वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आसियान-भारत वस्तू व्यापार कराराच्या पुनरावलोकनाला गती देण्यासाठी भारताने 13 व्या आसियान-भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचे आयोजन केले


गुणवत्तापूर्ण पुनरावलोकन प्रकरणांना अंतिम स्वरूप देण्याचे एआईटीआयजीए संयुक्त समितीचे निर्देश

प्रविष्टि तिथि: 08 JUL 2026 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2026

 

आसियान (ASEAN)-भारत वस्तू व्यापार करार (एआयटीआयजीए) पुनरावलोकना अंतर्गत वाटाघाटींच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी, भारताने 6 ते 10 जुलै 2026 या कालावधीत नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे 13 व्या एआयटीआयजीए संयुक्त समिती (जेसी) आणि संबंधित बैठकांचे आयोजन केले. या बैठका हायब्रीड (मिश्र) स्वरूपात आयोजित केल्या जात आहेत.

एआयटीआयजीए संयुक्त समितीच्या अंतर्गत असलेल्या आठ उपसमित्यांपैकी तीन उपसमित्यांच्या बैठका सध्या 13 व्या संयुक्त समितीच्या बैठकीच्या निमित्ताने होत आहेत. यामध्ये सीमाशुल्क प्रक्रिया आणि व्यापार सुलभतेवरील उप-समिती (एससी-सीपीटीएफ), राष्ट्रीय वागणूक आणि बाजार प्रवेशावरील उप-समिती (एससी-एनटीएमए) आणि मूळ नियमांवरील उप-समिती (एससी-आरओओ) यांचा समावेश आहे. या बैठका भारत आणि आसियान देशांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य मजबूत करण्यासाठी आणि विधायक संवादाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून काम करत आहेत.

संयुक्त समितीने उप-समित्यांना त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात मोलाचे मार्गदर्शन केले आणि एआयटीआयजीए पुनरावलोकना अंतर्गत प्रलंबित प्रकरणांना अंतिम स्वरूप देण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले. वाटाघाटींची गती कायम ठेवण्यासाठी, उप-समित्यांना कालबद्ध कामे सोपवण्यात आली आणि ठरलेल्या वेळेत ठोस परिणाम साधण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले.

7 जुलै 2026 रोजी झालेल्या 13 व्या एआयटीआयजीए संयुक्त समितीच्या बैठकीचे सह-अध्यक्षपद वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव नितीन कुमार यादव आणि मलेशियाच्या गुंतवणूक, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या उपमहासचिव (व्यापार) मस्तुरा अहमद मुस्तफा यांनी भूषवले. ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ पीडीआर, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या सर्व आसियान सदस्य देशांच्या प्रतिनिधीमंडळांनी बैठकीत भाग घेतला.

आसियान समूह, हा भारताच्या प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक असून, भारताच्या जागतिक व्यापारात त्याचा वाटा सुमारे 11 टक्के आहे. भारत आणि आसियान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 2025-26 दरम्यान 128 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला असून, यामधून दोन्ही बाजूंमधील मजबूत आर्थिक भागीदारी प्रतिबिंबित होते. ही भागीदारी व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्यासाठी पुढील संधी उपलब्ध करून देते.

 

* * *

नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2282657) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Malayalam