वस्त्रोद्योग मंत्रालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी होणारे भारतीय पथक शाश्वत तागापासून तयार केलेल्या वस्त्रांची जगाला ओळख करून देणार
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2026 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 जुलै 2026
शाश्वत वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी तसेच नैसर्गिक धाग्यांच्या क्षेत्रातील देशाचा नवोन्वेष सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय ताग मंडळाने (NJB) एक ऐतिहासिक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत मंडळाने ताग आणि व्हिस्कोस मिश्रित कापडापासून विशेष पोशाख तयार केले आहेत. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी होणारे भारतीय खेळाडूंचे पथक आणि पथकातील इतर सदस्य हे पोशाख परिधान करणार आहेत.
मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गतच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेपासून प्रेरणा घेत, वस्त्रोद्योग मंत्रालय, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ताग मंडळाच्या माध्यमातून तागाच्या मूल्यवर्धित वापराला सक्रियपणे प्रोत्साहन देत आले आहे. त्याअनुषंगानेच हा उपक्रम राबवला जात असून, या माध्यमातून मंडळाने 100 टक्के जैवविघटनशील स्वरुपाच्या ताग आणि व्हिस्कोस मिश्रित कापडाची एक शाश्वत आणि नवोन्मेषी वस्त्रोत्पदान पर्याय म्हणून असलेली क्षमता जगासमोर ठळकपणे मांडली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 साठीच्या अधिकृत वस्त्रोत्पादन संचाचे अनावरण आणि पथकाचा निरोप समारंभ आज दि. 7 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडला. या समारंभाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविय, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

अनेक क्रीडा प्रकारांचा अंतर्भाव असलेल्या एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तागाचा वापर असलेले कपडे प्रदर्शित केले जाण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या उपक्रमामुळे भारताच्या ताग उद्योग क्षेत्राची जागतिक पाटलावर ओळख निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. यासोबतच भारतीय उत्पादकांची कारागिरी आणि ताग उत्पादक शेतकऱ्यांचे योगदानही यातून अधोरेखित होणार आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये जगभरातील 72 देशांमधील खेळाडू एकत्र येणार आहेत. या स्पर्धेत भारताचे 124 सदस्यांचे पथक सहभागी होणार आहे, यात 78 पुरुष आणि 46 महिला खेळाडूंचा समावेश आहे.
भारतीय पथकाला मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत निर्मिती केलेले हे तागाचे कपडे परिधान करण्याची परवानगी दिल्याबद्दल राष्ट्रीय ताग मंडळाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आभारही मानले आहेत.
Y4S0.jpeg)

माधुरी पांगे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282229)
आगंतुक पटल : 25