नागरी उड्डाण मंत्रालय
केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी दमण येथील नमो (NAMO) विमानतळावरून तेथून होणाऱ्या पहिल्या उड्डाणाला दाखवला हिरवा झेंडा
अलायन्स एअर दमणला थेट दिल्लीशी जोडणार
प्रविष्टि तिथि:
17 JUL 2026 2:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,17 जुलै 2026
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री, राम मोहन नायडू किंजरापू यांनी दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रशासक, प्रफुल्ल पटेल यांच्यासह 16 जुलै, 2026 रोजी दमण येथील नव्याने कार्यान्वित झालेल्या नमो विमानतळावरून दमण-दिल्ली-दमण मार्गावरील विमानाच्या उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवला.दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे.सरकारी मालकीची प्रादेशिक विमान कंपनी अलायन्स एअरने हे विमान सुरू केले असून, यामुळे दमणचा प्रथमच थेट हवाई संपर्क होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले दमण विमानतळ, हे दमण येथील इंडियन कोस्ट गार्ड एअर स्टेशन (ICGAS) मधून कार्यरत असलेली एक दुहेरी उद्दिष्ट साधणारी सुविधा आहे. या नागरीस्थानकाची (टर्मिनल) पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते 25 एप्रिल 2023 रोजी करण्यात आली आणि विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते 5 जून 2026 रोजी झाले.
केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने 25 एकर जागेवर 124 कोटी रुपये खर्च करून हे टर्मिनल विकसित केले असून, या प्रकल्पासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने 88 कोटी रुपयांची परतफेड केली आहे. हे टर्मिनल 3,700 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले असून, सध्या ते दररोज 14 एटीआर विमानांची हाताळणी करू शकते आणि त्याची वार्षिक प्रवासी क्षमता 3.67 लाख इतकी आहे.
विमानसेवा उदघाटनप्रसंगी या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय अधिकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), अलायन्स एअर आणि भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह दमणचे स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
"या ऐतिहासिक प्रसंगानिमित्ताने मी दमणच्या जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा देतो. या पहिल्याच विमानसेवेमुळे दमण थेट राष्ट्रीय राजधानीशी जोडले जात आहे. आता सुरत किंवा मुंबईमार्गे जाऊन 8 ते 10 तास व्यर्थ जाण्याऐवजी, दिल्ली दमणपासून आता केवळ अडीच तासांच्या अंतरावर आले आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनकारी 'उडान' योजनेमुळे हे शक्य झाले आहे.असे या प्रसंगी बोलताना श्री राम मोहन नायडू म्हणाले,
गेल्या 12 वर्षांत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या प्रदेशांना 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 450 हून अधिक प्रकल्पांचा लाभ झाला आहे, म्हणूनच दमणच्या लोकांनी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा आदर म्हणून त्यांच्या नवीन विमानतळाला ‘नमो विमानतळ’ असे नाव दिले आहे,असे मंत्रीमहोदय पुढे म्हणाले.
दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली येथे 7000 हून अधिक उद्योगधंदे असून, शेजारील वापी आणि वलसाडमध्ये आणखी 15,000 हून अधिक उद्योग कार्यरत आहेत. सुधारित हवाई संपर्कामुळे या व्यवसायांना चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल आणि या प्रदेशातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील
या प्रदेशातील पर्यटनाची क्षमता अधोरेखित करत मंत्री म्हणाले की, दरवर्षी सुमारे 20 लाख पर्यटक दमणला भेट देतात; आणि दमणचा समावेश विमान वाहतुकीच्या नकाशात झाल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वेगाने वाढ होईल. तसेच, धावपट्टीचा विस्तार करून आणि मुंबई, सुरत, अहमदाबाद व पटणा यांसारख्या शहरांशी कनेक्टिव्हीटी वाढवून दमणमध्ये 'एअरबस A320' सारख्या मोठ्या विमानांच्या लँडिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची आमची योजना आहे.
दीव विमानतळाचे उदाहरण देत मंत्र्यांनी सांगितले की, तेथील वार्षिक प्रवासी संख्या 2013 मधील अवघ्या 19,000 वरून वाढून आज एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दीव विमानतळावर नवीन टर्मिनल आणि अतिरिक्त मोठी धावपट्टी विकसित करण्याच्या दिशेने मंत्रालय काम करत आहे असे त्यांनी सांगितले.
दमण विमानतळाच्या महत्त्वाबाबत बोलताना राम मोहन नायडू म्हणाले, "पंतप्रधानांनी दमणच्या 'नील अर्थव्यवस्थेला' निळ्या आकाशातील अफाट संधींशी जोडले आहे. आता दमणमधील मत्स्यव्यवसाय, सागरी उत्पादने आणि अन्न प्रक्रिया-युक्त उत्पादने काही तासांतच देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकतील." याचा फायदा मच्छिमार समुदायाला होईल, सागरी उत्पादकांच्या उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील आणि येथील औषध निर्मिती उद्योगालाही नवी चालना मिळेल असे त्यांनी नमूद केले.
परिवर्तनकारी 'उडान' योजनेला आणखी 10 वर्षांसाठी मुदतवाढ दिल्याचा विशेष उल्लेख नायडू यांनी केला. सुधारित 'उडान' योजनेअंतर्गत, देशात 100 नवीन विमानतळ आणि 200 नवीन हेलिपॅड्स विकसित करण्यासाठी आगामी 10 वर्षांमध्ये 29,000 कोटी रुपयांची अभूतपूर्व तरतूद करण्यात आली असून यामुळे भारताचे प्रादेशिक हवाई वाहतूक जाळे अधिक मजबूत होईल.
'नमो विमानतळ'प्रकल्प साकारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल 'भारतीय तटरक्षक दला'चे विशेष आभार मानून राम मोहन नायडू यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला आणि या ऐतिहासिक प्रसंगी दमणच्या जनतेचे हार्दिक अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीवचे प्रशासक प्रफुल्ल पटेल म्हणाले,"गुजरात मधील वलसाड ते महाराष्ट्र मधील पालघरपर्यंत पसरलेल्या औद्योगिक कार्यबल पट्ट्यासाठी 'नमो विमानतळ' आमूलाग्र बदल घडवून आणणारे ठरेल; तसेच या भागातील तरुणांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. मला विश्वास आहे की, पुढील 15 वर्षांत दमण येथील 'नमो विमानतळ' अनेक पटींनी विस्तारलेले असेल आणि या क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेसाठी परिवर्तनकारी घटक म्हणून उदयास येईल."
दमण येथील 'नमो विमानतळ'वरून विमान सेवा सुरू होणे हा सर्वसामान्यांपर्यंत विमानप्रवास पोहोचवण्याच्या आणि वाढत्या विमान वाहतूक जाळ्यामध्ये छोट्या शहरांचा समावेश करण्याच्या सरकारच्या दूरदर्शी धोरणातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
आशिष सांगळे /संपदा पटगावकर /सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285696)
आगंतुक पटल : 12