रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
भारताने वाहतूक क्षेत्रातील परिवर्तनकारी सुधारणांचे सादरीकरण केले असून हरित गतिशीलता, नाविन्यपूर्णता आणि विकसनशील देशांमधील सहकार्याप्रती आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे भारताच्या मल्टी-मोडल पायाभूत सुविधांची क्रांती दाखवणारे आहे - नितीन गडकरी
प्रविष्टि तिथि:
11 JUL 2026 4:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2026
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ब्रिक्स देशांमध्ये अधिक व्यापक सहकार्याचे आवाहन केले. शाश्वत, लवचिक, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज अशी वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी हे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ब्रिक्स समूहाची ताकद, नाविन्यपूर्णता, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचे (ग्लोबल मोबिलिटी) भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते, असेही ते म्हणाले.
भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित तिसऱ्या ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना, गडकरी यांनी ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री, शिष्टमंडळांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधींचे नागपुरात स्वागत केले. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने ही बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

भारताचा ब्रिक्स अध्यक्षपदाचा कार्यकाळ लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी या संकल्पनेवर आधारित आहे. हा दृष्टिकोन वसुधैव कुटुंबकम् या कालातीत तत्त्वज्ञानापासून प्रेरित असून, तो लोक-केंद्रित आणि मानवता प्रथम या विचारांचे प्रतिबिंब आहे, असे केंद्रीय मंत्री यावेळी म्हणाले.
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ब्रिक्स गटाकडे आहे आणि अधिक स्वच्छ, सुरक्षित, स्मार्ट आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थांच्या विकासाचे नेतृत्व करण्याची अद्वितीय क्षमता आहे, असे ते म्हणाले. त्याच वेळी, शाश्वत आर्थिक विकास आणि प्रादेशिक संपर्क यांनाही चालना देणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाहतूक व्यवस्था हा आर्थिक विकासाचा कणा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गडकरी म्हणाले की, रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई क्षेत्रांत भारताने साधलेल्या जलद परिवर्तनाचा आढावा घेतला. भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे विकसित केले असून, प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्ग आणि 'मल्टी-मोडल' कनेक्टिव्हिटीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. दिल्ली-देहरादून आर्थिक कॉरिडॉर, सोनमर्ग बोगदा आणि 10,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत ते म्हणाले की, हे उपक्रम पायाभूत सुविधांचा विकास, पर्यावरणीय शाश्वतता आणि तांत्रिक नाविन्यपूर्णता यांचा मेळ घालण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचे दर्शन घडवतात. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल ही एक यशस्वी कार्यपद्धती आहे.

ब्रॉड-गेज रेल्वे मार्गांचे जवळपास शंभर टक्के विद्युतीकरण, 'वंदे भारत' रेल्वे सेवांचा विस्तार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम आणि नव्या पम्बन पुलासारखी ऐतिहासिक अभियांत्रिकी शिखरे यामुळे भारतीय रेल्वेचे अभूतपूर्व आधुनिकीकरण झाले असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. यासोबतच देशातील सागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि लॉजिस्टिक क्षेत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी 'मॅरिटाईम अमृत काळ व्हिजन 2047', 'ई-नाविक' (e-Navik) व 'ई-समुद्र' (e-Samudra) यांसारखे डिजिटल उपक्रम आणि 'ग्रीन शिपिंग' (पर्यावरणपूरक जहाजबांधणी व वाहतूक) मोहीम ही अत्यंत महत्त्वाची पावले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ई-बसेसचा वापर, 'ग्रीन अर्बन मोबिलिटी स्कीम' आणि प्रादेशिक विमान प्रवास अधिक सुलभ करणाऱ्या 'उडान' (UDAN) योजनेच्या यशाचा उल्लेख करत गडकरी यांनी, भारताच्या पर्यावरणपूरक व शाश्वत वाहतूक व्यवस्थेचा पुनरुच्चार केला. 'पीएम गतिशक्ती बृहद आराखड्यामुळे एकाच वेळी विविध वाहतूक साधनांचा एकात्मिक विकास शक्य झाला असून, यामुळे पायाभूत सुविधांच्या नियोजनात आमूलाग्र बदल झाला आहे. परिणामी, लॉजिस्टिकचा खर्च कमी झाला असून प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती मिळाली असल्याचे ते म्हणाले.
भारताच्या वाहतूक धोरणात 'सुरक्षा आणि पर्यावरणपूरकता' या गोष्टी केंद्रस्थानी असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. रस्ते अपघातातील बाधितांना रोखरहित उपचारांची सुविधा देणाऱ्या 'पीएम-राहत' (PM-RAHAT) योजनेचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच, पर्यावरणाप्रती जबाबदारी ओळखून पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी रस्ते बांधणीत गोळा केलेला प्लास्टिक कचरा, महानगरपालिकेचा घनकचरा, कोळशाची राख, धातूची मळी, बांबूचे क्रॅश बॅरियर्स (सुरक्षा कठडे) आणि निरुपयोगी ठरलेल्या जुन्या टायरचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांसाठीचा निधी, वाहतूक कोंडी, प्रदूषण, रस्ते सुरक्षा आणि शेवटच्या घटकापर्यंत वाहतूक सेवा पोहोचवणे यासारख्या आव्हानांवर सामूहिक उपायांची गरज व्यक्त करून गडकरी यांनी, ब्रिक्स (BRICS) देशांमध्ये परस्पर सहकार्याचे आवाहन केले. ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहतूक, पर्यायी इंधन, डिजिटल वाहतूक यंत्रणा आणि शाश्वत बहुआयामी पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये माहितीची देवाणघेवाण, क्षमता बांधणी, तांत्रिक सहकार्य आणि संयुक्त संशोधनाच्या माध्यमातून सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत पूर्णपणे तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत होईल आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या, नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख वाहतूक पर्यायांचा विकास करण्यास मदत होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. सर्वसमावेशक विकासाला चालना देणाऱ्या, प्रादेशिक संपर्क यंत्रणा मजबूत करणाऱ्या, पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या आणि सर्वांसाठी अधिक शाश्वत व समृद्ध भविष्य घडवणाऱ्या वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्व ब्रिक्स राष्ट्रांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
* * *
राधिका अघोर/राजेश शिरभाते/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2283676)
आगंतुक पटल : 32