या वाढत्या प्रभावावर भर दिला, तसेच कोकणीसह प्रादेशिक भाषांच्या परिसंस्थेला बळ देण्यासाठी आणि सर्वसमावेशक डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सरकार, शैक्षणिक क्षेत्र, स्टार्ट-अप्स आणि भाषा तज्ज्ञांमध्ये अधिक भक्कम सहकार्याचे आवाहन केले.

या कार्यशाळेत नॅशनल हब फॉर लँग्वेज टेक्नॉलॉजी (NHLT) वर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आणि भाषिणीच्या  बहुभाषिक एआय सोल्यूशन्सच्या विस्तारणाऱ्या परिसंस्थेचे प्रदर्शन करण्यात आले. सहभागींना 'भाषिणी ॲप मित्र', 'भाषिणी मित्र' आणि 'भाषिणी प्रवक्ता' यांची ओळख करून देण्यात आली, तसेच एआय-आधारित भाषांतर, स्पीच रेकग्निशन , टेक्स्ट-टू-स्पीच, ट्रान्सलिटरेशन आणि बहुभाषिक एपीआय ही सरकारी ॲप्लिकेशन्स आणि नागरिकांसाठीच्या डिजिटल सेवांमध्ये सहजपणे कशा प्रकारे समाविष्ट केली जाऊ शकतात, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

भाषिणी टीमने त्यांच्या एआय-आधारित भाषा सोल्यूशन्सचे थेट प्रात्यक्षिक  दाखवले, ज्यामुळे उपस्थितांना बहुभाषिक संभाषण, भाषांतर, ट्रान्सक्रिप्शन आणि दस्तऐवज-आधारित तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेता आला. या प्रात्यक्षिकांमध्ये, भाषिणी ही नागरिक-केंद्रित सुशासनाला बळ देण्यासोबतच पर्यटन सेवा, सार्वजनिक माहिती आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर अडथळामुक्त बहुभाषिक प्रवेश कसा उपलब्ध करून देऊ शकते, ज्यामुळे नागरिक आणि पर्यटक दोघांचाही डिजिटल अनुभव अधिक समृद्ध होईल, ही बाब अधोरेखित करण्यात आली.

सरकार, शैक्षणिक क्षेत्र, भाषा तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान भागीदार यांच्यातील सहकार्याद्वारे कोकणी भाषा परिसंस्थेला बळ देण्यावर केंद्रित एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चेदरम्यान भाषेचा डेटासेट विस्तारणे, एआय मॉडेल्स अधिक उन्नत करणे आणि संपूर्ण गोव्यात बहुभाषिक एआयच्या वापराला गती देण्यासाठी राज्य-निहाय वापराची उदाहरणे  शोधण्याच्या संधी आदींचा आढावा घेण्यात आला.

वापराच्या उदाहरणांवरील ओपन माईक सत्रात शासन, पर्यटन, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक सेवांमध्ये बहुभाषिक एआयच्या  राज्य-निहाय उपयोगांवर चर्चा झाली. तसेच, अधिक सर्वसमावेशक आणि भाषा-केंद्रित सार्वजनिक सेवा प्रदान करण्यासाठी गोव्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर भाषिणीला समाविष्ट करण्याच्या संधींचा शोध घेण्यात आला.

भाषा-केंद्रित डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी राज्य सरकारांसोबत सातत्याने काम करण्याच्या भाषिणीच्या (BHASHINI) वचनबद्धतेचा या कार्यशाळेत पुनरुच्चार करण्यात आला. कोकणी भाषा परिसंस्थेला बळ देण्यासाठी, प्राधान्यक्रमाच्या वापराची उदाहरणे विचारात घेण्यासाठी आणि सरकारी सेवांमध्ये बहुभाषिक एआयचा  वापर वाढवून अधिक सुलभ, सर्वसमावेशक आणि नागरिक-केंद्रित सुशासन सक्षम करण्यासाठी गोवा सरकारसोबतच्या अधिक सखोल सहकार्याची ही सुरुवात ठरली.

"भाषिणी राज्यम् कार्यशाळा हे एक सर्वसमावेशक, एआय-आधारित  डिजिटल गोवा घडवण्याच्या दिशेने पडलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबतच्या आमच्या सहकार्याद्वारे भाषेशी संबंधित अडथळे दूर करणे आणि गोव्यातील अगदी दूरवरच्या भागातील नागरिकांसह प्रत्येक नागरिकाला कोकणी भाषेतून डिजिटल सेवा मिळतील, हे सुनिश्चित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जसे एआय अधिक सुलभ होत आहे, तसतसे आपल्या भाषेचे जतन आणि सक्षमीकरण करणे हे गोव्याच्या डिजिटल भविष्यासाठी आणि नवोन्मेषकारी प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे," असे गोवा सरकारचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण, पर्यटन, मुद्रण आणि लेखनसामग्री मंत्री  रोहन ए. खंवटे म्हणाले.

डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग म्हणाले,  “एका सर्वसमावेशक प्रात्यक्षिकाद्वारे एका गोवेकर तरुणाच्या आवाजावर आधारित काल्पनिक प्रवास सादर करण्यात आला. यामध्ये भाषिणीची बहुभाषिक एआय  परिसंस्था आवाजाच्या माध्यमातून शासन आणि सार्वजनिक सेवांशी सहज संवाद साधण्यास कशी सक्षम करू शकते, हे अधोरेखित करण्यात आले. या व्यक्तिरेखा-आधारित प्रवासाने सरकारी योजना आणि डिजिटल सेवांचा लाभ घेण्यापासून ते शिक्षण आणि नागरिक सहाय्यापर्यंत, मुख्य टप्पे स्पष्ट केले. एआय-आधारित व्हॉईस तंत्रज्ञान हे सेवा पुरवठा अधिक सर्वसमावेशक, सुलभ आणि भाषा-केंद्रित कसा बनवू शकते, हे यातून सिद्ध झाले. तसेच या सत्रात एआय क्षमता मजबूत करण्यासाठी आणि कोकणी भाषेत आवाजावर आधारित डिजिटल सार्वजनिक सेवांच्या निर्मितीला गती देण्यासाठी उच्च दर्जाचे कोकणी भाषा डेटासेट विकसित करण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला.”

डिजिटल इंडिया भाषिणी विभाग (DIBD) विषयी:

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC), MeitY अंतर्गत कार्यरत डिजिटल इंडिया भाषिणी विभाग (DIBD), हा एआय-आधारित बहुभाषिक डिजिटल समावेशन साधणारा भारताचा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म आहे. भाषिणी 800 हून अधिक सरकारी वेबसाइट्सना सेवा पुरवते, याद्वारे 8 अब्जाहून अधिक एआय इनफरन्सेस झाले आहेत, दररोज 20 दशलक्षाहून अधिक एआय इनफरन्सेस प्रक्रियांमधून जातात आणि हे 36 भारतीय टेक्स्ट भाषा, 23 भारतीय व्हॉईस भाषा व 35 आंतरराष्ट्रीय भाषांना पाठबळ देतात. यामुळे लँग्वेज एआयच्या  माध्यमातून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा अधिक सुलभ बनत आहेत.


आशिष सांगळे /शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2287334) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu