लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत : लोकसभा अध्यक्ष


आरोग्यसेवा, संशोधन आणि नवोन्मेष  बळकट करण्यासाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्रांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक: लोकसभा अध्यक्ष

विद्यमान आणि नव्याने उद्भवणाऱ्या आजारांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी वैद्यकीय संस्थांनी सज्ज राहिले पाहिजे: लोकसभा अध्यक्ष

नाशिक मध्ये अशोका हेल्थ सिटीचे लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 12 JUL 2026 7:27PM by PIB Mumbai



नाशिक, 12 जुलै 2026: समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथे 'अशोका हेल्थ सिटी'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासकीय आणि खाजगी संस्थांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

नाशिक ही भूमी आध्यात्मिक चेतना, सामाजिक जाणीव आणि अलौकिक शौर्याची भूमी असल्याचा उल्लेख बिर्ला यांनी केला. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पवित्र त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर लोकांना आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य देते आणि समाजाला जनकल्याणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते, असे ते म्हणाले. या प्रदेशाच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाची देखील त्यांनी आठवण करून दिली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची शिकवण आजही समाजाला प्रेरणा देत आहे, तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम देशातील तरुणांना आजही प्रेरणा आणि योग्य दिशा देत असल्याचे बिर्ला यांनी आवर्जून सांगितले.

भारतातील आरोग्य सेवांचा विस्तार करण्याच्या गरजेवर भर देत बिर्ला यांनी, भारत सरकार सर्वांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच निकोप जीवनशैलीला प्रोत्साहन दिले आहे आणि आज योग हा जगभरातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला असल्याचे त्यांनी सांगितले. निरोगी आणि रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने योगासने आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

देशातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी भारत सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली असल्याचे बिर्ला यांनी सांगितले. वैद्यकीय पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात आला असून, वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा वाढवण्यात आल्या आहेत आणि 'आयुष्मान भारत' सारख्या अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. यामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग देखील मोलाचा ठरत असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे ते म्हणाले. याद्वारे नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात आहेत, वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक सक्षम होत आहेत आणि गंभीर आजारांवर उपचार करण्यासोबतच संशोधनावरही अधिक भर दिला जात असल्याचे बिर्ला यांनी सांगितले.

वैद्यकीय संशोधनाच्या महत्त्वावर भर देत बिर्ला यांनी अशोका हेल्थ सिटीने माता व बाल रुग्णालय, कर्करोग उपचार आणि सुपर-स्पेशालिटी सेवांसोबतच संशोधन व नवोन्मेषासाठी आवश्यक सुविधा उभाराव्यात, असे आवाहन केले. सध्या अस्तित्वात असलेल्या तसेच भविष्यात उद्भवू शकणाऱ्या नव्या आजारांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिक आणि आरोग्य संस्थांनी आतापासूनच तयारी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने वैद्यकीय संशोधन आणि नवोन्मेष  क्षेत्रातील आपली क्षमता आणखी बळकट करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

भारताच्या विज्ञान आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील वाढत्या क्षमतेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, एकेकाळी आरोग्यसेवेच्या अनेक बाबींमध्ये भारताला विकसित देशांवर अवलंबून रहावे लागत होते. मात्र, कोविड-19 महामारीच्या काळात भारतीय शास्त्रज्ञांनी लस विकसित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि अभूतपूर्व जागतिक संकटाच्या काळात संपूर्ण मानवजातीच्या सेवेसाठी मोलाची भूमिका बजावली. संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी तसेच नवीन  आजारांवर प्रभावी उपाय विकसित करण्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्राने परस्पर समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले..

बिर्ला यांनी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये संशोधन व नवोन्मेष  केंद्रांची स्थापना करण्याच्या गरजेवर भर दिला. नवनवीन आजार अनपेक्षितपणे उद्भवू शकतात आणि त्यातून गंभीर आव्हाने निर्माण होऊ शकतात, असे नमूद करत त्यांनी सांगितले की, वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाबरोबरच संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक क्षमतांमध्ये गुंतवणूक करणे तितकेच आवश्यक आहे.

संस्थेकडून उपलब्ध करून दिल्या जात असलेल्या आरोग्यसेवांबाबत समाधान व्यक्त करत बिर्ला यांनी सांगितले की, अशोका हेल्थ सिटी ही केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवत आहे. नव्याने उद्घाटन झालेल्या मातृ व बाल रुग्णालयाचा उल्लेख करत त्यांनी माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी समर्पित उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध होण्याची आवश्यकता अधोरेखित केली. देशातील बालमृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक प्रभावी प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक सक्षम रुग्णालये आणि दर्जेदार आरोग्य सुविधा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाप्रती उत्तरदायित्व आणि लोकसेवेच्या भावनेतून खासगी संस्थांनी आरोग्यसेवांचा विस्तार करावा, जेणेकरून त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचेल, असे आवाहनही त्यांनी केले.

सरकार आणि खासगी क्षेत्राच्या परस्परपूरक भूमिकेवर प्रकाश टाकताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, आजच्या काळात परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. अशोका हेल्थ सिटी हे गंभीर आजारांवरील उपचारांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होईल, तसेच परवडणारी, दर्जेदार आणि शाश्वत आरोग्यसेवा उपलब्ध करून देत वैद्यकीय संशोधनालाही चालना देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 वैद्यकीय शिक्षणाची सांगड लोकसेवेच्या भावनेशी घालणे आवश्यक असल्याचं बिर्ला यांनी आपल्या भाषणाच्या समारोपात अधोरेखित केले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खेडी आणि ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, यामुळे देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांपर्यंतही दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचेल, असे ते म्हणाले. अगदी शेवटच्या टोकावरील नागरिकांसह प्रत्येक नागरिकाला गंभीर आजार झाल्यास खात्रीशीर उपचार मिळायलाच हवेत, यावर त्यांनी भर दिला.

यावेळी महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा मंत्री हिरालाल नागर, इतर खासदार आणि मान्यवर उपस्थित होते.

***

सुषमा काणे/वैभवी जोशी/हेमांगी कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2283938) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada