आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
युनिसेफ इंडिया, पत्रसूचना कार्यालय पश्चिम क्षेत्र आणि एम्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांवरील वृत्तांकन अधिक उत्तम करण्यासाठी आयोजित दोन दिवसीय माध्यम क्षमता-वृद्धी कार्यशाळेची सांगता
माध्यम प्रतिनिधींना, एम्स नागपूरच्या उत्कृष्टता केंद्रात, बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांच्या काळजीविषयीची सर्वंकष माहिती प्रत्यक्ष तज्ञाकडून मिळाली
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2026 3:46PM by PIB Mumbai
मुंबई, 14 जुलै 2026
बालपणी होणाऱ्या अ संसर्गजन्य आजारांविषयीचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलता आणि जागृतीने कसे करता येईल, याविषयी जाणून घेण्यासाठी, पश्चिम भारतातील सुमारे 30 पेक्षा अधिक माध्यम प्रतिनिधी नागपूरच्या एम्स मध्ये झालेल्या दोन -दिवसीय क्षमता-बांधणी कार्यशाळेसाठी एकत्र आले होते.आज या कार्यशाळेची सांगता झाली.
युनिसेफ इंडिया, पत्र सूचना कार्यालय (पश्चिम क्षेत्र) आणि एम्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेदरम्यान, माध्यम प्रतिनिधींना बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते, याची प्रत्यक्ष माहिती मिळाली. तसेच आरोग्यविषयक वृत्तांकन अधिक प्रभावी करण्यासाठीच्या सर्वोत्तम पद्धतींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

पाच ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आणि 10 ते 19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये वाढत असलेल्या असंसर्गजन्य आजारांच्या धोक्याकडे लक्ष वेधणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. पश्चिम आणि मध्य भारतातील आदिवासी तसेच ग्रामीण भागांमध्ये बालपणीचे असंसर्गजन्य आजार अनेकदा निदान आणि तज्ज्ञ उपचारांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे अधिक गंभीर स्वरूप धारण करतात. दुसरीकडे, शहरी भागांमध्ये बैठी जीवनशैली, स्क्रीनसमोर वाढता वेळ आणि आहारातील बदल यांमुळे बालपणीच येणारा लठ्ठपणा, मधुमेह आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण, आदिवासी किंवा शहरी कोणतेही क्षेत्र असो, बालपणीचे हे आजार अनेकदा गुंतागुंत निर्माण होईपर्यंत लक्षात येत नाहीत.
यावेळी बोलताना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, पत्र सूचना कार्यालयाच्या (पश्चिम क्षेत्र) महासंचालिका स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितले की, “ सार्वजनिक आरोग्यविषयक वृत्तांकन जनजागृती आणि त्यावर आधारित कृती करण्यासाठी आवश्यक तो आकार देते, त्यामुळे पत्रकारांवर, पुराव्या आधारित तथ्ये आणि इतर माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची जबाबदारी असते. तसेच, ज्या बातम्या लोकांना मुलांसाठीची आरोग्यविषयक आव्हाने समजून घेण्यात आणि त्यांचा सामना करण्यास मदत करु शकतील, अशा बातम्या पत्रकारांकडून दिल्या जाव्यात.”
एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी म्हणाले, "लहान मुलांमधील असंसर्गजन्य आजारांचा, सुप्त कालावधी मोठा असतो आणि त्यांची सुरुवात बालपणापासूनच होत असते. त्यामुळे, या आजारांचे लवकर निदान होणे गरजेचे आहे, तसेच यासंबंधी सातत्याने काळजी घेतली गेली पाहिजे. तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट असणे अत्यंत आवश्यक आहे. एम्स नागपूर अशा आरोग्यसेवा मॉडेल्सच्या विकासासाठी कटिबद्ध आहे ज्यांची अंमलबजावणी संपूर्ण देशात करता येईल. प्रसारमाध्यमांच्या मदतीने कुटुंबांना या आजारांची लक्षणे लवकर ओळखण्यासाठी आणि वेळेवर उपचार घेण्यास प्रोत्साहन देण्यास मदत होऊ शकते."
