विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणाविरुद्ध लोकचळवळीचे आवाहन; लवकर निदान आणि विज्ञानाधारित जनजागृतीवर भर

प्रविष्टि तिथि: 19 JUL 2026 3:55PM by PIB Mumbai

 

कर्करोग, मधुमेह, लठ्ठपणा आणि  जीवनशैलीशी संबंधित इतर आजारांविरुद्ध देशव्यापी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन  केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), तसेच पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज केले.  कर्करोग, मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर असंसर्गजन्य आजारांच्या वाढत्या ओझ्याला भारताने दिलेला प्रतिसाद हा केवळ रुग्णालयांपुरता मर्यादित न राहता, लवकर निदान, योग्य वैद्यकीय सल्ला आणि पुराव्यावर आधारित आरोग्यसेवा यांवरील भर हा केंद्रित व्यापक लोकचळवळीत रूपांतरित झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री म्हणाले की आज देशासमोर केवळ जनजागृतीचा अभाव हेच आव्हान नाही, तर आरोग्यविषयक चुकीच्या माहितीचा मोठ्या प्रमाणावर होणारा प्रसार हेही गंभीर आव्हान आहे. त्यामुळे विकसित भारताचे ध्येय साकार करण्यासाठी वैज्ञानिक संवाद आणि पुराव्यावर आधारित आरोग्यविषयक संवाद पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरतो.

डॉ. जितेंद्र सिंह हे कर्करोगावर मात केलेले रुग्ण, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी वरिष्ठ सल्लागार डॉ. अखिलेश गुप्ता लिखित 'अनब्रोकन: माय बॅटल विथ कॅंसर अॅंड द वील टू लीड' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाला नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ, शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ सरकारी अधिकारी, संशोधक आणि वैज्ञानिक समुदायातील सदस्य उपस्थित होते. कर्करोगावर यशस्वी मात केल्यानंतर डॉ. गुप्ता यांनी दाखविलेल्या जिद्दीच्या प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करण्यासाठी सर्वजण एकत्र आले होते.

या पुस्तकाचे वर्णन केवळ वैयक्तिक आत्मचरित्रापेक्षा कितीतरी अधिक असे करत, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की हे पुस्तक धैर्य, जिद्द, प्रामाणिकपणा आणि विज्ञानावरील अढळ विश्वास यांच्या असामान्य प्रवासाचे दस्तऐवजीकरण करते. आपण हे पुस्तक संपूर्ण वाचले असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठीच नव्हे, तर डॉक्टर, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि युवा व्यावसायिकांसाठीही यात महत्त्वाचे धडे आहेत. दृढनिश्चय आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीचे प्रेरणेत रूपांतर कसे करता येते, हे या पुस्तकातून प्रभावीपणे दाखवून दिले आहे.

विज्ञान आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की भारत आता भारतीय गरजांसाठी भारतीय माहितीवर आधारित उपाय विकसित करत आहे. 'जीनोम इंडिया` कार्यक्रमाचा संदर्भ देत, स्वदेशी जैवतंत्रज्ञानातील नवकल्पना आणि कर्करोगासह विविध आजारांसाठी परवडणाऱ्या प्रगत उपचारपद्धतींचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की देशाची वैज्ञानिक परिसंस्था भारतीय परिस्थितीला अनुरूप जागतिक दर्जाचे आरोग्यविषयक उपाय सातत्याने विकसित करत असून अत्याधुनिक उपचार अधिक परवडणारे आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देत आहे.

***

माधुरी पांगे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2286334) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil