विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारितील तंत्रज्ञान विकास मंडळाने स्कायरुट कंपनीच्या वाटचालीच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच त्यांच्या उत्कृष्टतेची दखल घेत कंपनीची 2022 च्या राष्ट्रीय तंत्रज्ञान स्टार्टअप पुरस्कारासाठी केलेली निवड ठरली सार्थ

प्रविष्टि तिथि: 19 JUL 2026 10:25AM by PIB Mumbai

 

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारितील तंत्रज्ञान विकास मंडळाने  विक्रम - 1 मोहिम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचे अभिनंदन केले आहे. या मोहिमेच्या यशस्वी होण्याचा क्षण भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. या यशाने स्वदेशी अंतराळ तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र म्हणून भारताच्या वाढत्या स्थानाला अधिक बळकटी दिली आहे. यासोबतच देशांतर्गत विकसित होत असलेल्या डीप टेक अर्थात उच्च प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेषामध्ये, परिवर्तन घडवून आणण्याची मोठी क्षमताही या यशातून अधोरेखित झाली आहे.

 

व्यावसायिक पातळीपर्यंत पोहोचण्याची मोठी क्षमता असलेल्या आश्वासक स्वदेशी तंत्रज्ञानाचा शोध घेणे, त्यांची दखल घेणे आणि अशा तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञान विकास मंडळ दीर्घकाळापासून वचनबद्धतेने काम करत आले आहे. मंडळाच्या या वचनबद्धतेला या ऐतिहासिक यशामुळे नव्याने बळ लाभले आहे.

प्रक्षेपकाशी संबंधित स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील स्कायरूट एरोस्पेसने केलेल्या पथदर्शी कामगिरीची दखल घेऊनच, तंत्रज्ञान विकास मंडळाने स्कायरुट कंपनीला 2022 सालच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन सोहळ्यात, राष्ट्रीय तंत्रज्ञान स्टार्टअप पुरस्काराने सन्मानित केले होते. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच भू विज्ञान मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्या पुरस्कार वितरण सोहळ्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन सचिव डॉ. श्रीवारी चंद्रशेखर आणि तंत्रज्ञान विकास मंडळाचे सचिव राजेश कुमार पाठक उपस्थित होते.

 

छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपण बाजाराची गरज लक्षात घेऊन, विकसित केलेल्या स्वदेशी क्रायोजेनिक, द्रव आणि घन इंधन तंत्रज्ञानासाठी स्कायरूट एरोस्पेसला हा पुरस्कार दिला गेला होता. या पुरस्काराच्या माध्यमातून स्कायरूट एरोस्पेसने आपल्या वाटचालीच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच दाखवलेल्या, तंत्रज्ञान विषयक उत्कृष्टतेची तसेच व्यावसायिक क्षमतेची गौरवपूर्ण दखल घेतली गेली होती. विक्रम - 1 या मोहिमेच्या या यशातून राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कारांमागच्या उद्देशाचीही प्रचिती आली आहे. राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर मोठा प्रभाव पाडणारे महत्वाचे क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या भारतीय उद्योगांचा शोध घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच या पुरस्कारांमागचा मुख्य उद्देश आहे.

***

माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2286299) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Gujarati , Tamil