आदिवासी विकास मंत्रालय
केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांच्या हस्ते 'ट्राईब एक्स' या आदिवासी कला, संस्कृती आणि पारंपरिक ज्ञानासाठीच्या डिजिटल अध्ययन मंचाचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2026 8:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 जुलै 2026
आदिवासी शिक्षण डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्यासाठी आणि भारताचा समृद्ध पारंपरिक वारसा जतन करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत, आदिवासी विकास मंत्रालयाने आज 'ट्राईब एक्स' चे उद्घाटन केले. आदिवासी कला, संस्कृती, पारंपरिक ज्ञान आणि कौशल्य विकासासाठी समर्पित असलेला हा अशा प्रकारचा पहिलाच डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म अर्थात डिजिटल अध्ययन मंच आहे. ओदिशातील भुवनेश्वर येथे 'आदिवासी संशोधन संस्थांच्या सक्षमीकरणा'वर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेदरम्यान, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांच्या हस्ते या मंचाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना जुएल ओराम म्हणाले की 'ट्राईब एक्स' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या, भारताच्या समृद्ध आदिवासी वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रभावी सादरीकरण करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या उपक्रमाद्वारे अस्सल आदिवासी ज्ञान जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये भौगोलिक अडथळे दूर करण्याची, आदिवासी समुदायांना सक्षम बनवण्याची आणि शतकानुशतके जतन झालेल्या ज्ञानपरंपरा आधुनिक जगातही अखंडपणे टिकून राहून विकसित होत राहतील, याची खात्री करण्याची मोठी क्षमता आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आदिवासी संशोधन संस्था तसेच आदिवासी कल्याण विभागांना आवाहन केले की विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये 'ट्राईब एक्स' या मंचाविषयी व्यापक जनजागृती करावी; तसेच, या मंचावर उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये सक्रियपणे नावनोंदणी करून त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.

केवळ शिक्षणापुरता मर्यादित न राहता, 'ट्राईबएक्स' हा मंच आदिवासी भाषा, मौखिक परंपरा, सादरीकरण कला, सांस्कृतिक प्रथा आणि स्वदेशी ज्ञानपरंपरांचे दस्तऐवजीकरण, जतन आणि संवर्धन करण्यासाठी भावी पिढ्यांच्या दृष्टीने एक डिजिटल भांडार म्हणून कार्य करेल.
या मंचावर सध्या आदिवासी कलाप्रकारांच्या विविध श्रेणींमध्ये 20 मोफत प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सर्टिफिकेट कोर्सेस) उपलब्ध आहेत. यामध्ये चित्रकला, हस्तकला, हातमाग, कलाकृती आणि पारंपरिक वाद्यांशी संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश आहे. भविष्यात या मंचावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची संख्या 100 पेक्षा जास्त करण्याचे नियोजन आहे.
'ट्राईबएक्स'चा शुभारंभ हा आदिवासी सक्षमीकरणासाठी डिजिटल नवोन्मेषाचा प्रभावी वापर करण्याच्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे.
'ट्राईबएक्स' या डिजिटल अध्ययन मंचाचा लाभ घेण्यासाठी https://tribexdigital.org.in या संकेतस्थळाला भेट द्या.
माधुरी पांगे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282245)
आगंतुक पटल : 19