युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली 80 वा देशव्यापी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ उपक्रम आयोजित; श्री सत्य साई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष आयोजन
"भारतातील प्रत्येक चार व्यक्तींपैकी एका व्यक्तीला लठ्ठपणाची समस्या; प्रत्येक नागरिकासाठी तंदुरुस्ती अत्यावश्यक" – डॉ. मनसुख मांडविया
प्रविष्टि तिथि:
05 JUL 2026 2:44PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली, आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम 80 व्या ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आध्यात्मिक नेते श्री सत्य साई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, सत्य साई सेवा संघटनांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमाअंतर्गत, राष्ट्रीय राजधानीत 9,000 हून अधिक नागरिकांनी सामुदायिक धावणे आणि सायकल फेरीत सहभाग घेतला. याशिवाय झुंबा आणि योग सत्रांचेही आयोजन करण्यात आले. देशातील इतर भागांत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, ‘हार्टफुलनेस’ आणि ‘ईशा फाउंडेशन’ यांच्या सहकार्याने सायकल फेरी आयोजित करण्यात आली.

लहान मुलांसाठी मोठ्या आकारातील बुद्धिबळ आणि सापशिडी तसेच कॅरम, टेबल टेनिस, फुटबॉल आणि बॅडमिंटन अशा खेळांसाठी विशेष ‘गेम झोन’चीही व्यवस्था करण्यात आली.
2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा पुनरुच्चार करताना डॉ. मांडविया म्हणाले, "कोणत्याही देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख मिळण्यासाठी त्या देशातील नागरिकांचे आरोग्य उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने मोबाईलच्या पडद्यापासून किमान एक तास दूर राहून तो वेळ खेळ, व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी द्यावा."

ते पुढे म्हणाले, "भारतातील प्रत्येक चार व्यक्तींपैकी एका व्यक्तीचे वजन जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकासाठी तंदुरुस्ती अत्यावश्यक आहे."
हा उपक्रम युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने भारतीय सायकलिंग महासंघ, योगासन भारत, राहगिरी फाउंडेशन आणि माय भारत यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे.


***
राधिका अघोर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2281310)
आगंतुक पटल : 17