युनिसेफ इंडियाच्या 'कम्युनिकेशन, ॲडव्होकसी अँड पार्टनरशिप' विभागाच्या प्रमुख झाफ्रिन चौधरी म्हणाल्या, "ज्यावेळी प्रसारमाध्यमांमधून लहान मुलांमधील असंसर्गजन्य आजारांबाबत अचूक आणि संवेदनशीलतेने माहिती पोहोचते, त्यावेळी एका दुर्लक्षित समस्येवर प्रकाश पडतो. यामुळे आजारांचे लवकर निदान होण्यास मदत मिळते. सामाजिक कलंक किंवा पूर्वग्रह दूर होतात आणि हे आजार रोखण्यायोग्य आणि उपचार करण्यायोग्य आहेत, या गोष्टीवर शिक्कामोर्तब होते. अशाप्रकारची वृत्त तसेच माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पीआयबी, एम्स नागपूर आणि पत्रकारांबरोबर भागीदारी करताना युनिसेफला अभिमान वाटतो. आपण सर्वजण मिळून लोकांना माहिती देऊ शकतो. आजाराच्या विरोधात कृती करण्यास प्रेरित करू शकतो आणि मुलांना चांगले आयुष्य जगण्यासाठी त्यांचे आरोग्य राखण्यास मदत करू शकतो."
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'डीजीएचएस'चे अतिरिक्त महासंचालक डॉ. तुषार एन. नाले यांनी सरकारच्यावतीने चालविण्यात येणा-या असंसर्गजन्य आजार कार्यक्रमाचा आढावा सादर केला.
या वर्षाच्या सुरुवातीला, संपूर्ण राज्यात लहान मुलांमधील असंसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने युनिसेफ इंडियाच्या धोरणात्मक सहकार्याने एम्स नागपूरसोबत सामंजस्य करार केला. या भागीदारीमुळे एम्स नागपूर या कार्यासाठी 'तांत्रिक उत्कृष्टता केंद्र' म्हणून कार्यरत होणार आहे.
युनिसेफ महाराष्ट्रचे प्रमुख संजय सिंग म्हणाले, "लहान मुलांमधील असंसर्गजन्य आजार आता दुर्मिळ राहिलेले नाहीत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची आणि वाढती प्राथमिकता बनली आहे. एम्स नागपूर आणि महाराष्ट्र सरकारबरोबरच्या आमच्या भागीदारीद्वारे, आम्ही लवकर निदान, रुग्ण संदर्भ प्रणाली आणि दर्जेदार आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी काम करत आहोत, जेणेकरून प्रत्येक मुलाला आवश्यक ती मदत मिळेल."
कार्यशाळेतील एक प्रमुख आकर्षण म्हणजे एम्स नागपूर येथे बालकांमधील असंसर्गजन्य आजारासाठीच्या उत्कृष्टता केंद्राला दिलेली भेट. येथे पत्रकारांनी डॉक्टर, मुले आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना भेटून दीर्घकालीन देखभालीची वास्तविकता प्रत्यक्ष अनुभवली. पत्रकारांनी बालपणातील असंसर्गजन्य आजारांविषयी आकलन तपासणाऱ्या आणि वाढवणाऱ्या एका संवादात्मक प्रश्नमंजुषेतही भाग घेतला. तसेच गटांमध्ये काम करून अशा बातम्यांच्या कल्पना आणि वार्तांकनाचे पैलू विकसित केले, जे ते आपल्या वृत्तकक्षात नेऊ शकतील.

कार्यशाळेची सुरुवात एका प्रास्ताविक सत्राने झाली. यामध्ये एम्स नागपूर येथील बालरोग विभागाच्या प्राध्यापिका आणि विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी गिरीश यांनी बालपणातील असंसर्गजन्य आजार समजून घेण्याबाबत एक अभ्यासपूर्ण भाषण केले.
आरोग्यविषयक वार्तांकनासाठी माध्यम प्रतिनिधींना उपलब्ध असलेल्या भारत सरकारच्या संसाधनांवर तसेच विविध भाषांमध्ये आरोग्यविषयक बातम्यांची नियमित, अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी बातमीदार पीआयबीचा कसा उपयोग करू शकतात, यावरही या कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला. एनएफएचएस आणि एसआरएस सर्वेक्षणे, पोषण-ट्रॅकर संकेतस्थळ आणि इतर सहज उपलब्ध होणाऱ्या आंतर-मंत्रालयीन संसाधनांवरही यावेळी भर देण्यात आला.
ही कार्यशाळा एका सातत्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात आहे, जो सप्टेंबर 2026 मध्ये होणाऱ्या एनसीडी सप्ताहापर्यंत सुरू राहील. हा उपक्रम बालकांमधील असंसर्गजन्य आजारांविषयीची सार्वजनिक समज सुधारणे आणि पुराव्यावर आधारित आरोग्य अहवाल अधिक मजबूत करणे, या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/राधिका अघोर/सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284462)
आगंतुक पटल : 74