इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि ड्रोन फेडरेशन इंडिया कडून NIDAR 2.0 चा प्रारंभ


या विद्यार्थ्यांना भारतीय चिपवर चालणारे अधिक स्मार्ट ड्रोन बनवण्याचे आव्हान

प्रविष्टि तिथि: 13 JUL 2026 10:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 जुलै 2026

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY), ड्रोन फेडरेशन इंडियाच्या (डीएफआय) सहकार्याने आज 'स्वयान' उपक्रमा अंतर्गत, 'नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज फॉर ड्रोन अ‍ॅप्लिकेशन अँड रिसर्च'च्या दुसऱ्या आवृत्तीची (NIDAR 2.0, 2026-27) सुरुवात केली. नवी दिल्लीतील इलेक्ट्रॉनिक्स निकेतन येथे हा कार्यक्रम, ऑनलाइन आणि प्रत्यक्ष उपस्थिती अशा संकरित पद्धतीने पार पडला. यामध्ये देशभरातील विद्यार्थी, प्राध्यापक, सरकारी प्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे  सचिव एस. कृष्णन यांनी 'निडर 2.0' च्या समस्यांची विवरणे (प्रॉब्लेम स्टेटमेंट्स), भित्तीपत्रक (पोस्टर) आणि नियमावली, यांचे (रुलबुक) अनावरण केले. यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितेश कुमार सिन्हा यांचे विशेष भाषण झाले.

या प्रसंगी बोलताना एस. कृष्णन म्हणाले, "निडर 2.0 विद्यार्थ्यांना केवळ ड्रोन उडवायला शिकवत नाही, तर ड्रोनचा 'मेंदू' विकसित करण्याचे कौशल्यही आत्मसात करायला शिकवते. जेव्हा हा 'मेंदू' भारतात विकसित करण्यात आलेल्या 'व्हेगा' (VEGA) प्रोसेसरवर कार्यरत असेल, तेव्हा आपण केवळ अभियंते घडवत नसून स्वावलंबी भारतीय ड्रोन उद्योगाचा भक्कम पाया रचत असू."

परदेशी चिप डिझाइन्स आणि त्यांच्या परवाना(लायसन्सिंग) खर्चावरील देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'डिजिटल इंडिया आरआयएससी-व्ही' (DIR-V) कार्यक्रमांतर्गत 'व्हेगा' प्रोसेसर विकसित केला आहे. 'निडर'ची पहिली आवृत्ती मार्च 2025 मध्ये सुरु करण्यात आली होती.

'निडर 2.0'मध्ये या आव्हानाची व्याप्ती अधिक व्यापक करण्यात आली आहे. या उपक्रमात केवळ ड्रोन तयार करणे किंवा उडवणे एवढ्यावर भर न देता, त्यामागील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे पारंपरिक एअरफ्रेम्स (ड्रोनची बाह्य रचना) यापलीकडे जाऊन स्वायत्त यंत्रणा, स्वदेशी एव्हीओनिक्स (ड्रोनची इलेक्ट्रॉनिक नियंत्रण आणि मार्गनिर्देशन प्रणाली) आणि ड्रोनच्या इतर महत्त्वाच्या तांत्रिक घटकांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. हे आव्हान दोन स्वतंत्र विभागांमध्ये राबवण्यात येणार आहे.

विभाग 1 (ड्रोन नवोन्मेष): या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या चमुला पूर्णपणे स्वायत्त स्वार्म ड्रोन तयार करावे लागतील. हे ड्रोन कोणत्याही बाह्य दळणवळण जाळ्याशिवाय, आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या लोकांचा शोध घेऊ शकतील आणि तिथे औषध साहित्य पोहोचवू शकतील.

विभाग 2 (घटक विकासातील नवोन्मेष): या अंतर्गत, चमुला स्वदेशी इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर करून 'व्हेगा' प्रोसेसरवर आधारित एका स्वदेशी फ्लाईट कंट्रोलर आणि ऑटोपायलट यंत्रणेची रचना करायची आहे. तांत्रिक मूल्यमापनानंतर, सर्वोत्तम 100 चमुंना विकास, चाचणी आणि एकत्रीकरणासाठी प्रत्येकी दोन 'व्हेगा' प्रोसेसर संच मोफत दिले जातील.

या आव्हानाचा विस्तार पाहता, या दुसऱ्या आवृत्तीसाठी बक्षिसांची रक्कम वाढवून 65 लाख रुपयांपेक्षा जास्त करण्यात आली आहे. विजेत्या चमुंना त्यांच्या प्रोटोटाइपचे (प्रारूप) व्यावसायिक उत्पादनात रूपांतर करण्यासाठी उद्योगक्षेत्रातील प्रशिक्षण, नवउद्योजकता संवर्धनासाठी सहाय्य आणि क्लाउड संगणन सेवा क्रेडीट  देखील देण्यात येईल.

 

* * *

निलिमा चितळे/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2284334) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , हिन्दी