निती आयोग
azadi ka amrit mahotsav

नीती आयोगाने "स्ट्रॅटेजिक रोडमॅप फॉर मेकिंग आयुर्वेद ग्लोबल" या अहवालाचे केले प्रकाशन

प्रविष्टि तिथि: 02 JUL 2026 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जुलै 2026

 

नीती आयोगाने 2 जुलै 2026 रोजी "स्ट्रॅटेजिक रोडमॅप फॉर मेकिंग आयुर्वेद ग्लोबल" नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला. हा अहवाल आयुर्वेदाच्या जागतिक प्रभावाचे सर्वसमावेशक मूल्यमापन करतो. तसेच, आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी टप्प्याटप्प्याने राबवायच्या पथदर्शी आराखड्याची रूपरेषा मांडतो.

हा अहवाल नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अशोक कुमार लाहिरी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी नीती आयोगाचे सदस्य प्रा. (डॉ.) एम. श्रीनिवास आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा उपस्थित होते. याशिवाय नीती आयोग, आयुष मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय , सरकारी संस्था, संशोधन संस्था, उद्योग संघटनांचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित भागधारक या वेळी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना नीती आयोगाचे  उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी म्हणाले की, आयुर्वेदाचे जागतिकीकरण ही भारताला पारंपरिक वैद्यकशास्त्रात जागतिक नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याची एक सुवर्णसंधी आहे. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल, रोजगार निर्मिती होईल, निर्यातीला बळ मिळेल आणि भारताची सांस्कृतिक तसेच ज्ञान-आधारित प्रभावशक्ती (सॉफ्ट पॉवर) अधिक मजबूत होईल. हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व सरकारी विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, जेणेकरून याची नियोजनबद्ध आणि वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करता येईल, यावर त्यांनी भर दिला.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी मंत्रालयाने हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांची माहिती दिली.. गेल्या दशकात या क्षेत्रात झालेल्या लक्षणीय प्रगतीचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. या अहवालातील शिफारसी मंत्रालयाच्या प्रयत्नांना पूरक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयुर्वेदाला जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आरोग्य सेवा पद्धती म्हणून प्रस्थापित करण्यासाठी यामुळे नवीन गती मिळेल, असे ते म्हणाले.

परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (यूएनईएस) अक्विनो विमल यांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय सहभागातून आणि भागीदारीतून आयुर्वेदाच्या जागतिकीकरणाला मिळालेल्या प्रगतीचा उल्लेख केला.

हा अभ्यास नीती आयोगाच्या आरोग्य विभागाने प्राईसवॉटरहाऊसकूपर्स (पीडब्ल्रसी) च्या सहकार्याने पूर्ण केला आहे. आयुर्वेदाच्या जागतिकीकरणातील संधी आणि आव्हाने शोधण्यासाठी यात विविध भागधारकांशी व्यापक चर्चा करण्यात आली आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय निकष आणि पुराव्यांवर आधारित विश्लेषणाचा आधार या अभ्यासासाठी घेण्यात आला आहे.

पूर्ण अहवाल येथे पहा: https://niti.gov.in/sites/default/files/2026-07/Strategic-Roadmap-for-Globalization-of-Ayurveda.pdf

 

* * *

शैलेश पाटील/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2280586) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil