उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींच्या हस्ते "आरएसएस @100:अ सेंचुरी ऑफ सर्विस, युनिटी अँड सॅक्रिफाईस " या पुस्तकाचे प्रकाशन

प्रविष्टि तिथि: 17 JUL 2026 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 जुलै 2026

उपराष्ट्रपती  सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज उपराष्ट्रपती भवनात, श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी यांनी लिहिलेल्या "आरएसएस@100: अ सेंचुरी ऑफ सर्विस, युनिटी अँड सॅक्रिफाईस" या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या(आरएसएस) शताब्दीनिमित्त आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभागी होणे ही आपल्यासाठी वैयक्तिक सन्मानाची बाब आहे; कारण संघाशी त्यांचा दीर्घकाळापासून संबंध राहिला आहे.

संघाची नीतिमूल्ये प्रभावीपणे मांडल्याबद्दल लेखकांचे कौतुक करताना राधाकृष्णन म्हणाले की, संघाचा प्रवास हा भारताची सांस्कृतिक मुळे, वारसा आणि परंपरा यांचे पुनरुज्जीवन, बळकटीकरण आणि पुनर्बांधणी करणारा राहिला आहे. 'सेवा, एकता आणि त्याग' (Service, Unity & Sacrifice) या पुस्तकाच्या शीर्षकाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, या आदर्शांनी स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.

उपराष्ट्रपतींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखांच्या माध्यमातून जडण -घडण आणि नेतृत्व-विकासावर भर दिला जात असल्याचे अधोरेखित केले.

सी.पी.राधाकृष्णन यांनी नमूद केले की, भारताचा सांस्कृतिक वारसा, विविध परंपरा, भाषा आणि आध्यात्मिक विचार यांबद्दल अभिमान जागृत करून संघाने सातत्याने सांस्कृतिक सातत्य आणि राष्ट्रीय चेतना वृद्धिंगत केली आहे.

"अ स्वयंसेवक ॲज पीएम: द मोदी एरा" या प्रकरणाचा उल्लेख करत उपराष्ट्रपती म्हणाले की, हे पुस्तक पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचा 'स्वयंसेवक' ते 'प्रधान सेवक' असा प्रवास उलगडून दाखवते.  पंतप्रधानांनी  सातत्याने 'सेवा' आणि 'राष्ट्र प्रथम' यांना आपल्या शासनाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे; यातून निःस्वार्थ सेवा आणि राष्ट्रनिर्मितीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे दिला जात असलेला भर प्रतिबिंबित होतो असे त्यांनी नमूद केले .

या कार्यक्रमाला  संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता, सह-लेखक  श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2285985) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Malayalam