गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
कॅच द रेन मोहिमेअंतर्गत एमओएचयूए द्वारे अमृत च्या 75 शॅलो ॲक्विफर मॅनेजमेंट राबवणाऱ्या शहरांसोबत राष्ट्रीय स्तरावरील संवाद सत्राचे आयोजन
नागपूर, विजयनगरम, भुवनेश्वर आणि कोरबा यांसारख्या अनेक शहरांनी या कार्यक्रमाद्वारे मिळालेल्या उत्साह वाढवणाऱ्या निष्कर्षांवर प्रकाश टाकला
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2026 10:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2026
संपूर्ण देशात राबवण्यात येणाऱ्या कॅच द रेन मोहिमेचा एक भाग म्हणून, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (एमओएचयूए) राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (एनआययुए) च्या सहकार्याने, अमृत अंतर्गत शॅलो ॲक्विफर मॅनेजमेंट (एसएएम) म्हणजेच उथळ जागेतील भूजल साठा व्यवस्थापन कार्यक्रम राबवणाऱ्या 75 शहरांसोबत एका राष्ट्रीय संवाद सत्राचे आयोजन केले. या कार्यक्रमामुळे सहभागी शहरांना त्यांनी केलेली प्रगती सादर करण्याची, सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्याची आणि शहरी जलसुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशाने पूर्ण केलेल्या भूजल पुनर्भरण उपक्रमांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली.
एसएएम कार्यक्रम शास्त्रीय नियोजन आणि तांत्रिक मार्गदर्शनाद्वारे शहरांमध्ये भूजल पुनर्भरण वाढवण्यास मदत करतो. या कार्यक्रमांतर्गत, 75 शहरे विविध पुनर्भरण उपाययोजना राबवत आहेत; यामध्ये रिचार्ज शाफ्ट्स, इंजेक्शन विहिरी, चेक डॅम्स, गॅबियन भिंती, गोलाकार कालवे आणि मॉड्यूलर रिचार्ज खड्डे यांचा समावेश आहे. यामुळे सातत्याने पावसाच्या पाण्याचे संकलन, जलस्तरांचे पुनर्भरण आणि हवामान बदलाचा सामना करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होत आहे.
या संवाद सत्राचे अध्यक्षपद एमओएचयूए च्या अतिरिक्त सचिव डी. थारा यांनी भूषवले, तर एमओएचयूए च्या सहसचिव ईशा कालिया यांनी याचे संचालन केले. यामध्ये 75 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. शहरांनी अंमलबजावणीचे अनुभव, प्रमुख निष्कर्ष, आव्हाने आणि भूजल पुनर्भरण उपक्रमांचा विस्तार करण्याबाबतच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली.

अनेक शहरांनी या कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या उत्साहवर्धक निष्कर्षांवर प्रकाश टाकला. कोरबा शहराने त्यांच्या एसएएम उपक्रमांच्या यशानंतर आणखी 95 बुजलेल्या बोअरवेल्स पुनरुज्जीवित करण्याची योजना जाहीर केली. विजयनगरमने भूजल पातळीत सुधारणा झाल्याचे सांगितले, तर नागपूरने चालू मोसमी पावसाळ्याच्या काळात आणखी 100 पुनर्भरण संरचना उभारण्याचे आश्वासन दिले. भुवनेश्वरने नमूद केले की, एसएएम उपक्रमांमुळे केवळ भूजल पुनर्भरणच वाढले नाही, तर पावसाच्या पाण्याचे जमिनीत झिरपण्याचे प्रमाण सुधारल्यामुळे शहरी पूरस्थिती कमी होण्यासही मदत झाली आहे.
भूजल तज्ज्ञांनी भूजल पुनर्भरण उपक्रमांची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी लोकसहभाग आणि स्थानिक नेतृत्वाच्या महत्त्वावर भर दिला.
या संवाद सत्राने वैज्ञानिक, निसर्ग-आधारित आणि समुदाय-नेतृत्वाखालील उपक्रमांद्वारे अमृत अंतर्गत शाश्वत भूजल व्यवस्थापनाला चालना देण्याच्या एमओएचयूए च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच, जल-सुरक्षित आणि हवामान-लवचिक शहरे उभारण्याच्या कॅच द रेन मोहिमेच्या उद्दिष्टांनाही यामुळे मजबूती प्राप्त झाली.
आशिष सांगळे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2287143)
आगंतुक पटल : 8