अर्थ मंत्रालय
पुण्यात उच्च-तंत्रज्ञान ‘मेफेड्रोन’ निर्मिती प्रयोगशाळेवर कारवाई; ‘ऑपरेशन वज्र’ अंतर्गत दोन मुख्य सूत्रधार अटकेत
प्रविष्टि तिथि:
13 JUL 2026 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2026
आंतरराज्यीय कृत्रिम अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठे यश मिळवत केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या मध्य प्रदेश युनिटने पुण्यात अत्याधुनिक मेफेड्रोन (एमडी) निर्मिती प्रयोगशाळेचा पर्दाफाश केला असून, ऑपरेशन वज्र’ अंतर्गत या प्रकरणातल्या दोन प्रमुख सूत्रधारांना मध्यप्रदेशातल्या उज्जैन आणि राजस्थानातल्या जोधपूर इथून अटक केली आहे.
ही मोहीम निमच इथल्या अंमली पदार्थ उपआयुक्त कार्यालयाच्या प्रतिबंध शाखेकडून विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आली. 1 ते 10 जुलै 2026 या कालावधीत तपास आणि समन्वित कारवाया करण्यात आल्या.
कारवाईदरम्यान पुण्यातली बेकायदा उच्च-तंत्रज्ञान मेफेड्रोन निर्मिती प्रयोगशाळेवर धाड टाकण्यात आली. यामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रयोगशाळेची उपकरणे, पूर्वद्रव्य रसायने आणि कृत्रिम अंमली पदार्थ निर्मितीसाठी वापरले जाणारे सुरक्षा साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह दोन आरोपींना अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अंतर्गत अटक करण्यात आली.

ही कारवाई फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू झालेल्या तपासाचा पुढील टप्पा आहे. त्यावेळी निमुच इथल्या सीबीएन पथकाने मंदसौर इथे प्रवासी बस अडवून 8.17 किलो मेफेड्रोन जप्त केले होते.
या प्रकरणामध्ये सातत्याने मिळणारी गुप्त माहिती आणि व्यापक आंतरराज्यीय तपासाच्या आधारे फरार मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात आला. बनावट ओळखपत्रांच्या आधारे तो विविध राज्यांमध्ये ठिकाणे बदलत होता. सखोल गुप्त कारवाईनंतर 3 जुलै 2026 रोजी रात्री उशिरा उज्जैन इथून त्याला अटक करण्यात आली. या कारवाईत उज्जैन पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुण्यातल्या भोसरी परिसरातल्या दिघी इथे आणखी एक अत्याधुनिक मेफेड्रोन निर्मिती केंद्र उभारण्यात आल्याचे या तपासादरम्यान उघड झाले. या केंद्राला वित्तपुरवठा आणि समन्वय जोधपूरस्थित सह-सूत्रधाराकडून केला जात होता. 9 जुलै 2026 रोजी रात्री उशिरा पुणे आणि जोधपूर इथे एकाच वेळी समन्वित छापे टाकण्यात आले. यामध्ये दुसऱ्या सूत्रधाराला अटक करून गुप्त प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्यात आली.

या कारवाईत अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्री, प्रयोगशाळेची उपकरणे, जड काचसामग्री, पूर्वद्रव्य रसायने आणि सुरक्षा साहित्य जप्त करण्यात आले. सर्व जप्त साहित्य अंमली पदार्थ विरोधी कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
चालू वर्षात केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने 142 गुन्हे नोंदवून 193 जणांना अटक केली आहे. त्यात चार गुप्त प्रयोगशाळांचा शोध घेवून तिथे चालणारे गैरकृत्य उद्ध्वस्त करण्यात आले. अशा सातत्यपूर्ण कारवायांद्वारे केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभाग संघटित अंमली पदार्थ तस्करी जाळ्यांचा नायनाट करत आहे आणि ‘नशामुक्त भारत’ या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी निर्धाराने कार्यरत आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284332)
आगंतुक पटल : 14