रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स देशांच्या परिवहन कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला महाराष्ट्रातील नागपूर येथे प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 09 JUL 2026 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,9 जुलै 2026

भारताच्या 2026 च्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या वाहतूक प्रणालीवरील सहकार्य पुढे नेण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र आणणारी तिसरी ब्रिक्स वाहतूक कार्यगट (टीडब्ल्यूजी) बैठक आज नागपूर येथे सुरू झाली.

प्रतिनिधी पुढील दोन दिवसांत शाश्वत वाहतूक पायाभूत सुविधा, स्वच्छ गतिशीलता, दळणवळण लवचिकता आणि बहुविध संचारसंपर्क यांसारख्या प्रमुख धोरणात्मक प्राधान्यक्रमांवर विचारविनिमय करतील, तसेच उदयोन्मुख जागतिक वाहतूक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संस्थात्मक सहकार्य मजबूत करतील.

प्रतिनिधींचे स्वागत करताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच 'विश्‍व एक कुटुंब आहे' - या शाश्वत तत्त्वानुसार सहयोगी आणि सर्वसमावेशक विकासासाठी भारताची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.

ते म्हणाले की भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना "लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी," असा लोककेंद्रित दृष्टिकोन दर्शवते, जो कार्यक्षम, शाश्वत आणि लवचिक वाहतूक परिसंस्था निर्माण करण्यासाठी व्यावहारिक भागीदारीची अपेक्षा करतो.

भारताच्या अध्यक्षपदाच्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकताना सचिव म्हणाले की वाहतूक कार्यक्रम हा पायाभूत सुविधांमधील शाश्वतता, शाश्वत विमान इंधन (एस ए एफ), वाहतुकीचे विकार्बनीकरण, शहरी गतिशीलता, लवचिक लॉजिस्टिक्स आणि रेल्वे संशोधन सहकार्य यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सहा प्रमुख उपक्रमांभोवती आधारित आहे. या उपक्रमांचा उद्देश ब्रिक्स सदस्य देशांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण अधिक सखोल करणे, तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे, संस्थात्मक भागीदारी मजबूत करणे आणि क्षमता बांधणीला पाठिंबा देणे हा आहे.

यावेळी त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की,  प्रस्तावित उपक्रम हे पूर्वीच्या ब्रिक्स परिवहन कार्यगटाच्या बैठकांदरम्यान झालेल्या प्रगतीवर आधारित असून, ते या क्षेत्रातील दीर्घकालीन सहकार्यासाठी अधिक मजबूत पाया घालतात. एकत्रितपणे हे उपक्रम नाविन्यपूर्ण, पर्यावरणास जबाबदार आणि लोकांच्या आकांक्षांना प्रतिसाद देणाऱ्या परिवहन प्रणाली विकसित करण्याच्या ब्रिक्स राष्ट्रांच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहेत.

नागपूर येथे होत असलेली ही बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आलेल्या प्राधान्य विषयांवर सदस्य देशांदरम्यान झालेल्या सविस्तर चर्चेच्या व्यापक सल्लामसलत प्रक्रियेची निष्पत्ती आहे, असे व्ही. उमाशंकर यांनी नमूद केले. या प्रक्रियेत पाच आभासी पूर्वतयारी बैठका घेण्यात आल्या होत्या. सर्व प्रतिनिधीमंडळांनी केलेल्या विधायक सहभागाचे त्यांनी कौतुक केले आणि सहकार्याची हीच भावना पुढील चर्चेलाही मार्गदर्शक ठरेल तसेच महत्त्वाच्या निष्कर्षांबाबत व्यापक सहमती निर्माण करण्यास मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्ष म्हणून भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत त्यांनी सहभागी प्रतिनिधीमंडळांना आश्वस्त केले की, या बैठकीतील चर्चा पारदर्शक, सर्वसमावेशक आणि सर्वसंमतीच्या तत्त्वावर आधारित असेल. त्यामुळे बैठकीचे निष्कर्ष सर्व ब्रिक्स सदस्य देशांच्या सामूहिक प्राधान्यक्रमांचे आणि विकासविषयक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असतील. विस्तारित ब्रिक्स समूहाचे वाढते महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, ब्रिक्स सदस्य देशांमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 49.5 टक्के लोकसंख्या, जागतिक सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 40 टक्के वाटा आणि जागतिक व्यापारातील 26 टक्के वाटा आहे. या पार्श्वभूमीवर, वाहतूक क्षेत्रातील अधिक सहकार्यामुळे संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल, पुरवठा साखळीची लवचिकता वाढेल आणि शाश्वत आर्थिक विकासाला  चालना मिळेल, असे ते म्हणाले.

पुढील दोन दिवसांतील चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधील भागीदारी आणि परस्परांकडून शिकण्याची भावना अधिक दृढ होईल तसेच आगामी मंत्रिस्तरीय बैठकीत ठोस निष्कर्ष साध्य करण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास सचिवांनी व्यक्त केला. या कार्यगटाच्या बैठकीनंतर 11 जुलै 2026 रोजी नागपूर येथे ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची तिसरी बैठक होणार आहे.


सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/राज दळेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2283063) आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil